अमेठीत राजकीय वातावरण तापले! राहुल गांधींची भारत जोडो यात्रा आणि इराणींचा जनसंवाद कार्यक्रम एकाच दिवशी
एकीकडे राहुल गांधींची भारत जोडो यात्रा, दुसरीकडे इराणींचा जनसंवाद कार्यक्रम
वृत्तसंस्था/ अमेठी
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा उत्तरप्रदेशातील प्रतागढ मार्गे अमेठी या स्वत:च्या पूर्वीच्या लोकसभा मतदारसंघात सोमवारी पोहोचली आहे. कधीकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेल्या अमेठीत भाजप नेत्या स्मृती इराणींकडून पराभव पत्करावा लागल्यावर राहुल हे यात्रेद्वारे पुन्हा पक्षाचा प्रभाव निर्माण करू पाहत आहेत. तर दुसरीकडे केंद्रीय मंत्री इराणी यांनी अमेठीत जाहीरसभेला संबोधित करत जनसंवाद कार्यक्रमात भाग घेतला आहे.
राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या स्वागतासाठी काँग्रेसकडून अमेठी जिल्ह्यात विविध 27 ठिकाणी स्वागत स्थळ निर्माण करण्यात आले होते. यात्रा अमेठीत पोहोचताच लोकांची मोठी गर्दी दिसून आली. राहुल गांधी हे सोमवारी रात्री अमेठीतच वास्तव्य करत स्थानिक कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असल्याचे समजते. यात्रेद्वारे लोकांना काँग्रेससोबत पुन्हा जोडण्याचा राहुल गांधींचा प्रयत्न असणार आहे. यात्रेदरम्यान महागाई, युवांना रोजगार आणि शेतकऱ्यांचे मुद्दे त्यांनी उपस्थित केले आहेत.
इराणी चार दिवसांच्या दौऱ्यावर
केंद्रीय मंत्री आणि खासदार स्मृती इराणी देखील सोमवारी चार दिवसीय दौऱ्यावर स्वत:च्या मतदारसंघात पोहोचल्या आहेत. दौऱ्याच्या पहिल्या दिवशी इराणी यांनी अमेठी विधानसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये जनसंवाद विकास यात्रेच्या माध्यमातून ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या. काँग्रेस आणि भाजप समर्थकांदरम्यान कुठल्याही प्रकारचा संघर्ष निर्माण होऊ नये म्हणून प्रशासनाने मोठा बंदोबस्त ठेवला होता. पोलीस तसेच राखीव दलाच्या जवानांना गौरीगंज-अमेठीत तैनात करण्यात आले होते.
मोदी केवळ भाषणं देतात : राहुल गांधी
राहुल गांधी यांनी स्वत:च्या यात्रेदरम्यान भाजप सरकार विशेषकरून पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. देशात 50 टक्के ओबीसी आणि 15 टक्के दलित आहेत. तर आदिवासींची संख्या 8 टक्के आहे. मोदी सरकार या सर्व समुदायांचे शोषण करत आहे. पंतप्रधान मोदींना अर्थसंकल्पाची कुठलीच माहिती नाही. आज केवळ 90 लोक देशाचे सरकार चालवत आहेत. मोदींचे निकटवर्तीय अर्थसंकल्पाचा पैसा कुठे जाणार हे ठरवत आहेत. मोदींना केवळ भाषणं देणे जमते. द्वेष फैलावण्यात ते पारंगत आहेत. अडानी आणि अंबानी यांनी मिळून मोदींना पंतप्रधानपदावर बसविल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला आहे.
अमेठीत इराणींचे घर
2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी राहुल गांधी यांच्या यात्रेदरम्यान खासदार इराणी देखील अमेठीत दाखल झाल्या. इराणी या दौऱ्यादरम्यान अमेठीत उभारलेल्या स्वत:च्या नव्या घरात प्रवेश करणार आहेत. अमेठीत पराभव पत्करावा लागल्यावर राहुल गांधी यांनी या मतदारसंघाकडे जणू पाठच फिरविली होती. तर दुसरीकडे इराणी यांनी अमेठीत स्वत:चे घर निर्माण करत मतदारसंघाशी असलेले स्वत:चे संबंध मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे. स्मृती इराणी याच अमेठीत भाजपच्या उमेदवार असतील असे मानले जात आहे, तर दुसरीकडे राहुल गांधी या मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची शक्यता कमी असल्याचे समजते. राहुल गांधी हे वायनाड मतदारसंघालाच प्राधान्य देणार असल्याची चर्चा आहे.