काँग्रेसने तीन दिवसांत माफी मागावी अन्यथा...नितीन गडकरींची काँग्रेसला कायदेशीर नोटीस
भाजपचे राष्ट्रीय नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे आणि जयराम रमेश यांना नोटीस बजावली आहे. नितीन गडकरी यांनी काही दिवसापुर्वी दिलेल्या मुलाखतीचा १९ सेकंदाचा भाग चुकीच्या पद्धतीने सोशल मीडियावर प्रसारित केल्याबद्दल त्यांनी ही कायदेशीर नोटीस बजावली आहे. अशा प्रकारच्या कृतीने भाजप नेता म्हणून आपली प्रतिष्ठा खराब करण्याच्या उद्देशानेचे ही क्लिप शेअर करण्यात आल्याचा आरोप गडकरींनी केला आहे.
नितीन गडकरी यांच्या वतीने त्यांचे वकिल बाळेंदु शेखर यांनी हि नोटीस बजावली आहे. या नोटीसमध्ये गडकरी यांनी आरोप केला आहे की, काँग्रेस पक्षाने भारतीय जनता पक्षांतर्गत मतभेद आणि फूट पाडण्याच्या हेतूने मुलाखतीचा संदर्भ बदलला आहे. तसेच त्याचे विकृतीकरण केले आहे.
या कायदेशीर नोटीसमध्ये असे म्हटले आहे की, "या गैर कृत्याचा पाठपुरावा करत असताना काँग्रेस पक्षाने, माझ्या अशिलाची मुलाखतीला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच हा व्हीडीयो विकृत करून आणि आपल्या 'X' हँडलवर अपलोड करून त्याचे सादरीकरण केले आहे या व्हीडीयोमधील माहीती अपूर्ण आणि अर्थ विरहित आहे."
या नोटीसीमध्ये पुढे लिहीताना, "काँग्रेसने आपल्या X वॉलवर अशा प्रकारच्या निंदनीय सामग्रीमुळे माझ्या क्लायंटच्या प्रतिष्ठेला तसेच "भाजप" या राजकीय पक्षाच्या प्रतिष्ठेला मोठी हानी पोहोचली आहे, तुमच्या पोस्टमधील मजकूर मोठ्या संख्येने सोशल नेटवर्किंग साइट्सवर शेअर केला आणि पाहिला गेला आहे, ज्यामुळे माझ्या क्लायंटची प्रतिष्ठा, बदनामी आणि विश्वासार्हतेचे मोठे नुकसान झाले आहे," असे म्हटले आहे.
शेवटी लिहीताना त्यांनी "नोटीस मिळाल्यानंतर २४ तासांच्या आत काँग्रेस पक्षाच्या सोशल मीडिया हँडलवरून पोस्ट हटवावी. तसेच काँग्रेस पक्षाने नितीन गडकरींची ३ दिवसांत माफी मागावी," असे आवाहनही करण्यात आले आहे. जर काँग्रेसने अशा प्रकारची माफी मागितली नाही तर काँग्रेस नेत्यांवर दिवाणी आणि फौजदारी अशा सर्व प्रकारची कारवाई करण्यासाठी कायदेशीर बाबी केल्या जातील असाही इशारा देण्यात आला आहे.