काँग्रेस खासदार इम्रान मसूद अडचणीत
आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी आरोप निश्चित
वृत्तसंस्था/ सहारनपूर
उत्तरप्रदेशच्या सहारनपूरचे काँग्रेस खासदार इम्रान मसूद यांच्या विरोधात आरोप निश्चित करण्यात आले आहेत. इम्रान मसूद यांच्या 2014 मधील लोकसभा निवडणुकीदरम्यान नरेंद्र मोदींना उद्देशून केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी आरोप निश्चित करण्यात आले आहेत. याप्रकरणी लवकरच निर्णय दिला जाऊ शकतो. दोन वर्षांपेक्षा अधिक कालावधीची शिक्षा झाली तर काँग्रेस खासदाराला स्वत:चे संसद सदस्यत्व गमवावे लागू शकते.
इम्रान मसूद यांच्यावर आता सत्र न्यायालयात खटला चालणार आहे. ज्या कलमांखाली आरोप निश्चित करण्यात आले आहेत त्यात 5-7 वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे. अशा स्थितीत न्यायालयाने दोषी ठरविले तर इम्रान मसूद यांचे संसद सदस्यत्व रद्द ठरू शकते.
इम्रान यांनी 10 वर्षांपूर्वी ‘बोटी-बोटी काट देंगे’ असे वक्तव्य पेले होते. याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. याप्रकरणी इम्रान यांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला होता. मसूद यांनी या वक्तव्यासाठी माफी मागितली होती. परंतु कायदेशीर कार्यवाही सुरू राहिली होती. नरेंद्र मोदी हे सहारनपूर येथे आले तर त्यांचे तुकडे तुकडे करू असे इम्रान यांनी म्हटले होते. तसेच त्यानी बसपच्या दोन आमदारांच्या विरोधातही आक्षेपार्ह टिप्पणी केली होती.