चेंगराचेंगरीच्या घटनेविषयी काँग्रेसश्रेष्ठींना दिली माहिती
मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री शिवकुमार दिल्ली दौऱ्यावर : विविध राजकीय घडामोडींवरही चर्चा
बेंगळूर : आरसीबीच्या विजयोत्सवावेळी बेंगळूरच्या चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेमुळे राज्य काँग्रेसच्या प्रतिष्ठेला धक्का बसला आहे. त्यामुळे काँग्रेसचे वरिष्ठ नेते संतप्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर मंगळवारी नवी दिल्लीत मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, वरिष्ठ नेते राहुल गांधी यांना घटनेची सविस्तर माहिती देऊन वरिष्ठांचा संताप कमी करण्याचा प्रयत्न केला. चेंगराचेंगरीच्या घटनेची काँग्रेस हायकमांडने गांभीर्याने दखल घेतली असून कर्नाटकाच्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना दिल्लीत येण्याचे निमंत्रण धाडले होते. त्यानुसार सिद्धरामय्या व डी. के. शिवकुमार यांनी दिल्लीत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेऊन या घटनेत सरकारकडून कोणतीही चूक झालेली नाही, असे पटवून देण्याचा प्रयत्न केला. आरसीबीच्या विजयोत्सवाचे आयोजक आणि कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेने (केएससीए) चूक केली आहे.
सरकारचा यात कोणताही दोष नाही. विधानसौधसमोर आयोजित केलेल्या सत्कार कार्यक्रमात कोणत्याही त्रुटी राहिल्या नाहीत. परंतु, चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर दुर्घटना घडली. यात सरकारने कोणतीही चूक केली नाही, असे सांगून दोन्ही नेत्यांनी राहुल गांधी यांना घटनेची संपूर्ण माहिती दिली. चेंगराचेंगरीच्या घटनेमुळे राज्य सरकारच्या प्रतिष्ठेला धक्का बसला असेल. पण ही हानी भरून काढण्यासाठी सरकारने पावले उचलली आहेत. चेंगराचेंगरीदरम्यान सुरक्षेच्या अभावामुळे आम्ही पोलीस अधिकाऱ्यांसह इतरांविरुद्ध कारवाई केली आहे. न्यायालयीन चौकशीचे आदेशही दिले आहेत. दोषी आढळलेल्यांवर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी वरिष्ठांसमोर सांगितले. दरम्यान, राहुल गांधी यांनी संताप व्यक्त केला. भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही, याची दक्षता घ्यावी. विरोधी पक्षांना टीका करण्यासाठी वाव देऊ नये, असा सल्ला राहुल गांधी यांनी सिद्धरामय्या व डी. के. शिवकुमार यांना दिला. त्यावर उभय नेत्यांनी सरकारकडून दोषींवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे सांगितले. यावेळी राज्य काँग्रेस प्रभारी रणदीप सुरजेवाला व काँग्रेसचे राष्ट्रीय मुख्य सचिव के. सी. वेणुगोपाल उपस्थित होते.
कारवाईविषयी वरिष्ठांना दिली माहिती : सिद्धरामय्या
बेंगळूरमधील चेंगराचेंगरीच्या घटनेविषयी चर्चा करून सरकारने घेतलेल्या निर्णयांची माहिती काँग्रेसश्रेष्ठींना देण्यात आली आहे. मॅजिस्ट्रेटमार्फत प्रकरणाचा तपास, निवृत्त न्यायमूर्ती मायकल डी कुन्हा यांच्या नेतृत्वाखालील एकसदस्यीय आयोग स्थापन, पाच पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन, गुप्तचर खात्याच्या प्रमुखांची बदली, मुख्यमंत्र्यांच्या राजकीय सचिवांची उचलबांगडी यासारख्या कारवाई योग्य असल्याची बाजू मांडण्यात आली आहे. एकसदस्यीय आयोगाच्या तपास अहवालाच्या आधारे दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितले.
मंत्रिमंडळ पुनर्रचनेची सूचना?
चेंगराचेंगरीच्या घटनेमुळे सरकारच्या प्रतिष्ठेला धक्का बसला आहे. नुकसान भरून काढण्यासाठी राहुल गांधी यांनी राज्य मंत्रिमंडळात फेरबदल करण्याचा मुद्दा मांडल्याचे सांगितले जात आहे. समाधानकारक कामगिरी न केलेल्या 7 ते 8 मंत्र्यांना वगळून नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात सामील करून घेण्याची सूचना सिद्धरामय्या यांना केल्याचे समजते. त्यामुळे मंत्रिमंडळ पुनर्रचनेसाठी लवकरच मुहूर्त निश्चित होण्याची शक्यता आहे. केपीसीसी अध्यक्ष बदलाचीही बैठकीत चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे.