For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मंत्रिपदासाठी काँग्रेस आमदारांची आज दिल्लीवारी

06:42 AM Apr 12, 2026 IST | Tarun Bharat Portal
मंत्रिपदासाठी काँग्रेस आमदारांची आज दिल्लीवारी
Advertisement

पोटनिवडणुकीनंतर राजकीय हालचाली पुन्हा गतिमान : 17 एप्रिलनंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री घेणार हायकमांडची भेट 

Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

विधानसभेची पोटनिवडणूक संपल्याने काँग्रेसच्या ज्येष्ठ आमदारांनी पुन्हा एकदा मंत्रिपदासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. राज्य मंत्रिमंडळ पुनर्रचनेच्या मुद्द्यावरून पक्षातील राजकीय हालचाली पुन्हा गतिमान झाल्या आहेत. 17 एप्रिलनंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार हे पक्षश्रेष्ठींना भेटणार आहेत. तत्पूर्वीच म्हणजे रविवार 12 एप्रिल रोजी 20 हून अधिक दिल्लीला रवाना होतील.

Advertisement

आमदार अशोक पट्टण, टी. बी. जयचंद्र यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे आमदार दिल्लीला जाणार आहेत. आमदारांनी काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी, पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, मुख्य सचिव के. सी. वेणुगोपाल, राज्य काँग्रेस प्रभारी रणदीप  सुरजेवाला यांना भेटण्याची तयारी केली आहे.

अनेक वर्षांपासून आम्ही पक्षासाठी काम करत आहोत. आम्हालाही एकदा मंत्रिपदाची संधी द्यावी. पक्ष सत्तेवर आला तेव्हा अडीच वर्षांनी संधी दिली जाईल, असे सांगण्यात आले होते. परंतु, सरकार स्थापन होऊन तीन वर्षे झाली आहेत, त्यामुळे आम्हाला उर्वरित दोन वर्षांसाठी तरी मंत्रिपद द्या. या संदर्भात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मंत्रिमंडळ पुनर्रचना करण्याचे निर्देश द्यावेत, अशी विनंती करणार असल्याचे समजते. नेतृत्व बदलाचा निर्णय हायकमांडवर अवलंबून आहे. आम्ही हायकमांडच्या निर्णयाशी बांधील राहणार आहे, अशी ग्वाही देखील हे आमदार पक्षश्रेष्ठींना देतील.

गेल्या महिन्यात 40 आमदार एका क्लबमध्ये एकत्र जमले होते. तीन ते सहा वेळा जिंकलेल्या आमदारांना मंत्रिपदे मिळावीत, अशी मागणी त्यांनी वरिष्ठांकडे केली होती. त्यामुळे, मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार दिल्लीला रवाना होण्यापूर्वीच काँग्रेसचे आमदार आज दिल्लीला जातील.

Advertisement
Tags :

.