For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ओडिशातील काँग्रेस आमदारांना बेंगळूरमधील रिसॉर्टमध्ये

06:10 AM Mar 14, 2026 IST | Tarun Bharat Portal
ओडिशातील काँग्रेस आमदारांना बेंगळूरमधील रिसॉर्टमध्ये
Advertisement

राज्यसभा निवडणुकीतील क्रॉस वोटिंग टाळण्यासाठी 16 जण बेंगळुरात : डी. के. शिवकुमारांवर जबाबदारी

Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

ओडिशा विधानसभेवरून राज्यसभेच्या चार जागांसाठी निवडणूक होत असून पाच उमेदवार रिंगणात आहेत. पक्षाचा उमेदवार निवडून आणण्याच्या प्रयत्नात असलेल्या काँग्रेसला ‘ऑपरेशन कमळ’ची भीती आहे. त्यातून बचाव करण्यासाठी तेथील 16 आमदारांना उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या मार्गदर्शनासाठी बेंगळूरबाहेरील एका रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात कुतूहल निर्माण झाले आहे.

Advertisement

बेंगळूर दक्षिण जिल्ह्यातील (रामनगर) बिडदीच्या खासगी रिसॉर्टमध्ये आणलेल्या आमदारांची शिवकुमार यांनी शुक्रवारी सायंकाळी भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली. त्यांच्याशी काही वेळ चर्चाही केली. त्याचप्रमाणे पक्षातील इतर नेत्यांशीही पुढील रणनीतीबाबत शिवकुमारांनी चर्चा केल्याचे सूत्रांकडून समजते.

ओडिशा विधानसभेवरून राज्यसभेच्या चार जागांसाठी पाच उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. ओडिशा विधानसभेचे एकूण सदस्यबळ 147 असून एका उमेदवाराला जिंकण्यासाठी 30 मतांची आवश्यकता आहे. भाजपने 3, बीजेडीने 1 आणि बीजेडी, काँग्रेसचा संयुक्त असा 1 उमेदवार रिंगणात आहे. बीजेडीच्या पाठिंब्यावर काँग्रेसने प्रख्यात यूरोलॉजिस्ट व ओडिशा मेडिकल युनिव्हर्सिटीचे माजी संचालक डॉ. दत्तेश्वर होट यांना राज्यसभेसाठी उमेदवारी दिली आहे. चौथ्या जागेसाठी बीजेडीकडे 18, काँग्रेसकडे 14 आणि सीपीआर(एम) 1 असे 32 आमदारांचे बळ आहे. परंतु, काँग्रेसमधून प्रथमच ओडिशा विधानसभेवर निवडून आलेले 8 आमदार फोडण्याचे प्रयत्न भाजपकडून होण्याची चिंता काँग्रेसला आहे. भाजपच्या ऑपरेशन कमळपासून रक्षण करण्यासाठी आणि काँग्रेस-बीजेडीच्या उमेदवाराचा विजय सुनिश्चित करण्यासाठी 16 आमदारांना बिडदीजवळील रिसॉर्टमध्ये आणण्यात आले आहे.

प्रत्येक वेळी डी. के. शिवकुमार काँग्रेससाठी विश्वासू म्हणून काम करत आले आहेत. मुख्यमंत्रिपद न मिळाल्याने नाराज असून देखील त्यांनी राज्यसभा निवडणुकीत पक्षाचा उमेदवार निवडून आणण्यासाठी ओडिशामधील काँग्रेसच्या आमदारांना बिडदीतील रिसॉर्टमध्ये राहण्याची व्यवस्था केली आहे. क्रॉस वोटिंगच्या भीतीने या आमदारांना सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी हायकमांडने शिवकुमारांवर सोपविली आहे.

महाराष्ट्र सरकार अडचणीत असताना शिवकुमार यांच्या नेतृत्वाखाली तेथील काँग्रेसच्या आमदारांना बेंगळूरला आणण्यात आले होते. त्याचप्रमाणे गुजरातमधील काँग्रेस आमदारांनाही बेंगळुरातील रिसॉर्टमध्ये आणण्यात शिवकुमारांनी मोठा वाटा उचलला होता. आता ओडिशातील काँग्रेसच्या 14 आणि दोन समर्थित आमदारांची जबाबदारी शिवकुमारांच्या खांद्यावर सोपविण्यात आली आहे.

रिसॉर्टमध्ये आलेल्या ओडिशातील आमदारांसोबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, एआयसीसीचे सचिव मयुर जयकुमार, आमदार एच. सी. बालकृष्ण, सी. पी. योगेश्वर, ओडिशा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भक्त चरणदास हे आहेत. ओडिशा विधानसभेवर प्रथमच निवडून आलेल्या काँग्रेस आमदारांमध्ये राजन एक्क, अशोक दास, अप्पल कुमारस्वामी, मंगू किल्लो, पवित्र सौंता, नीलमाधव हिक्क, प्रफुल्ल प्रधान यांचा समावेश आहे.

आमच्या आमदारांना मोठमोठे ऑफर : डी. के. शिवकुमार

भाजप नेते ‘ऑपरेशनक कमळ’चे जनक आहेत, घोडेबाजारासाठी प्रसिद्ध आहेत.  राज्यसभा निवडणुकीमुळे ऑपरेशन कमळची भीती आहे, असा आरोप उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी केला. बिडदी येथील रिसॉर्टबाहेर पत्रकारांशी ते बोलताना ते म्हणाले, राजकीय पक्षांना घोडेबाजाराची चिंता सतावत आहे. आमच्या आमदारांवर दबाव आहे. त्यांना मोठमोठे ऑफर दिले जात आहेत. आमच्या पक्षातील आमदारांना ओडिशातील 14-15 आमदार इथे आले आहेत. ओडिशाच्या पीसीसी अध्यक्षांनी फोन करून धर्मनिरपेक्ष पक्ष एकत्र आले आहेत. ऑपरेशन कमळची शक्ता आहे. पक्षातील प्रदेशाध्यक्षांनी फोन करून सांगितल्यानंतर त्यांच्या शब्दाला मान देणे आमचे कर्तव्य आहे. बीजेडी, कम्युनिस्ट पक्ष आणि आम्ही संयुक्तपणे उमेदवार उभे केले आहेत, असेही ते म्हणाले.

Advertisement

.