पेट्रोल-डिझेल, गॅस दरवाढविरोधात काँग्रेसची निदर्शने
राणी चन्नम्मा सर्कलमध्ये स्वयंपाक बनवून आंदोलन
त.भा.प्रतिनिधी
बेळगाव : वाढती महागाई, पेट्रोल-डिझेलचे वाढलेले दर आणि घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत झालेल्या वाढीच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाच्यावतीने शनिवारी चन्नम्मा सर्कलमध्ये जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी महिला कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच स्वयंपाक बनवून केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात अनोख्या पद्धतीने आंदोलन केले. तसेच गॅस सिलिंडर डोक्यावर घेऊन दरवाढीविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
प्रारंभी कन्नड साहित्य भवनमध्ये एकत्रित येऊन मोर्चा काढण्यात आला. तसेच राणी चन्नम्मा सर्कलमध्ये मानवी साखळी करून रास्तारोको करण्यात आला. काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करत सर्वसामान्य जनतेवर वाढत्या महागाईचा परिणाम होत असल्याचा आरोप केला. पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या वाढत्या किमतीमुळे सामान्य नागरिक, महिला, शेतकरी, कामगार आणि मध्यमवर्गीय कुटुंबांचे आर्थिक गणित कोलमडले असून याला केंद्र सरकार जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आला.
आंदोलनादरम्यान महिला कार्यकर्त्यांनी चूल बनवून स्वयंपाक करून वाढत्या इंधन दरामुळे घरगुती बजेटवर पडणारा ताण प्रतिकात्मक स्वरुपात मांडला. जीवनावश्यक वस्तूंच्या किमती सातत्याने वाढत असून सर्वसामान्य नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे. महागाईमुळे गृहिणींच्या घरखर्चाचे बजेट बिघडले असून शेतकरी व कामगारवर्गालाही त्याचा मोठा फटका बसत आहे. केंद्र सरकारने जनतेच्या समस्यांकडे दुर्लक्ष न करता तातडीने उपाययोजना कराव्यात. अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला. आंदोलनादरम्यान चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.