काँग्रेस अधिवेशन: राहुल गांधी अभिमन्यू की अर्जुन होणार?
पुढील महिन्यात अहमदाबादमध्ये होत असलेले कॉंग्रेसचे अधिवेशन म्हणजे राहुल गांधींना उशिरा सुचलेले शहाणपण आहे का? असा कोणी प्रश्न विचारला तर तो गैरलागु ठरणार नाही. गेल्या 10-11 वर्षात पक्षात त्याच्या पराभवाबद्दल फारशी काही चर्चाच झालेली नाही. होऊ दिली गेलेली नाही असे जर कोणी म्हटले तरी ते फारसे चुकीचे ठरणार नाही. दरबारी राजकारणाने काँग्रेसचे बारा वाजले हे जेव्हढे खरे तेव्हढेच पक्षात शिरलेल्या ‘सूर्याजी पिसाळांनी’ देखील आतून आणि बाहेरून पोखरून त्याची धूळधाण उडवली हे देखील तितकेच खरे. पण अशा दगाबाजांना ओळखण्यात पक्षनेतृत्व अगदीच लेचेपेचे ठरले हेही तितकेच खरे. त्यात सोनिया गांधी जेव्हढ्या दोषी तेव्हढे राहुल आणि प्रियंका देखील...
नरेंद्र मोदी आणि त्यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या भाजपमुळे काँग्रेसपुढे कशा पद्धतीचे आव्हान उभे राहिले आहे आणि त्याचा मुकाबला करण्यासाठी काय काय केले पाहिजे याची साधकबाधक चर्चा काँग्रेसमध्ये गेल्या दहा वर्षात झालेली नाही हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे. मोदींनी एका वेगळ्या पद्धतीचे राजकारण पुढे आणून काँग्रेससह सर्व राजकीय पक्षांसमोर अस्तित्वाचा प्रश्न उभा केलेला आहे. आपली गाठ कोणाशी पडलेली आहे हेच काँग्रेसला न कळल्याने त्याने भाबडे राजकारण केले तर त्याचे शिरकाण झाल्याशिवाय कसे राहणार? ज्या दिवशी ‘या टोपीमागे दडलेय काय? या मुकुटामागे दडलेय काय?’ याचा पत्ता काँग्रेसला लागेल तेव्हा त्याचे दिवस पालटायला सुरुवात होईल.
अजूनतरी काँग्रेसला आशेचा किरण दिसत नाही आहे. गेल्याच आठवड्यात हरयाणामध्ये दहा शहरात महापौरपदाच्या निवडणूका झाल्या त्यात काँग्रेसच्या हाती भोपळा लागला. नऊ पदे भाजपने पटकावली आणि उरलेले एक पद एका अपक्षाने. दहा वर्षांपूर्वी हरयाणात काँग्रेसचा दबदबा होता. आता विरोधी पक्षनेता कोण असावा यावर सुरु असलेला वाद श्रेष्ठींना गेली जवळजवळ सहा महिने सोडवता येत नाही आहे. गेल्या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीत भाजपला स्वबळावर बहुमत न मिळून एक धक्का बसला असला तरी त्यानंतर मोदींनी येन केन प्रकारेण हरियाणा, महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये विरोधकांचा पाडाव करून परत आपले वर्चस्व कसे निर्माण केले हे गैरभाजप पक्षांना कोडे राहिलेले आहे.
गांधी परिवार हाच काँग्रेसमधील खरे हाय कमांड राहिल्याने त्याच्याभोवतीच स्तुतिपाठकांची जी जबर गर्दी झाली त्यानेच पक्षाचा गळा घोटला गेला. गुलाम नबी आझाद यांच्यासारख्या नादान नेत्याला पक्षात जे मोठे स्थान मिळाले ते या परिवारामुळेच. आझाद यांच्यासारख्या झारीतील शुक्राचार्यांनी एकीकडे निष्ठावंत मंडळींचे शिरकाण केले तर दुसरीकडे भाजपशी संगनमत करून पक्षाचे वाटोळे केले. राज्यसभेत विरोधी पक्षनेतेपद मिळवलेल्या आझादसाहेबांच्या ‘थोरवी’बाबाबत ज्या दिवशी साक्षात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गोडवे गायले तेव्हा कोठे पक्षाला खडबडून जाग आली असे म्हणणे अतिशयोक्ती ठरणार नाही.
सोनियांच्या पक्षाध्यक्षपदाच्या कारकिर्दीत काँग्रेसचे सर्वेसर्वा राहिलेले अहमद पटेल यांना पक्षाने भरपूर ताकद देऊनदेखील आपल्या गृहराज्यात-गुजरातमध्ये-त्यांना पक्ष का बांधता आला नाही आणि तिथे भाजप आणि विशेषत: मोदींचा प्रभाव का वाढला याबाबत कोणी जाहीरपणे फारसे बोलत नसले तरी त्यांच्याविषयी चांगले बोलणारे पक्षात आता फारसे कोणी आढळत नाही, यावरून प्रत्येकाने काय ते ठरवावे. कोविडच्या महामारीत पटेल यांचे निधन झाल्यामुळे त्यांच्या कारकिर्दिबाबत अळी मिळी गुप चिळी पाळली जात आहे इतकेच.
