For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

काँग्रेसने पेलले पोटनिवडणुकीचे आव्हान

06:09 AM May 08, 2026 IST | Tarun Bharat Portal
काँग्रेसने पेलले पोटनिवडणुकीचे आव्हान
Advertisement

पोटनिवडणुकीत काँग्रेससमोर आपले गड राखण्याचे आव्हान उभे होते. बागलकोटमध्ये माजी मंत्री एच. वाय. मेटी यांच्या निधनानंतर त्यांच्याच कुटुंबातील एखाद्याला उमेदवारी मिळणार, हे स्पष्ट होते. त्यांचे चिरंजीव उमेश मेटी यांनी भाजपच्या वीरण्णा चरंतीमठ यांच्याविरुद्ध 22,332 मतांनी विजय मिळवला आहे.

Advertisement

बागलकोट व दावणगेरी विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. त्यामुळे कर्नाटकात 2028 च्या निवडणुकीत पुन्हा काँग्रेस सत्तेवर येणार, असा विश्वास मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी व्यक्त केला आहे. बागलकोटची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री सतीश जारकीहोळी यांच्यावर होती. पक्षाने आपल्यावर सोपवलेली जबाबदारी चोखपणे पार पाडीत पुन्हा एकदा त्यांनी आपली ताकद दाखवून दिली आहे. भविष्यात निवडणुका जिंकायच्या असतील तर अहिंद मते एकवटली पाहिजेत तरच विजय शक्य आहे याची जाणीव झाल्यामुळे अहिंद संघटनेवर अधिक भर दिला जात आहे.

पोटनिवडणुकीत काँग्रेससमोर आपले गड राखण्याचे आव्हान उभे होते. बागलकोटमध्ये माजी मंत्री एच. वाय. मेटी यांच्या निधनानंतर त्यांच्याच कुटुंबातील एखाद्याला उमेदवारी मिळणार, हे स्पष्ट होते. त्यांचे चिरंजीव उमेश मेटी यांनी भाजपच्या वीरण्णा चरंतीमठ यांच्याविरुद्ध 22,332 मतांनी विजय मिळवला आहे. बागलकोट पोटनिवडणुकीच्या निमित्ताने भाजप नेत्यांनी सतीश जारकीहोळी यांच्याविरुद्धही भरपूर टीका केली. भाजपमधून हकालपट्टी करण्यात आलेल्या माजी केंद्रीय मंत्री बसनगौडा पाटील यांनाही प्रचारासाठी बोलावण्यात आले. वीरण्णा चरंतीमठ व बसनगौडा पाटील-यत्नाळ यांच्यातील वैयक्तिक संबंधामुळे ते प्रचाराला आले. तरीही काँग्रेसने आपले गड राखले. दावणगेरीत काँग्रेसच्या विरोधात निकाल लागणार, अशी मतदानानंतर अटकळ होती. ती अटकळ खोटी ठरली. 5 हजार 708 मतांच्या अंतरासह शामनूर शिवशंकरप्पा यांचे नातू समर्थ शामनूर विजयी झाले. बागलकोटमध्ये सतीश जारकीहोळी यांनी केलेल्या व्यूहरचनेबरोबरच एच. वाय. मेटी यांच्याबद्दलची सहानुभूतीही कामाला आली आहे.सादिक पैलवान यांनी काँग्रेसची उमेदवारी मागितली होती. गेल्या निवडणुकीत स्वत: शामनूर शिवशंकरप्पा यांनी आपल्यानंतर मुस्लीम समाजाला उमेदवारी देणार, असे जाहीर केले होते. त्यांनी दिलेल्या आश्वासनाची आठवण करून देत सादिक पैलवान यांनी उमेदवारी मागितली. त्यांना उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी बंडखोरी केली. मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री व प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार आदी नेत्यांनी केलेल्या मनधरणीमुळे त्यांनी बंडाचा झेंडा मागे घेतला. दावणगेरीत असंतुष्ट मुस्लीम नेत्यांनी एसडीपीआयच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याचा आरोप झाला. या आरोप-प्रत्यारोपामुळे अल्पसंख्याक विभागातील काही नेत्यांना पक्षातून बाहेर पडावे लागले. तर काही नेत्यांची पक्षानेच हकालपट्टी केली. या घडामोडींमुळे दावणगेरीत काँग्रेसच्या विरोधात निकाल लागणार या चर्चेला उधाण आले होते.

Advertisement

शेवटी माजी मंत्री व ज्यांना दावणगेरीचे धनी असे संबोधले जाते त्या शामनूर शिवशंकरप्पा कुटुंबीयांची पकड दावणगेरीवर कायम आहे, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. मतांचे अंतर कमी असले तरी दावणगेरीवर वर्चस्व ठेवण्यात मंत्री एस. एस. मल्लिकार्जुन हे यशस्वी झाले आहेत. दावणगेरीत भाजपनेही अहिंद प्रयोग राबवण्याचा प्रयत्न केला. मात्र या प्रयोगाला यश आले नाही. एसडीपीआयचे उमेदवार अफसर कोडलीपेठे यांनी 18975 मते मिळविली आहेत. त्यामुळे दावणगेरीचा गड राखताना काँग्रेसला घाम फुटला. भविष्यातही काँग्रेसला एसडीपीआयचा धोका कायम राहणार हे या निवडणुकीत एसडीपीआयच्या उमेदवारांनी घेतलेल्या मतांमुळे स्पष्ट झाले आहे. कारण, काँग्रेसपासून दुखावलेले मुस्लीम नेते एसडीपीआयकडे वळत आहेत, असे दिसून आले आहे. 27 वर्षीय समर्थ शामनूर हे कर्नाटक विधानसभेत वयाने सगळ्यात लहान आमदार असणार आहेत. त्यांचे वडील मंत्री एस. एस. मल्लिकार्जुन हे वयाच्या 28 व्या वर्षी आमदार झाले होते. समर्थ यांनी आपल्याच वडिलांच्या नावावरून रेकॉर्ड मोडून काढला आहे.

पोटनिवडणुकीतील विजयाच्या आनंदात असलेल्या काँग्रेस नेत्यांना आणखी एक धक्का बसला आहे. शृंगेरी विधानसभा मतदारसंघासाठी न्यायालयाच्या आदेशावरून फेरमतमोजणी झाली. 13 मे 2023 रोजी झालेल्या मतमोजणीत काँग्रेसचे टी. डी. राजेगौडा यांना विजयी घोषित करण्यात आले होते. भाजपचे डी. एन. जीवराज यांचा पराभव झाला होता. टपालाने आलेल्या 170 मतांमध्ये खाडाखोड केल्याची तक्रार होती. मतमोजणीच्या वेळी जाहीर झालेल्या निकालाप्रमाणे टी. डी. राजेगौडा आजतागायत शृंगेरीचे आमदार होते. फेरमतमोजणीत भाजपचे डी. एन. जीवराजना विजयी घोषित करण्यात आले. सभाध्यक्ष यु. टी. खादर यांनी विनाविलंब जीवराजना आमदारकीची शपथ द्यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी केली आहे.

रमेश हिरेमठ

Advertisement
Tags :

.