For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इन्फोसिसचे नारायण मूर्ती यांना काँग्रेस नेत्याचा पाठिंबा

06:41 AM Nov 11, 2023 IST | Tarun Bharat Portal
इन्फोसिसचे नारायण मूर्ती यांना काँग्रेस नेत्याचा पाठिंबा
Advertisement

► वृत्तसंस्था / नवी दिल्ली

Advertisement

देशाच्या प्रगतीसाठी प्रत्येकाने प्रतिसप्ताह 70 तास काम केले पाहिजे, या इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांच्या विधानाला काँग्रेस नेते मनिष तिवारी यांनी पाठिंबा दिला आहे. मूर्ती यांचे हे विधान उलटसुलट चर्चेचा विषय बनले आहे. काही लोकांनी त्यांचे हे विधान अतिरंजित असल्याचीही प्रतिक्रिया व्यक्त केली होती. मात्र, तिवारी यांनी या विधानात चुकीचे काय आहे? असा संदेश प्रसारित केला आहे. त्यांनी कामाचे वेळापत्रकच ‘एक्स’वर प्रसारित केले आहे.

नारायण मूर्ती यांच्या या विधानावर इतका गहजब का माजविण्यात येत आहे, हे मला समजू शकत नाही. मी स्वत: प्रतिदिन 12 तास काम करतो. काही लोकप्रतिनिधी 12 ते 15 तास प्रतिदिन काम करतात. माझ्यासह कित्येक लोकप्रतिनिधी साप्ताहिक सुटीही घेत नाहीत. असे सर्वांनी करावयास हवे, असे प्रतिपादन तिवारी यांनी केले आहे. त्यांनी आपल्या कामाचे वेळापत्रकही प्रसिद्ध केले आहे.

Advertisement

दोन पिढ्यांसाठी...

भारत देश खरोखरच महाशक्ती व्हायचा असेल, तर किमान दोन पिढ्यांमधील प्रत्येक नागरिकाने प्रतिसप्ताह 70 तास काम करण्याची आवश्यकता आहे. आठवड्याचा एक दिवस सुटी घेऊन आणि वर्षाला 15 दिवस रजा घेऊन इतके काम करता येऊ शकते, हे अनेकांनी दाखवून दिले आहे. त्यामुळे मूर्ती यांनी व्यक्त केलेल्या अपेक्षेत काहीही अतिरंजित नाही, असे तिवारी यांनी स्पष्ट केले.

पॉडकास्टवर विधान

नारायण मूर्ती यांनी त्यांचे हे बहुचर्चित विधान ‘थ्री वन फोर’ कॅपिटलच्या पॉडकास्टवर बोलताना केले होते. भारताच्या युवकांनी आपल्या कामाचे तास वाढविले नाहीत, तर भारत विकसित जगाशी स्पर्धा करण्यात मागे पडेल, असे प्रतिपादन त्यांनी केले होते. त्यांच्या या मताला उद्योग क्षेत्रातील अनेकांनी, तसेच अनेक युवकांनीही पाठिंबा दिला होता. तथापि, काही मान्यवरांनी या विधानाची खिल्लीही उडविली होती. सोशल मिडियावरही हे विधान गाजले होते.

Advertisement
Tags :

.