For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

काँग्रेसचा राजभवनवर मोर्चा

12:34 PM Dec 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
काँग्रेसचा राजभवनवर मोर्चा
Advertisement

गौतम अदानीच्या विरोधात निदर्शने: गृहमंत्री शहांच्या विधानाचा निषेध

Advertisement

पणजी : एका कथित प्रकरणात भारतातील अदानी समूहाविरोधात अमेरिकेतील न्यायालयाने भ्रष्टाचाराचे आरोप केलेले आहेत. आरोपांचे पडसाद देशभर उमटल्यानंतर आता गोव्यातील काँग्रेस नेत्यांनीही गौतम अदानी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी पाठिशी घालत असल्याचा ठपका ठेवत ‘मोदी, अदानी भाई भाई, देश विकून खाई मलाई’, असा नारा देत व हातात फलक घेत अदानी यांचा निषेध केला. काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी काल बुधवारी राजभवनावर मोर्चा काढून निदर्शने केली. पोलिसांनी काँग्रेस नेते, कार्यकर्त्यांना पुढे जाऊ न देता वाटेतच अडवले.

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, उपाध्यक्ष सुनील कवठणकर, इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. दोनापावला सर्कल ते राजभवनापर्यंत मोर्चा काढण्यास काँग्रेस नेत्यांनी सुरवात केली होती. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे दिसून आल्यावर पोलिसांनी अमित पाटकर, युरी आलेमाव तसेच इतर पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले. काँग्रेस नेते राजभवनाच्या दिशेने जात होते, तेव्हा पोलिसांनी महिला पोलिसांना पुढे केले. यावर उपाय म्हणून काँग्रेसनेही आपल्या महिला आघाडीला पुढे केले. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे दिसून येताच पोलिसांनी अमित पाटकर, युरी आलेमाव आणि सुनील कवठणकर यांना ताब्यात घेऊन पोलिसु वाहनात घातले.

Advertisement

संविधाननिर्मात्याचा अपमान का म्हणून?

संविधाननिर्माते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत अपशब्द काढल्यामुळे अमित शहा हे संविधानविरोधी असल्याचे स्पष्ट होते. त्यांच्या या कृतीचा धिक्कार निषेध काँग्रेस पक्ष करीत आहे, असे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर म्हणाले.

सिद्दीकीचे कोठडीतून पलायन, पण सरकार चिडीचूप

दि. 13 डिसेंबर रोजी सिद्दीकी सुलेमान खान याने पोलिस कोठडीतून पलायन केले. याविषयी सरकार कोणतीच ठोस कृती करायला तयार नाही. उलट ज्यांनी हे प्रकरण उघडकीस आणले त्यांच्यावर कारवाई करीत आहे. त्यामुळे भाजप सरकारची ही एकप्रकारे दडपशाही असल्याचे काँग्रेसचे उपाध्यक्ष सुनील कवठणकर यांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.