किणी टोल नाक्यावर काँग्रेसचा ठिय्या अन् रास्ता रोको! खड्डेमय कोल्हापूर-पुणे महामार्गावरील टोल आकारणीविरोधात काँग्रेस रस्त्यावर
तब्बल अडीच तास ठिय्या आणि अर्धा तास केला रास्ता रोको; नाक्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा; राज्य आणि केंद्रसरकारचा केला तीव्र निषेध; आंदोलनानंतर 25 टक्के टोलमाफी असल्याचे केले स्पष्ट; उर्वरित 25 टक्के टोलमाफीबाबत पाठपुरावा करण्याची लेखी ग्वाही; 20 किलोमीटर परिघीय क्षेत्रातील गावांमधील नागरीकांना टोल नाही.
कोल्हापूर प्रतिनिधी
खड्डेमय कोल्हापूर-पुणे महामार्गावरील टोल आकारणीविरोधात काँग्रेस पक्षाच्यावतीने विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली किणी टोल नाक्यावर ठिय्या आंदोलन करून राज्य आणि केंद्र सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला. ‘रस्ता नाही, टोल नाही’, ‘टोल नाही, टोला द्या’ अशा विविध घोषणा देत रस्ता दुरुस्त होईपर्यंत टोल आकारणी करू नये अशी आग्रही मागणी करण्यात आली. पण सुमारे अडीच तासांच्या ठिय्या आंदोलनानंतरही टोल सवलतीबाबत सकारात्मक निर्णय झाला नसल्यामुळे आक्रमक झालेल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अर्धा तास रस्तारोको केला. याची गंभीर दखल घेत सद्यस्थितीत टोल आकारणीमध्ये 25 टक्के सवलत असून आणखी 25 टक्के सवलत देण्यासाठी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करण्याची ग्वाही राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक वसंत पंदारकर यांनी पत्राद्वारे दिली. तसेच टोल नाक्यापासून 20 किलोमीटर परीघीय क्षेत्रातील गावांना 100 टक्के टोलमाफी देण्याचे जाहीर केले. त्यामुळे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.
कोल्हापूर-पुणे महामार्गावरील खड्यांमुळे गेल्या अनेक महिन्यांपासून वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम सुरु असल्यामुळे सर्विस रोडवरून वाहतूक सुरु आहे. पण हे सर्विस रोड खड्डेमय झाले असतानाही टोल आकारणी सुरु आहे. त्यामुळे अडथळ्यातून प्रवास सुरु असतानादेखील टोल आकारणी का केली जात आहे ? असा प्रश्न उपस्थितीत करून आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली सकाळी 10 वाजत जोरदार आंदोलन सुरू झाले. सुमारे अडीच तास नाक्याच्या एक लेनमध्ये ठिय्या मारून खड्डेमय रस्त्याच्या टोल आकारणीचा तीव्र निषेध करण्यात आला. यावेळी रस्ता दुरुस्त करेपर्यंत टोल मध्ये किमान 50 टक्के सवलत द्यावी आणि नाक्यापासून 20 किलोमीटर अंतरावरील गावातील नागरिकांकडून टोल आकारणी करू नये अशी यावेळी मागणी करण्यात आली. पण या मागणीबाबत राष्ट्रीय महामार्ग विभाग अथवा शासनाकडून सकारात्मक निर्णय जाहीर केला नसल्यामुळे अखेर आक्रमक झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी टोल नाक्याच्या चारही लेनच्या रस्त्यावर ठिय्या मारून दुपारी पावणे एकच्या सुमारास रास्ता रोको आंदोलन सुरू केले. यावेळी राज्य आणि केंद्र सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला. रास्ता रोको आंदोलनामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.
या आंदोलनात लॉरी ऑपरेटर असोसिएशन, जिल्हा वाळू टॅक वाहतुकदार संस्थेने सहभाग नोंदवून खराब रस्ता आणि टोल आकारणीचा निषेध केला. आमदार ऋतुराज पाटील, आमदार राजुबाबा आवळे, आमदार जयश्री जाधव ,आमदार जयंत आसगावकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पी. पाटील, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
आंदोलन सुरु झाल्यानंतर वाहने झाली टोलमुक्त
काँग्रेसच्यावतीने सकाळी 10 वाजता किणी टोलनाक्यावर रास्तारोको आंदोलन सुरु केल्यानंतर नाक्यावरील टोलवसुली तत्काळ बंद करण्यात आली. फास्टॅगद्वारे केले जाणारी टोल वसुलीची स्कॅनिंग प्रक्रिया बंद केली. त्यामुळे सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत नाक्यावरून जाणारी हजारो वाहने टोलमुक्त झाली. याबाबत प्रवाशांकडून समाधान व्यक्त करण्यात आले.
आंदोलन तात्पुरते स्थगित, 1 महिन्याचा अल्टिमेटम
‘खड्ड्यांनी भरलेल्या कोल्हापूर पुणे महामार्गावर टोल का द्यायचा ? महामार्गाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. मोठया खड्ड्यांमुळे महामार्गावरुन वाहन चालविताना वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. जानेवारी महिन्यातच रस्त्याची दुरुस्ती करायला हवी होती. महामार्गाचे सहापदरीकरणाचे काम सुरू आहे, मात्र सर्विस रोड चांगले करायला हवे होते. वाहनधारकांना भेडसावणाऱ्या प्रश्नाबाबत काँग्रेसने आंदोलन केले. वाहनधारकांना त्रास होणार नाही याची खबरदारी घेत या मार्गावरील चार टोल नाक्यांवर आंदोलन करण्यात आले. सर्विस रोड चांगले नसतील तर टोल देणार नाही अशी आम्ही भूमिका घेतल्यामुळे अखेर राष्ट्रीय महामार्ग विभागाने टोल आकारणीमध्ये 25 टक्के सवलत दिली असल्याचे स्पष्ट करून आणखी 25 टक्के सवलत देण्यासाठी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली आहे. तसेच टोलनाका परिसरातील 20 किलोमीटर परिसरातील गावांतील नागरीकांना टोल 100 टक्के माफ केला आहे. त्यामुळे काँग्रेसच्यावतीने केलेले आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. पण दिलेल्या लेखी ग्वाहीनुसार कार्यवाही करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागास एक महिन्याची मुदत दिली आहे. या कालावधीत योग्य निर्णय झाला नाही तर पुढील काळात तीव्र आंदोलन केले जाईल.
आमदार सतेज पाटील, गटनेते विधान परिषद काँग्रेस