दिल्ली दुर्घटनेची माहिती शहांना उशिरा का मिळाली? केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना काँग्रेसचा प्रश्न
पणजी: दिल्लीमध्ये रविवारी दि. 08 रोजी दुपारी सुमारे 1.30 वाजता घडलेल्या इमारत दुर्घटनेनंतर सुमारे 4 तासांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गोव्यात सायंकाळी 5.30 वाजता भाजप भवनाचे उद्घाटन केले. या पार्श्वभूमीवर गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी अमित शहा आणि भाजप सरकारवर तीव्र टीका केली.
चोडणकर म्हणाले की, दिल्लीतील इमारत दुर्घटनेच्या जवळपास 4 तासांनी गोव्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भाजप भवनाचे उद्घाटन केले. दिल्लीतील दुर्घटनेची माहिती असतानाही त्यांनी उद्घाटनाचा कार्यक्रम सुरू ठेवला असेल, तर ते मानवी दुःखाबद्दलची अत्यंत असंवेदनशीलता दर्शवते.
जर एवढ्या गंभीर घटनेची माहिती त्यांना जवळपास 4 तासांनंतरही मिळाली नसेल, तर केंद्रीय गृह मंत्रालयाच्या माहिती, गुप्तचर आणि संवाद यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण होते, असे चोडणकर यांनी म्हटले.
अमित शहा मौन बाळगून या प्रश्नांपासून पळ काढू शकत नाहीत. दोन्ही परिस्थितींमध्ये अमित शहा यांनी देशाला उत्तर द्यायला हवे. दुर्घटनेची माहिती होती तर उद्घाटनाचा उत्सव का सुरू ठेवला आणि माहिती नव्हती तर राजधानीत घडलेल्या एवढ्या गंभीर दुर्घटनेची माहिती केंद्रीय गृहमंत्र्यांपर्यंत तातडीने का पोहोचली नाही, असा सवाल चोडणकर यांनी केला.