काँग्रेसने अगोदर स्वत:चा डीएनए पहावा : वेर्णेकर
पणजी : धार्मिक सलोखा राखणे ही समाजातील सर्वांची जबाबदारी आहे. मात्र काँग्रेस पक्ष व विरोधी पक्षनेते युरी आलेमाव स्वत:च्या मतपेट्या शाबूत ठेवण्यासाठी केवळ हिंदूंना व उजव्या विचारसरणीच्या संघटनांना लक्ष्य करत असल्याची टीका भाजप प्रवत्ते गिरिराज पै वेर्णेकर यांनी केली. पणजीत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
वेर्णेकर यांनी सांगितले की, आलेमाव यांनी वक्तव्य करताना भाजपशी निगडित उजव्या विचारसरणीच्या संघटनांवर टीका केली आहे. या संघटना राज्यातील धार्मिक सलोखा बिघडवत असल्याचा आरोप त्यांनी केला. मात्र गेल्या काही दिवसात गोव्यात घडलेल्या घटना पाहता काँग्रेस स्वत:ची मतपेटी सांभाळून केवळ हिंदूंना लक्ष्य करत आहे. काँग्रेसला उजव्या विचारसरणीच्या संघटनांबाबत का राग आहे हे स्पष्ट करावे.
युरी आलेमाव यांनी गोव्याच्या डीएनएला धोका असल्याचे सांगितले. परंतु 2012 च्या निवडणुकीत आलेमाव कुटुंबीयातील चार उमेदवारांना जनतेने नाकारले होते. भाजप महिला, युवा, शेतकरी यांच्या उद्धाराचे काम करत आहे. याविषयी काँग्रेसने आम्हाला ज्ञान देऊ नये. काँग्रेसने आधी स्वत:चा डीएनए पहावा, असेही वेर्णेकर म्हणाले.