महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

पित्रोदांमुळे काँग्रेस पुन्हा बॅकफूटवर

06:56 AM May 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वर्णद्वेषी वक्तव्यामुळे राहुल गांधींचे मार्गदर्शक वादात : पदाचा द्यावा लागला राजीनामा  

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

लोकसभा निवडणुकीदरम्यान वादग्रस्त वक्तव्य करून सॅम पित्रोदा यांनी पुन्हा एकदा काँग्रेसला अडचणीत आणले आहे. तर दुसरीकडे वर्णद्वेषी वक्तव्यानंतर उभ्या ठाकलेल्या वादादरम्यान पित्रोदा यांना इंडियन ओव्हरसीज काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. पित्रोदा हे काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे मार्गदर्शक तसेच गांधी परिवाराचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. पित्रोदा यांनी भारताच्या विविध भागात राहणाऱ्या लोकांची वर्णभेदाद्वारे वादग्रस्त स्वरुपात तुलना केली होती. पित्रोदा यांनी ईशान्य भारतातील लोकांची तुलना चिनी तर दक्षिण भारतीयांची तुलना आफ्रिकन लोकांसोबत केली होती. पित्रोदा यांच्या या टिप्पणीमुळे ऐन निवडणुकीच्या काळात काँग्रेला बॅकफूटवर जावे लागले आहे.

सॅम पित्रोदा यांनी एका पॉडकास्टमध्ये भारताची विविधता दर्शविण्यासाठी केलेली तुलना ही अत्यंत दुर्दैवी आणि अस्वीकारार्ह आहे. काँग्रेस या उपमांपासून स्वत:ला पूर्णपणे दूर ठेवत असल्याचे म्हणत काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी याप्रकरणी सारवासारव केली आहे.

देशाच्या पूर्व भागात लोक चिनी आणि दक्षिण भारतात लोक आफ्रिकन लोकांसारखे दिसतात. आम्ही 75 वर्षांपासून सुखद वातावरणात राहत आहोत. येथे काही संघर्ष सोडले तर लोक सोबत राहू शकतात. आम्ही भारतासारख्या वैविध्यपूर्ण देशाला एकजूट ठेवू शकतो. पूर्व भारतातील लोक चिनींसारखे वाटतात. पश्चिम भारतातील लोक अरबांसारखे दिसतात. उत्तर भारतातील लोक श्वेतवर्णीय तर दक्षिण भारतीय लोक आफ्रिकनांसारखे वाटत असल्याचे पित्रोदा यांनी म्हटले होते.

पंतप्रधान मोदींनी साधला निशाणा

पित्रोदा यांच्या टिप्पणीचा दाखला देत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसला विभाजनकारी मानसिकतेचा पक्ष संबोधिले आहे. तमिळ संस्कृती आणि गौरवासाठी द्रमुक स्वत:च्या सहकारी पक्षासोबतचे नाते तोडणार काय? एका मोठ्या नेत्याने काँग्रेसची विभाजनकारी मानसिकता दाखवून दिली आहे. गांधी परिवाराचे निकटवर्तीय आणि काँग्रेसच्या युवराजाच्या सर्वात मोठ्या सल्लागाराने केलेले वक्तव्य अत्यंत लाजिरवाणे असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले आहे.

पित्रोदा काँग्रेसचे शकुनी

सॅम पित्रोदा हे काँग्रेस पक्षाचे शकुनी आहेत. इंडियन ओव्हरसीज काँग्रेस प्रमुखाच्या वर्णद्वेषी टिप्पणीने काँग्रेस पक्षाच्या धोकादायक आणि विभाजनकारी मानसिकतेला जगासमोर आणले असल्याचे भाजप प्रवक्ते सी. आर. केसवन यांनी म्हटले आहे. तर काँग्रेसने माफी मागावी अशी मागणी आसाम आणि मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

वारसा करावरूनही वाद

सॅम पित्रोदा यांनी यापूर्वी वारसा करावरून केलेले वक्तव्य काँग्रेसला अडचणीत आणणारे ठरले होते. अमेरिकेत 55 टक्के वारसा कर आकारला जातो. सरकार कुणाच्याही मृत्यूनंतर त्याच्या संपत्तीचा 55 टक्के हिस्सा ताब्यात घेते. संपत्ती जनतेसाठी सोडली जावी. भारतात अशाप्रकारचा कायदा आणला जावा असे सॅम पित्रोदा यांनी म्हटले होते. वारसा करासंबंधी पित्रोदा यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यामुळे काँग्रेसला निवडणुकीत फटका बसल्याचे मानले जातेय. पंतप्रधान मोदींनी हा मुद्दा उपस्थित करत काँग्रेसला लक्ष्य केले होते. यामुळे काँग्रेसने पित्रोदा यांच्या वक्तव्यापसून अंग झटकले होते.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article