आरक्षण संपविण्याचा काँग्रेसचा डाव
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप
पुणे / प्रतिनिधी
मराठी भाषेला अभिजात देण्याची मागणी काँग्रेसने नव्हे, तर आम्ही पूर्ण करून दाखवली. विदेशी गुलामगिरी मानसिकता असलेल्या काँग्रेसने महाराष्ट्राचा सातत्याने अपमान केला आहे. काँग्रेसने आजवर केवळ तुष्टीकरणाचेच राजकारण केले आहे. ओबीसी, एससी, एसटी यांच्यात वाद निर्माण करून आरक्षण संपविण्याचा काँग्रेसचा डाव आहे, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी पुण्यात केला. अशा काँग्रेसपासून जनतेने सावध राहावे. हम एक रहेंगे, तो सेफ रहेंगे, असा नाराही त्यांनी दिला.
पुणे जिह्यातील 21 आणि सातारा जिह्यातील दहा अशा एकूण 31 विधानसभा मतदासंघातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांत पाटील, दिलीप वळसे पाटील, खासदार उदयनराजे व अन्य नेते उपस्थित होते. याप्रसंगी केशव शंखनाद ग्रुप यांनी शंखनाद करत उपस्थितांची मने जिंकली.
लाडक्या बहिणींचा माझा प्रमाण, अशी भाषणाची सुऊवात करून मोदी म्हणाले, की मी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात गेलो, तेथे जनतेचे मोठे समर्थन मला अनुभवायला मिळाले. आता पुण्यातही तोच अनुभव मला मिळत आहे. पुणे व भाजपाचे नाते आगळे आहे. हे आस्थेचे नाते आहे. पुण्याने कायम भाजपाच्या विचारांना समर्थन दिले. या विश्वासासाठी मी पुण्याच्या जनतेचे आभार मानतो. महायुतीचे हे सरकार पुण्यात व महाराष्ट्रास वेगाने काम करेन. पुण्याच्या विकासाला पुढच्या पाच वर्षांत नवी भरारी देऊ. मागच्या काही वर्षांत देशात मोठी परकीय गुंतवणूक झाली असून, यात महाराष्ट्र आघाडीवर आहे. आयटी आणि इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात या भागात नवी गुंतवणूक होत असून स्टार्टअपद्वारे तऊणांना लाभ मिळाला आणि रोजगार निर्मिती झाली, असे सांगत विकासकामांचा पाढा मोदींनी वाचला,
आघाडीच्या सत्ताकाळात सांगण्यासारखे काही झाले नाही. म्हणून विकासासाठी एकच विकल्प महायुती हा आहे. महायुतीतूनच राज्याची गती आणि प्रगती आहे. काँग्रेसच्या कट करस्थानाचा भाग कर्नाटकमध्ये दिसून येत आहे. तिथे सरकार बनले, पण काँग्रेसने निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली नाही. केवळ घोटाळे समोर येत आहेत. या लुटीचा पैसा महाराष्ट्रामध्ये पाठवून निवडणूक लढवली जात आहे. राज्याला वाचवण्यासाठी काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवले पाहिजे. काँग्रेसने जम्मू काश्मीर विधानसभेत कलम 370 पुन्हा लागू करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. काँग्रसने आजवर केवळ तुष्टीकरणाचे राजकारण केले. समाजासमाजात त्यांना भांडणे लावायचे असून, आरक्षण संपविण्याचा त्यांचा डाव आहे. ही निवडणूक केवळ महाराष्ट्रासाठी नव्हे, तर देशासाठी महत्त्वाची आहे. म्हणूनच सर्वांनी एक रहावे. एक राहू, तर सुरक्षित राहू, हा मंत्र लक्षात ठेवा.