गमतीची गोष्ट अशी की अहमदभाईंची मुलगी मुमताज पटेल आम्हाला पक्षात कोणी विचारत नाही असा आता कांगावा करत आहे. राहुल यांनी पक्षाची सूत्रे हाती घेतल्यानंतर गुलाम नबी तसेच अहमदभाईंचे पक्षातील वजन कमी झाले हे खरे असले तरी तोपर्यंत फार उशीर झालेला होता. एकीकडे घर उघडे ठेवून मोरीला बोळा लावण्याचा तो प्रकार होता. पक्षात असे बरेच ‘गुलाम नबी’ जागोजागी होते. गुलाम नबी आणि अहमदभाई यांच्यावर दोषारोपण करून गांधी घराणे नामानिराळे होऊ शकत नाही. उंटावरून शेळ्या हाकण्याचे राजकारण केले की असे होणारच. पक्षात स्तुतिपाठकांची एव्हढी चांदी झाली की प्रत्येकाने गणेश परिक्रमेचा मार्ग चोखाळला, पक्षश्रेष्ठींची भरभरून स्तुती करून आपले चांगभले करून घेतले. ‘गणेश परिक्रमा’ म्हणजे गांधी घराण्याभोवती घोटाळणे आणि प्रत्यक्ष काहीही काम न करणे. एव्हढेच नव्हे तर जे कष्टाळू आणि निष्ठावान कार्यकर्ते असतील त्यांना पुढे येऊन न देणे.
2018 मध्ये राहुलनी राजस्थानमध्ये सचिन पायलट आणि मध्यप्रदेशमध्ये ज्योतिरादित्य शिंदे यांना मुख्यमंत्री न बनवून एक चांगली संधी घालवली. अशोक गेहलोत, दिग्विजय सिंग आणि अहमद पटेल यांचे पक्षात एक ताकदवान त्रिकुट होते त्याला ते बळी पडले असे जाणकार मानतात. एका राजकीय निरीक्षकाने काँग्रेसची एक गमतीशीर पण गंभीर गोची फार मजेशीरपणे सांगितली आहे. स्वातंत्र्योत्तर काळात बहुधा सत्तेत राहिल्याने काँग्रेसला सत्तेचे राजकारण कळते आणि सत्तेत नसली तर आपण केव्हा परत सत्तेत येतो याच्याकडे ती बघत राहते. तिने कधी विरोधी पक्षाचे राजकारणच केले नसल्याने सरकारविरुद्ध रान कसे पेटवायचे हे तिला कळतच नाही आणि जरी कळले तरी वळत
नाही.
‘कालचा पाऊस आमच्या गावात आलाच नाही, आसवांच्या पाण्यावर आम्ही सारी पिके काढली’, अशी कैफियत एका दलित कवीने मांडली होती. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात सिंहाचा वाटा असलेल्या काँग्रेसच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची गेल्या दशकभरात असेच काहीसे स्वगत राहिले आहे. ते कितपत आणि कशा पद्धतीने बदलणार याची दशा आणि दिशा गुजरातमध्ये ठरेल अशी अपेक्षा आहे. ती कितपत खरी ठरणार ते येणारा काळ दाखवणार आहे. प्रत्येक पक्षाच्या प्रभावाची एक एक्सपायरी डेट असते. गेल्या तीन लोकसभा जिंकून भाजप अजेय बनलेली आहे काय? त्याच्या आक्रमक हिंदुत्वाला टक्कर वेगळ्या प्रकारे मिळणारच नाही काय?
बेळगावच्या कमांडो स्कूलचे ब्रीद वाक्य आहे wपह tप gदग्हु gाts tदल्gप्, tप tदल्gप् gाt gदग्हु. अर्थात जेव्हा परिस्थिती खडतर असते तेव्हा कणखर माणसे तिला बदलवतात. काँग्रेसची कसोटीची घडी आलेली आहे. देशाची कणखर नेता म्हणून ख्याती पावलेल्या इंदिरा गांधीची आण, बाण, शान त्यांच्या नातवांत आणि अनुयायी वर्गात किती भिनली आहे त्यावर पक्षाचा लौकिक परत येणार का हे ठरणार आहे. कसोटीची घडी आहे. विरोधक जणू वैरी बनले आहेत अशी अजब स्थिती उत्पन्न झालेली आहे, केली गेलेली आहे. ती बदलण्यासाठी कडक निर्धार तर हवाच पण प्रभावी रणनिती, रणांगणातीतील चपळता आणि कडवे पाठीराखे देखील हवेत. हे काम तेवढे सोपे नाही. गुजरातच्या भूमीतून दांडी यात्रेद्वारे सविनय सत्याग्रहाचा मंत्र महात्मा गांधींनी दिला होता आणि इंग्रजांना पळून लावले होते. अहमदाबादला काँग्रेस काय रसायन शिजवणार आहे त्याकडे देशाचे लक्ष लागले आहे. एक गोष्ट खरी ती ही की पप्पू म्हणून जबर हिणवले गेलेले राहुल गांधी हेच सरकारचे प्रमुख विरोधक आहेत हा संदेश फार दूरवर गेलेला आहे. सत्ताधारी वरकरणी काहीही म्हणोत त्यांची नजर देखील अहमदाबादवर असणार आहे. 2014 नंतर प्रथमच कोणत्याही पक्षाने राज्यकर्त्या विरोधात आवाज उठवण्यासाठी मोदींच्या कर्मभूमीची निवड केलेली आहे.
काँग्रेस अधिवेशनाने राहुल गांधी हे अभिमन्यू की अर्जुन ठरणार हे दिसणार आहे. अभिमन्यू शूर होता पण त्याला चक्रव्यूह भेदता आला नाही. अर्जुनाने कौरवांचा पराभव करून बाजी मारली. राजकारणामध्ये अंतिम परिणाम महत्त्वाचा असतो. ‘जो जिता वो सिकंदर’ ठरतो.
सुनील गाताडे