आसाममधील उग्रवाद-घुसखोरीला काँग्रेसच जबाबदार
पंतप्रधान मोदींची टीका : 18 हजार कोटींहून अधिक प्रकल्पांचे लोकार्पण-उद्घाटन : नुमालीगड, गोलाघाटमध्ये सभा
वृत्तसंस्था/ गुवाहाटी
आसाममधील उग्रवादी कारवाया आणि घुसखोरीला काँग्रेसच जबाबदार असल्याची टीका रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. येथील विकास रोखण्यातही विरोधी पक्षांचाच हात असून भाजपने राज्याचा विकास साधण्यासोबतच वारशाची ओळखही मिळवून दिल्याचा दावा पंतप्रधानांनी केला. ते आसाममधील नुमालीगड येथे एका जाहीर सभेला संबोधित करत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसाममधील दरंग येथे अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन केले. यादरम्यान त्यांनी विरोधकांवर, विशेषत: काँग्रेस पक्षावर जोरदार हल्लाबोल केला.
गोलाघाटमधील जाहीर सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, मी गेल्या दोन दिवसांपासून ईशान्येकडे आहे. मी जेव्हा जेव्हा ईशान्येकडे येतो तेव्हा मला अभूतपूर्व प्रेम आणि आशीर्वाद मिळतात. विशेषत: आसामच्या या प्रदेशात मला मिळणारे प्रेम आणि आपुलकी अद्भुत असते. मी तुम्हा सर्वांचे मनापासून आभार मानतो. विकसित आसाम, विकसित भारताच्या गौरवशाली प्रवासासाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. आज आसामला सुमारे 19,000 कोटी रुपयांचे प्रकल्प मिळाले आहेत, असे पंतप्रधानांनी गौरवाने नमूद केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ईशान्येकडील दौऱ्याचा रविवारी दुसरा दिवस होता. पंतप्रधान मोदींनी रविवारी आसाममध्ये 19 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन केले. तत्पूर्वी, शनिवारी पंतप्रधान मोदींनी मिझोराम आणि मणिपूरला भेट दिली. तिथे त्यांनी पायाभरणी आणि विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले. मणिपूरपाठोपाठ पंतप्रधान मोदी आसाममध्ये पोहोचल्यानंतर त्यांनी भारतरत्न भूपेन हजारिका यांच्या 100 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात भाग घेत त्यांना श्रद्धांजली वाहिली. आसाम भेटीवेळी नुमालीगड येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुमालीगड रिफायनरी लिमिटेड येथे आसाम बायोइथेनॉल प्लांटचे उद्घाटन केले. तसेच पॉलीप्रोपायलीन प्लांटची पायाभरणीही केली. केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा हेदेखील याप्रसंगी उपस्थित होते.
नुमालीगड येथे 12,230 कोटींच्या प्रकल्पाचे उद्घाटन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी आसाममधील गोलाघाट जिह्यातील नुमालीगड येथे 5,000 कोटी रुपयांच्या बांबू-आधारित इथेनॉल प्रकल्पाचे उद्घाटन केले. तसेच नुमालीगड रिफायनरी येथे 7,230 कोटी रुपयांच्या ‘पेट्रो फ्लुइडाइज्ड कॅटॅलिटिक क्रॅकर युनिट’ची पायाभरणी देखील केली. येथील बायोइथेनॉल प्लांट हा ‘शून्य कचरा’ असलेला प्रकल्प असून तो बांबू प्लांटच्या सर्व भागांचा वापर करेल. या प्रकल्पाच्या माध्यमातून राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला 200 कोटी रुपयांचा फायदा होइंल अशी अपेक्षा आहे. या प्रकल्पासाठी ईशान्येकडील चार राज्यांमधून पाच लाख टन हिरवा बांबू मिळेल्यामुळे 50,000 हून अधिक लोकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे फायदा होईल. या प्रकल्पामध्ये दरवर्षी 75,000 मनुष्य-दिवस रोजगार निर्माण करण्याची क्षमता आहे.
भारताची सर्वात वेगाने प्रगती
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आज भारत हा जगातील सर्वात वेगाने विकसित होणारा देश आहे. भारत जसजसा विकसित होत आहे तसतसे आपल्या वीज, वायू आणि इंधनाच्या गरजाही वाढत आहेत. या गोष्टींसाठी आपण परदेशांवर अवलंबून आहोत. आपण परदेशातून मोठ्या प्रमाणात कच्चे तेल आणि वायू आयात करून त्या बदल्यात भारताला दरवर्षी इतर देशांना लाखो कोटी रुपये द्यावे लागतात. आपल्या पैशामुळे परदेशात रोजगार निर्माण होतो. तेथील लोकांचे उत्पन्न वाढते. ही परिस्थिती बदलणे आवश्यक असल्यामुळे भारताने आपल्या ऊर्जेच्या गरजांसाठी स्वावलंबी होण्याच्या मार्गावर सुरुवात केली आहे. एकीकडे आपण देशात कच्चे तेल आणि वायूचे नवीन साठे शोधत आहोत, तर दुसरीकडे आपण हरित उर्जेची क्षमतादेखील वाढवत आहोत, असे पंतप्रधानांनी सांगितले.
उज्ज्वल भविष्यासाठी स्वदेशीचा वापर करा
आसाममधील दरंग येथे झालेल्या जाहीर सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी लोकांना स्वदेशी वस्तू वापरण्याचे आवाहन केले. जाहीर सभेला संबोधित करताना पंतप्रधानांनी स्वदेशीचे जोरदार समर्थन केले. आपण फक्त भारतात बनवलेल्या वस्तू वापरण्याचा प्रयत्न केला पाहिजे. प्रत्येकाने स्वदेशीचा स्वीकार करावा आणि आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी स्वदेशी वस्तू खरेदी कराव्यात, असे पंतप्रधान म्हणाले.
मी शिवभक्त आहे, सर्व विष सेवन करतो!
पंतप्रधान मोदींनी आणखी एका मुद्यावर विरोधकांवर प्रहार करताना स्वत:ला शिवभक्त असे संबोधले. मी स्वत: भगवान शिवाचा भक्त असल्यामुळे कोणी माझ्यावर कितीही टीका केली तरी मी सर्व विष सेवन करतो असे ते म्हणाले. आपल्या आईच्या माध्यमातून काँग्रेसने केलेल्या शिव्या-शापांना त्यांनी हे उत्तर दिले आहे. काँग्रेस पक्षावर टीका करताना त्यांनी माझा विश्वास 140 कोटी लोकांवर असून जनता हीच माझी दैवत आहे असेही त्यांनी सांगितले. पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर भूपेन हजारिका यांचाही अपमान केल्याचा आरोप केला. तसेच भाजपचे ‘डबल इंजिन’ सरकार भूपेन हजारिकांसारख्या आसामच्या थोर सुपुत्रांची स्वप्ने साकार करण्यासाठी वचनबद्ध असल्याची हमीही त्यांनी दिली.