काश्मीरमध्ये भाषणावेळी काँग्रेस अध्यक्ष खर्गे बेशुद्ध
वृत्तसंस्था/ जम्मू
जम्मू-काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यात एका सभेला संबोधित करताना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे व्यासपीठावरच बेशुद्ध पडले. कठुआ येथे प्राण गमावलेल्या कॉन्स्टेबलला श्र्रद्धांजली वाहताना ते बोलत होते. भाषण सुरू असताना खर्गे यांचा आवाज क्षीण झाला आणि ते अचानक बेशुद्ध झाले. यादरम्यान समोर उपस्थित लोकांमध्ये गोंधळ उडाला. मंचावर उभ्या असलेल्या मान्यवरांनी त्यांना आधार देऊन बसवले. काही वेळात बरे झाल्यानंतर ते पुन्हा भाषणासाठी उभे राहिले. ‘मी 83 वर्षांचा आहे, पण मी इतक्मया लवकर मरणार नाही. जोपर्यंत मोदींना हटवले जात नाही तोपर्यंत मी जिवंत असेन. जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा यासाठी काँग्रेस पक्ष प्रयत्न सुरूच ठेवेल,’ असे वक्तव्य त्यांनी केले.
जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा परत आणू, असे मल्लिकार्जुन खर्गे यांनी 22 सप्टेंबरला जम्मूमध्ये पत्रकार परिषदेत सांगितले होते. काश्मीरला राज्याचा दर्जा परत आणणे ही काँग्रेसची प्राथमिकता आहे. राज्याला यापूर्वी कधीही केंद्रशासित प्रदेश बनवण्यात आले नव्हते. जम्मू-काश्मीरसाठी काँग्रेसच्या जाहीरनाम्याचा संदर्भ देत आम्ही राज्यासाठी सात आश्वासने दिली आहेत. आमचे पहिले वचन जम्मू- काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा बहाल केला जाईल, असे खर्गे म्हणाले.