छत्तीसगडमध्ये काँग्रेस नेत्याची कुटुंबीयांसमवेत आत्महत्या
विषप्राशन करून संपविले आयुष्य
वृत्तसंस्था/ रायपूर
छत्तीसगडच्या जांजगीर चांपा जिल्ह्यात पंचराम यादव (65 वर्षे) यांनी स्वत:ची पत्नी आणि दोन मुलांसमवेत विषप्राशन करत आयुष्य संपविले आहे. या चारही जणांचा बिलासपूर येथे उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलीस आता तपास करत आहेत. कर्जाच्या भारामुळे यादव कुटुंबाने हे टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.
काँग्रेस नेते पंचराम यादव यांनी पत्नी नंदिनी (55 वर्षे), पुत्र सूरज (27 वर्षे), नीरज (32 वर्षे) यांच्यासोबत मिळून विषप्राशन केले. आत्महत्येच्या प्रयत्नाची माहिती कळताच त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तर त्यांची प्रकृती बिघडल्याने उपचारासाठी बिलासपूर येथे हलविण्यात आले होते. सिम्स रुग्णालयात उपचार सुरू असताना या सर्वांचा मृत्यू झाला आहे. या चारही जणांनी विषप्राशन केले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेत तपास सुरू केला आहे. यादव यांच्या नातेवाईक तसेच शेजाऱ्यांकडे प्रारंभिक चौकशी करण्यात येत आहे.