काँग्रेसची दुसरी यादी आज; कर्नाटकातील 14 मतदारसंघांसाठी उमेदवार अंतिम
बेळगावमधून मृणाल, चिकोडीतून प्रियांका जारकीहोळींच्या नावाची घोषणा शक्य
प्रतिनिधी/ बेंगळूर
काँग्रेस पक्षाने उमेदवारांच्या पहिल्या यादीत 7 लोकसभा मतदारसंघांसाठी उमेदवारांची घोषणा केली होती. आता दुसऱ्या यादीची प्रतीक्षा असून ती बुधवारी जाहीर होणार आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी नवी दिल्ली येथे काँग्रेसच्या राष्ट्रीय निवडणूक समितीच्या (सीईसी) बैठकीनंतर ही माहिती दिली आहे. मंगळवारी काँग्रेसच्या सीईसीच्या बैठकीत कर्नाटकातील 14 मतदारसंघांसाठी उमेदवार अंतिम करण्यात आल्याचे सुत्रांनी सांगितले आहे. बैटकीत बेळगाव मतदारसंघातून मृणाल हेब्बाळकर, चिकोडी-सदलग्यातून प्रियांका जारकीहोळी आणि कारवारमधून अंजली निंबाळकर यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाल्याचे समजते.
काँग्रेसने पहिल्या उमेदवार यादीत विजापूर, हावेरी, शिमोगा, तुमकूर, बेंगळूर ग्रामीण, हासन आणि मंड्या या सात मतदारसंघांसाठी उमेदवार जाहीर केले होते. आता दुसऱ्या यादीत 14 उमेदवारांचा समावेश असेल, असे सांगितले जात आहे. मंगळवारी नवी दिल्ली येथे झालेल्या काँग्रेसच्या राष्ट्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार सहभागी झाले होते. या बैठकीत 17 मतदारसंघांसाठी उमेदवारांची निवड झाली. त्यापैकी 14 मतदारसंघांसाठी उमेदवार निवड अंतिम करण्यात आली आहे. चामराजनगर, चिक्कबळ्ळापूर, बळ्ळारी आणि कोलार या मतदारसंघातील उमेदवार निवडीवर निर्णय झाला नसल्याचे सुत्रांनी सांगितले आहे.
राज्यातील अनेक विद्यमान मंत्र्यांनी लोकसभेची निवडणूक लढविण्यास नकार दिला आहे. त्यामुळे काँग्रेसची दुसरी उमेदवार यादी जाहीर होण्यास विलंब झाला आहे. दुसऱ्या यादीत अनेक नेत्यांच्या कुटुंबातील सदस्यांनाच लोकसभा निवडणुकीसाठी तिकीट दिले जाणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. जावई, सून, मुले-मुलींना तिकीट मिळवून देण्यासाठी अनेकांनी कसरत केली आहे.
काही दिवसांपूर्वी भाजपमधून काँग्रेसप्रवेश केलेल्या माजी खासदार जयप्रकाश हेगडे यांना उडुपी-चिक्कमंगळूर लोकसभा मतदारसंघातून तिकीट निश्चित झाले आहे. कारवारमध्ये माजी आमदार अंजली निंबाळकर यांचे नाव याआधीपासूनच चर्चेत होते. त्यामुळे त्यांच्या नावाची बुधवारी अधिकृत घोषणा होऊ शकते. धारवाड मतदारसंघात विनोद असुटी, बागलकोटमधून संयुक्ता पाटील यांच्या नावांवर शिक्कामोर्तब झाल्याचे सांगितले जात आहे. बिदरमधून राजशेखर पाटील किंवा सागर खंड्रे यांच्यापैकी एकाला तिकीट मिळेल.
उमेदवार निवडीवर बैठकीत अंतिम निर्णय : सिद्धरामय्या
काँग्रेसच्या निवडणूक समितीची बैठकीनंतर नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी, काँग्रेसच्या उमेदवारांची दुसरी यादी बुधवारी जाहीर केली जाणार आहे. कर्नाटकातील उर्वरित मतदारसंघांसाठी उमेदवार यादी पक्षश्रेष्ठींकडून जाहीर होणार आहे. दिल्लीतील पक्षाच्या निवडणूक समितीच्या बैठकीत राज्यातील उर्वरित मतदारसंघातील उमेदवार निवडीवर चर्चा केली असून यादी अंतिम केली आहे, असे सांगितले.
काँग्रेसचे संभाव्य उमेदवार
बेळगाव मृणाल हेब्बाळकर
चिकोडी-सदलगा प्रियांका जारकीहोळी
कारवार अंजली निंबाळकर
बागलकोट संयुक्ता पाटील
हुबळी-धारवाड विनोद असुटी
कलबुर्गी राधाकृष्ण दोडमनी
कोप्पळ राजशेखर हिटनाळ
मंगळूर पद्मराज
उडुपी जयप्रकाश हेगडे
चित्रदुर्ग चंद्रप्पा
दावणगेरे डॉ. प्रभा मल्लिकार्जुन
बेंगळूर दक्षिण सौम्या रे•ाr
बेंगळूर सेंट्रल मन्सूर अली खान
रायचूर कुमार नायक