For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जम्मू-काश्मीरमध्ये आघाडीसाठी काँग्रेस प्रयत्नशील

06:09 AM Aug 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
जम्मू काश्मीरमध्ये आघाडीसाठी काँग्रेस प्रयत्नशील
Advertisement

खर्गे अन् राहुल गांधी आज दौऱ्यावर : फारुख अब्दुल्ला अन् मेहबूबा मुफ्तींशी करणार चर्चा

Advertisement

वृत्तसंस्था/ श्रीनगर

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे दोन दिवसांच्या दौऱ्यानुसार बुधवारी जम्मू-काश्मीरला जाणार आहेत. जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या घोषणेनंतर दोन्ही नेत्यांचा हा पहिला दौरा आहे. दोन्ही नेते बुधवारी दुपारी जम्मू तर 22 ऑगस्ट रोजी श्रीनगरमध्ये असतील. यादरम्यान ते पक्षाच्या स्थानिक नेत्यांसोबत निवडणूक तयारीसंबंधी चर्चा करणार आहेत. यानंतर संध्याकाळी पत्रकार परिषदेला संबोधित करतील अशी माहिती पक्षाचे महासचिव के.सी. वेणुगोपाल यांनी दिली आहे.

Advertisement

लोकसभा निवडणुकीत ‘इंडिया’ आघाडीला मिळालेले यश पाहता राहुल गांधी हे विधानसभा निवडणुकीतही सर्व भाजपविरोधी पक्षांना एकजूट करु पाहत आहेत. तर विधानसभा निवडणुकीतही ते आघाडीच्या रणनीतिसाठी आग्रही आहेत. यापूर्वी खर्गे आणि राहुल गांधी यांनी 19 ऑगस्ट रोजी जम्मू-काश्मीर, हरियाणा, महाराष्ट्र आणि झारखंडच्या महासचिव, प्रभारी आणि निवड समितीच्या सदस्यांची भेट घेतली होती. जम्मू-काश्मीरसाठी केंद्रीय निवडणूक समितीची बैठक आगामी 3-4 दिवसांमध्ये होणार आहे. जम्मू-काश्मीरमध्ये आघाडी करण्यासाठी पक्ष तयार असून भाजपला सत्तेपासून दूर ठेवणे हाच यामागील उद्देश असल्याचा दावा वेणुगोपाल यांनी केला आहे.

काँग्रेस पक्ष नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपीसोबत आघाडी करण्याच्या प्रयत्नात आहे. आघाडी स्थापन करण्याचा उद्देश भाजपला पराभूत करणे आहे. याकरता समान विचारसरणी असलेल्या पक्षांना एकत्र यावे लागणार असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. एनसी आणि पीडीपीसाठी राज्याचा मुद्दा वैयक्तिक मुद्द्यांपेक्षा महत्त्वाचा असावा. इंडिया आघाडी ही राष्ट्रीय पातळीवर स्थापन झाली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये देखील तिन्ही पक्षांनी मिळून निवडणूक लढविण्याची गरज असल्याचे वक्तव्य काँग्रेस महासचिव गुलाम अहमद मीर यांनी केले आहे.

तर माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद हे पक्षात परत यावेत अशी गांधी परिवाराची इच्छा आहे. याकरता वरिष्ठ नेत्यांना आझाद यांच्याशी संपर्क साधण्यास सांगण्यात आले ओह. परंतु आझाद यांच्या पक्षाने ही शक्यता फेटाळून लावली आहे.

अपनी पार्टीचे उपाध्यक्ष मन्हास यांचा काँग्रेसप्रवेश

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीपूर्वी अपनी पार्टीचे उपाध्यक्ष जफर इक्बाल मन्हास यांनी मंगळवारी पक्षसदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. मन्हास हे बुधवारी काँग्रेसमध्ये सामील होतील. पीडीपीतून बाहेर पडल्यावर मन्हास हे अपनी पार्टीच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होते.

रंधावा यांच्याकडे जबाबदारी

जम्मू-काश्मीर आणि हरियाणा निवडणुकीवरून दिल्लीत काँग्रेस पक्षाची बैठक झाली आहे. बैठकीत खर्गे आणि राहुल गांधी यांच्यासोबत पक्षाच्या निवडणूक स्क्रीनिंग कमिटीचे सदस्य सामील झाले. काँग्रेसने 1 ऑगस्ट रोजी 4 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी वेगवेगळ्या स्क्रीनिंग कमिटी स्थापन केल्या होत्या. या बैठकीत उमेदवारांच्या निवड प्रक्रियेवर चर्चा झाली. जम्मू-काश्मीर, हरियाणा, महाराष्ट्र आणि झारखंडमधील निवडणूक तयारींसंबंधी चर्चा करण्यात आली. सुखविंदर सिंह रंधावा यांना जम्मू-काश्मीर, अजय माकन यांना हरियाणा, मधुसूदन मिस्त्राr यांना महाराष्ट्र तर गिरीश चोडणकर यांना झारखंड निवडणूक समितीचे अध्यक्ष करण्यात आले होते. तर जिग्नेश मेवाणीला हरियाणाशी निगडित समितीत स्थान देण्यात आले होते.

Advertisement
Tags :

.