काँग्रेसच्या आमदारांची आज ‘रिसॉर्ट वारी’
विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस व्होटिंग टाळण्यासाठी खबरदारी : सायंकाळी विधिमंडळ पक्षाची बैठक
त. भा. प्रतिनिधी
बेंगळूर :
राज्य काँग्रेस पुन्हा एकदा रिसॉर्ट राजकारणाला सामोरे जात आहे. 18 जून रोजी होणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस व्होटिंगची शक्यता टाळण्यासाठी आणि काँग्रेसच्या उमेदवारांचा विजय सुरळीत व्हावा, यासाठी पक्षाच्या सर्व आमदारांना मंगळवारी बिडदीनजीकच्या रिसॉर्टमध्ये नेले जात आहे. त्याकरिता रिसॉर्टमधील 130 खोल्या बुक करण्यात आल्याचे समजते.
विधानपरिषदेच्या सात जागांसाठी काँग्रेसने पाच, भाजपने दोन आणि निजदने एक उमेदवार रिंगणात उतरविला आहे. निवडणुकीच्या अंतिम क्षणी आमदार फुटण्याची भीती असल्याने मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी मंगळवारी सायंकाळी काँग्रेसच्या आमदारांना बेंगळूद दक्षिण जिल्ह्यातील बिडदीजवळील रिसॉर्टमध्ये हलविण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवार व बुधवार असे दोन दिवस काँग्रेसच्या आमदारांचा मुक्काम रिसॉर्टमध्ये असेल. गुरुवारी तेथून थेट विधानसौधमध्ये त्यांना मतदानासाठी नेण्यात येईल. याच दरम्यान, मंगळवारी सायंकाळी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाची बैठक रिसॉर्टमध्ये होणार आहे.
विधानपरिषदेच्या 7 जागांसाठी 8 उमेदवार रिंगणात असल्याने, काँग्रेस पक्षाने आपल्या पाचही उमेदवारांना विजयी करण्याची रणनीती आखली आहे. त्यानुसार, काँग्रेसच्या आमदारांची मते केवळ काँग्रेसच्या उमेदवारांनाच मिळतील याची खात्री करण्यासाठी आमदारांना रिसॉर्टमध्ये हलविले जात आहे.
मुख्यमंत्री बनल्यानंतर मंगळवारी डी. के. शिवकुमार यांच्या नेतृत्वाखाली प्रथमच काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. या बैठकीत काँग्रेसचे राष्ट्रीय मुख्य सचिव आणि राज्य काँग्रेस प्रभारी रणदीप सिंग सुरजेवाला, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बी. के. हरिप्रसाद, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि पक्षाचे सर्व कार्याध्यक्ष सहभागी होणार आहेत. या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी काँग्रेसच्या विधानसभा आणि विधानपरिषदेच्या सर्व आमदारांना सूचना दिल्या आहेत.
बैठकीत विधानपरिषद निवडणुकीत कसे मतदान करावे, कोणत्या आमदाराने कोणत्या उमेदवाराला मतदान करावे, याबद्दल आमदारांना सूचना दिल्या जातील. विधानपरिषदेच्या निवडणुकीत प्रथम आणि द्वितीय पसंतीची मते देण्याची संधी आहे. पक्षाने नामनिर्देशित केलेल्या उमेदवारांना प्रथम पसंतीची मते देणाऱ्या आमदारांनी द्वितीय पसंतीची मते काँग्रेसच्या कोणत्या उमेदवाराला द्यावीत, याबाबत विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत सूचना दिल्या जातील.
प्रत्येक उमेदवाराला जिंकण्यासाठी 28 मतांची आवश्यकता आहे. काँग्रेस पक्षाला आपल्या 136 आमदारांव्यतिरिक्त अपक्ष आमदार दर्शन पुट्टण्णय्या आणि लता मल्लिकार्जुन यांचा पाठिंबा आहे. तसेच भाजपमधून हकालपट्टी झालेले आमदार एस. टी. सोमशेखर आणि शिवराम हेब्बरा यांचाही पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. या आकडेवारीनुसार काँग्रेसच्या पाचही उमेदवारांना जिंकण्यात कोणताही अडसर नाही.
18 जून रोजी मतदान
विधानपरिषदेसाठी 18 जून रोजी सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत मतदान होईल. सायंकाळी 5 नंतर मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाईल. या निवडणुकीत काँग्रेसकडून बी. के. हरिप्रसाद, तिप्पण्णप्पा कमकनूर, पी. व्ही. मोहन, मळवळ्ळी शिवण्णा, विनय कार्तिक, भाजपकडून लिंगराज पाटील आणि रघु कौटिल्य हे उमेदवार आहेत तर भाजपच्या पाठिंब्याने निजदचे गोविंदराजू रिंगणात आहेत.