For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मोदीविरोधी लढाईत काँग्रेस नाही विश्वसनीय!

06:29 AM Apr 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
मोदीविरोधी लढाईत काँग्रेस नाही विश्वसनीय
Advertisement

माकप महासचिव सीताराम येच्युरींचे वक्तव्य : राहुल गांधींच्या टिप्पणीची पार्श्वभूमी

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

केंद्रातील सत्तेवरून नरेंद्र मोदींना दूर करण्यासाठी स्थापन विरोधी पक्षांच्या आघाडीत काँग्रेस आणि माकप एकत्र आहेत. परंतु दोन्ही पक्षांच्या नेत्यांदरम्यान सध्या वाक्युद्ध सुरू आहे. माकप महासचिव सीताराम येच्युरींनी आता काँग्रेसच्या विश्वसनीयतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधातील लढाईत काँग्रेसची विश्वसनीयता संपुष्टात आली असल्याचे वक्तव्य येच्युरींनी केले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अलिकडेच केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्यावर ईडीकडून कारवाई का झाली नाही असा प्रश्न उपस्थित केला होता. या पार्श्वभूमीवर येच्युरी यांनी काँग्रेसला लक्ष्य केले आहे.

काँग्रेस आता केरळचे मुख्यमंत्री विजयन यांना अटक करण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे करत आहे. नरेंद्र मोदींच्या विरोधातील लढाईत काँग्रेसची विश्वसनीयता संकटात आहे. लोकशाहीच्या मार्गाने निवडण्यात आलेल्या मुख्यमंत्र्याच्या अटकेची मागणी करणे अत्यंत चुकीचे आहे. आम्ही दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या अटकेची निंदा केली आहे. तर दुसरीकडे काँग्रेस पंतप्रधान नरेंद्र मोदींना केरळच्या मुख्यमंत्र्यांना अटक करण्यास सांगत आहे, काँग्रेसचे हे कृत्य लोकशाहीच्या विरोधात असल्याचा दावा येच्युरी यांनी केला आहे.

काँग्रेसवर का भडकले?

केरळच्या मुख्यमंत्र्यांना का अटक करण्यात आली नाही, विरोधी पक्षांचे दोन अन्य मुख्यमंत्री गजाआड असतानाही विजयन हे कारवाईपासून दूर आहेत. मी भाजपविरोधात सातत्याने भूमिका मांडत आहे आणि केरळचे मुख्यमंत्री मलाच लक्ष्य करत आहेत असे म्हणत राहुल गांधी यांनी माकप आणि भाजप यांच्यात छुपी आघाडी असल्याचा दावा केला होता. केरळच्या वायनाड येथून निवडणूक लढविणाऱ्या राहुल गांधी यांच्या विरोधात राज्यातील सत्तारुढ डाव्या पक्षांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच डाव्या पक्षांच्या आघाडीने भाजपविरोधातील एकजूट लढाईत काँग्रेसच्या भूमिकेवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

Advertisement
Tags :

.