काँग्रेस नेत्या सोनिया गांधी रुग्णालयात दाखल
श्वसनावेळी त्रासाची होती समस्या : प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांचे वक्तव्य
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सोमवारी रात्री अचानक प्रकृती बिघडल्यावर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले असून डॉक्टरांचे पथक त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे. रुग्णालय व्यवस्थापनाने सोनिया गांधींच्या प्रकृतीविषयी वक्तव्यही जारी केले आहे.
सोनिया गांधी यांना श्वसनावेळी त्रास सुरू झाला होता. वैद्यकीय तपासणीत थंडी आणि प्रदूषणाच्या प्रभावामुळे त्यांचा ब्रोंकियल अस्थमा वाढल्याचे दिसून आले, खबरदारीदाखल त्यांना पुढील देखरेख आणि उपचारासाठी रुग्णालयात भरती करण्यात आल्याची माहिती डॉ. अजय स्वरुप यांनी दिली आहे.
सोनिया गांधी यांची प्रकृती अत्यंत स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि त्या चांगला प्रतिसाद देत आहेत. अँटीबायोटिक्स आणि अन्य साहाय्यक औषधे त्यांना देण्यात येत आहेत. एक किंवा दोन दिवसांत त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळू शकतो, असे डॉ. अजय स्वरुप यांनी सांगितले.
राज्यसभा खासदार सोनिया गांधी या मागील काही काळापासून आरोग्य विषयक समस्यांना तोंड देत आहेत. याचमुळे त्या नियमित आरोग्य तपासणी आणि उपचारासाठी रुग्णालयात जात असतात.