विजयन यांच्यावर बरसले काँग्रेस, आययुएमएल
भाजप-संघाला साथ दिल्याचा केला आरोप : डाव्या नेत्याला केले लक्ष्य
वृत्तसंस्था/ तिरुअनंतपुरम
केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्याकडून इंडियन युनियन मुस्लीम लीगचे (आययूएमएल) सर्वेसर्वा पनक्कड सादिक अली शिहाब थंगल यांच्यासंबंधी करण्यात आलेल्या वक्तव्यावर काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. याचबरोबर आययुएमएलने विजयन यांना सुनावत त्यांच्यावर कथित सांप्रदायिक शक्तींची साथ दिल्याचा आरोप केला आहे. आययुएमएल आणि काँग्रेस यांचा विजयन यांच्यासोबतचा वाक्युद्ध तीव्र होत असल्याचे दिसून येत आहे.
भाजपचे नेते संदीप वारियर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. यानंतर त्यांनी आययुएमएलच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली होती. यावरून विजयन यांनी वारियर यांचा नामोल्लेख टाळून त्यांच्यावर आययुएमएलचे गुणगान केल्याचा आरोप केला होता. तर दुसरीकडे आययुएमएलचे थंगल हे जमात-ए-इस्लामीच्या कार्यकर्त्याप्रमाणे वागत असल्याची टीका विजयन यांनी केली होती.
वारियर हे आययुएमएलच्या नेत्यांना भेटल्याच्या वृत्ताने अनेक वर्षांपूर्वी बाबरी विध्वंसानंतर त्वरित ओट्टापलम येथे झालेल्या निवडणुकीच्या आठवणी ताज्या झाल्या. बाबरीला संघ परिवाराने ध्वस्त केले होते, परंतु तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने याकरता पूर्ण समर्थन दिले होते असा आरोप विजयन यांनी केला होता.
आययुएमएलचा संधीसाधूपणा
तत्कालीन आययुएमएल नेतृत्व त्यावेळी राज्यात युडीएफ सरकारमधील मंत्रिपद गमाविण्याच्या भीतीपोटी केरळमध्ये काँग्रेसला या मुद्द्यावर प्रश्न विचारू शकले नव्हते. राज्याची जनता या सर्व गोष्टी ओळखून असून संधीसाधू वृत्ती ओळखत असल्याचे म्हणत विजयन यांनी आययुएमएलच्या नेतृत्वाला लक्ष्य केले होते.
काँग्रेस, आययुएमएलचे प्रत्युत्तर
माकपच्या वरिष्ठ नेत्याचे हे वक्तव्य त्यांचे आणि त्यांच्या पक्षाचे सांप्रदायिक शक्तींशी असलेले घनिष्ठ संबंध दर्शविते असे काँग्रेस आणि आययुएमएलने म्हटले आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युडीएफमध्ये सामील आययुएमलने स्वत:चे मुखपत्र चंद्रिकामध्ये संपादकीयाद्वारे विजयन यांच्यावर निशाणा साधला आहे. केरळची जनता पी. थंगल यांना सांप्रदायिक सौहार्दाचे दूत म्हणून ओळखते आणि मुख्यमंत्री विजयन यांनी त्यांच्या योग्यतेची समीक्षा करू नये. संघ परिवाराशी निगडित शक्ती राज्यात सांप्रदायिक सौहार्द संपवू पाहत असताना मुख्यमंत्री विजयन आणि त्यांचे डावे सरकार त्यांच्या समर्थनार्थ सातत्याने काम करत असल्याचे पक्षाच्या मुखपत्रात म्हटले गेले आहे. थ्रिसूर पुरमदरम्यान आरोपी पोलीस अधिकारी आणि मुनामबम येथे वक्फ जमीन मुद्द्यावर डाव्या पक्षांची भूमिका याच संगनमताचे उदाहरण असल्याचा दावा आययुएमएलकडून करण्यात आला आहे.