For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

काँग्रेस रोड की कचरा डेपो?

03:01 PM Feb 27, 2026 IST | Tarun Bharat Portal
काँग्रेस रोड की कचरा डेपो
Advertisement

बेळगाव : स्वच्छ व सुंदर बेळगाव बनविले जात आहे. अशी फुशारकी मारली जात असली तरी प्रत्यक्षात परिस्थिती मात्र वेगळीच आहे. रस्त्याच्या कडेला कचरा टाकल्याचे आजपर्यंत सर्वांनी ऐकले व पाहिले आहे. मात्र बुधवारी रात्री काँग्रेस रोडवर भलताच प्रकार उघडकीस आला आहे. चक्क रस्त्यावर कचरा वाहतूक करणाऱ्या वाहनातील कचरा टाकण्यात आल्याने अक्षरश: गलिच्छ स्वरुप प्राप्त झाले. याबाबतचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून मनपाच्या कारभाराबाबत संताप व्यक्त केला जात आहे. कचरावाहू वाहनातून कचरा रस्त्यावर पडण्याचे प्रकार घडत आहेत.

Advertisement

त्यामुळे याचा नाहक त्रास वाहन चालक व नागरिकांना सहन करावा लागत आहे. दिवसा व रात्री उशीरापर्यंत शहर व उपनगरात कचऱ्याची उचल केली जात असल्याचे सांगितले जात आहे. पण पुढचे पाठ, मागचे सपाट या म्हणीप्रमाणे वाहनातील कचरा रस्त्यावर पडत आहे.नेहमी वर्दळीचा असलेल्या काँग्रेस रोडवर जवळपास 50 फुटापर्यंत मोठ्या प्रमाणात कचरा पडला होता. सदर कचरा जाणूनबुजून टाकून दिला की मनपाच्या वाहनातून पडला याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत. बुधवारी रात्री काँग्रेस रोडवरील एसबीआय बँकेसमोर रस्त्याच्या मधोमधच कचऱ्याचे ढीग पडले होते. त्यामुळे दुर्गंधी पसरली. त्यातूनच वाहने ये-जा करीत होती. कचऱ्यातील अन्न खाण्यासाठी भुटकी कुत्रीही त्या ठिकाणी जमली. मनपाच्या आंधळ्या कारभाराबाबत छी-थू व्यक्त करण्यात आली.

Advertisement
Advertisement
Tags :

.