For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

काँग्रेसच्या रक्तातच खोटारडेपणा; विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांचा आरोप

05:54 PM Aug 21, 2024 IST | Abhijeet Khandekar
काँग्रेसच्या रक्तातच खोटारडेपणा  विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांचा आरोप
Neelam Gorhe on Padalkar
Advertisement

कोल्हापूर शहरात भगवा फडकविण्यासाठी कामाला लागा : शिवसेना पदाधिकारी मेळाव्यात आवाहन

कोल्हापूर प्रतिनिधी

काँग्रेसने 2004 च्या निवडणुकीवेळी मोफत वीज देणार असल्याचे जाहीर केले होते. परंतू निवडणूकीनंतर जाहीरनाम्यात चुकून छापल्याचा खुलासा केला. काँग्रेसच्या रक्तामध्येच खोटारडेपणा असल्याचा यातून स्पष्ट होत असल्याचा आरोप विधान परिषदेच्या उपसभापती, शिवसेना उपनेत्या निलम गोऱ्हे यांनी केला. महायुती सरकारच्या लोकाभिमुख योजना असून याचा विरोधक अपप्रचार करत आहेत. त्यांच्यापासून नागरिकांना सावध करा, असे आवाहनही त्यांनी केले.

Advertisement

दसरा चौकातील शाहू स्मारक येथील हॉलमध्ये मंगळवारी आगामी विधानसभा निवडणूक आणि 22 ऑगस्ट रोजी तपोवन मैदानात होणाऱ्या महिला सक्षमीकरण मेळाव्याचे नियोजनासंदर्भात शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा झाला. यावेळी त्या बोलत होत्या.

निलम गोऱ्हे म्हणाल्या, महायुती सरकारकडून लोकाभिमुख योजना आणल्या जात आहेत. चांगल्या कामांना पांघरून घालण्यासाठी विरोधक खोटा प्रचार करत आहेत. शिंदे सरकार सर्वच समाजासाठी आनंदाचा शिधा सुरू केला. लाडकी बहीण योजनेत 1500 रूपये दिले जात आहे. यावर काहींकडून इतक्या रक्कमेत काय येणार असे म्हटले जात आहे. परंतू जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी या रक्कमेचा महिलांना हातभार लागत आहे. विधवा, एकल महिलांसाठी ही रक्कम आधार ठरत आहे. ही मदत त्यांचा अधिकार आहे. याचबरोबर सरकार आपल्या पाठीशी असल्याचे यातून सिद्ध होत आहे. यामुळे महिलांचा आत्मविश्वास वाढत आहे. या मेळाव्यास शिवसेना उपनेत्या संध्या वाढवणकर, जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, शिवाजी जाधव,रणजीत जाधव, महेंद्र घाटगे, सुनील जाधव, मंगल साळोखे, पवित्रा रांगणेकर, अमरजा पाटील, पूजा भोर, गीता भंडारी, मंगलताई कुलकर्णी, पूजा कामते, गौरी माळदकर, पूजा शिंदे आदी उपस्थित होते.

Advertisement

45 हजार कोटीची तरतूद
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेसाठी 45 हजार कोटींची तरतूद केली असून 90 ते 95 टक्के फॉर्म स्वीकारले आहेत. योजना यशस्वी होत असून महिला वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. यामुळेच विरोधक गैरसमज पसरवण्याचे काम करत असल्याचे निलम गोऱ्हे यांनी सांगितले.

मेहुणा सुद्धा लाडके झाले
लाडकी बहीण योजना सुरू केल्यानंतर काहींनी लाडक्या भावाचे काय असे सवाल केले. लाडक्या बहिणीला योजनेचा लाभ झाला म्हणजे तिच्या पतीलाही झाला. एकप्रमारे मेहुणे सुद्धा लाडके झालेच असे निलम गोऱ्हे यांनी सांगताच सभागृहात एकच हश्शा पिकला. विद्यार्थ्यांसाठी स्टायपेंड, महाज्योती योजन, पात्र विद्यार्थ्यांनींना वैद्यकीय शिक्षण मोफत दिले जात आहे. सर्वच घटकांना आर्थिक मदत करण्याचे काम महायुती सरकार करत असल्याचेही त्यांनी सांगितले.

मग सत्तेत असताना मराठा आरक्षण का दिले नाही
विरोधात असतानाही आम्ही विधानसभेत मराठा आरक्षणासाठी आवाज उठविला. कोणावरही अन्याय न करता मराठा आरक्षण देण्याची भूमिका महायुतीची आहे. परंतू काँग्रेस 1999 ते 2014 दरम्यान, राज्यात सत्तेत होते. त्यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न का सोडविला नाही, असा सवाल निलम गोऱ्हे यांनी केला.

कोल्हापूर उत्तरवर दावा
महायुतीचा गुरूवारी कोल्हापुरात मेळावा होत असून हा मेळावा यशस्वी करण्याचे आवाहन निलम गोऱ्हे यांनी केले. महायुती सरकारने जनतेच्या हिताची कामे केली असून आगामी विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर शहरात भगवा फडकविण्यासाठी आतापासूनच कामाला लागा, असे आवाहनी त्यांनी केले. +

Advertisement
Tags :

.