आघाडीत काँग्रेस, महायुतीत राष्ट्रवादीचा ताप!
काँग्रेस नेते राहुल गांधी आणि अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे महाविकास आघाडीतील शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याशी कितीही जुळवून घेण्याचा प्रयत्न करत असले तरी आडवे पाय मारण्याची राज्यातील काही काँग्रेस नेत्यांची सवय पुन्हा उफाळून आली आहे. तोच कित्ता महायुतीत अजित पवारांची राष्ट्रवादी गिरवू लागली असून या दोन्ही पक्षातील काही नेत्यांच्या महत्वकांक्षा त्यांच्या त्यांच्या तंबूला आग लावणाऱ्या ठरू शकतात.
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सांगली जिह्यातील कडेगाव तालुक्यात माजी मंत्री पतंगराव कदम यांच्या स्मारक आणि पुतळा अनावरण समारंभात ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे कौतुक करत त्यांच्यावरच इंडिया आघाडीचे नेते म्हणून महाराष्ट्राची जबाबदारी कशी आहे ते सांगून टाकले. त्यांचे हे संबोधन जनतेसाठी कमी आणि व्यासपीठावर बसलेल्या काँग्रेस नेत्यांसाठी अधिक होते.
महाराष्ट्राच्या राजकारणात ढवळाढवळ करून दिल्लीत काड्या करणाऱ्या महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राबाहेर राहणाऱ्या मराठी नेत्यांची सुद्धा आता दिल्लीत काहीही उरलेली नाही. राहुल गांधी यांनी कर्ते आणि बोलते नेते यांच्यात भेद करून कामाच्या लोकांना जवळ बाळगण्यास सुरुवात केली आहे. बाकी नेत्यांची अवस्था गर्दीकुमारांसारखी होऊ लागली आहे. पण म्हणून त्या नेत्यांचा स्वभाव बदलला असे झालेले नाही.
मुंबईत जाऊन उद्धव ठाकरे यांच्या बाबत काहीतरी बोलायचे आणि उर्वरित महाराष्ट्रात शरद पवारांच्या विरोधात बोलत राहायचे ही यांची नवी खेळी आहे. वास्तविक महाराष्ट्रात अनेक विषय वादग्रस्त ठरत आहेत. सरकार मोठ्या अडचणीत सापडल्याचे दिसत आहे.
या विषयावर विरोधक म्हणून आंदोलन उभे करणे हे प्रत्येक राजकीय पक्षाचे कर्तव्य आहे. आपल्या मतदारांच्या हिताचा निर्णय व्हावा यासाठी सरकारवर दबाव आणणे आणि त्या मतदारांच्या हिताला धक्का लागला आहे याची जाणीव करून देऊन त्या विरोधात असंतोष निर्माण करणे हे अनेक काँग्रेस नेते निवडणुकीच्या काळातसुद्धा करत नाहीत. त्यांना केवळ दिखाऊ राजकारण करायचे आहे की भाजप नेत्यांचा रोष ओढवून घ्यायचा नाही? पवार आणि ठाकरे यांच्या पायात पाय घालून त्यांना आपली कातडी वाचवायची आहे का? आपल्या मागे काही लागू नये यासाठी त्यांची ही उठाठेव आहे? अशी शंका घेण्यास वाव आहे.
खुद्द राहुल गांधी यांनी संसदेत आणि रस्त्यावर सुद्धा आक्रमक भूमिका घेतली आहे. महाराष्ट्रात आल्यानंतर त्यांनी मोदींच्या विरोधात जी आक्रमक शैली अवलंबली, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मालवण येथील पुतळा कोसळल्याच्या घटनेत मागितलेली महाराजांची माफी पुरेशी नाही अशी भूमिका घेतली. चुका करतात तेच माफी मागतात, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकाला कंत्राट दिले याबद्दल त्यांनी माफी मागितली की कामात भ्रष्टाचार झाला याबद्दल माफी मागितली? असे भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ दोघांनाही अडचणीत आणणारे प्रश्न निर्माण केले. महाराष्ट्रात सुरू आहे ती विचारांची लढाई आहे, काँग्रेस विचार विरुद्ध भाजपचा विचार अशा लढाईत सर्वसामान्य, दीन, दलित, ओबीसी यांच्या हितासाठी आपण लढाई लढत असून त्यांच्या विरोधात कारभार करण्याचे काम भाजप करत आहे अशी भूमिका ते मांडत आहेत. महाराष्ट्रात जातनिहाय जनगणनेचा मुद्दा त्यांनी चर्चेत आणला आहे. लोकसभा निवडणुकीत मराठा, धनगर समाजासह आरक्षण मागणाऱ्या घटकांसाठी आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा मुद्दा त्यांनी पुढे आणला होता.
लोकसभेला त्याची फारशी चर्चा झाली नाही मात्र महाराष्ट्रात आल्यानंतर ते हा मुद्दा घेऊन जेव्हा मराठा, धनगर आणि ओबीसी समाजासमोर जातील तेव्हा आरक्षणाबाबत ठोस भूमिका घ्या अशी मागणी करणाऱ्या सत्तेतील भाजप, शिंदे सेना आणि राष्ट्रवादीची मोठी गोची होणार आहे. काँग्रेसचा हा मुद्दा आपल्यालाही मान्य असल्याचे उद्धव ठाकरे यांनी यापूर्वी जाहीर केले आहे आणि पवारांनी त्या दृष्टीने गावोगाव जाऊन वातावरण निर्मिती सुरू केली आहे.
अशा या स्थितीत काँग्रेसचे नेते कुठे आहेत? हे लक्षात घेतले तर ते वेगवेगळ्या युट्युबरच्या स्टुडिओमध्ये आणि वृत्तपत्रांच्या रकान्यांमध्ये आपल्याच आघाडीच्या विरोधात वक्तव्य करताना दिसून येतात. एरवी त्यांचा मुक्काम घरातील आपल्या चार खोल्यांमध्येच असतो. जिथे कार्यकर्त्याला सुद्धा येण्यास मज्जाव आहे. अशा नेत्यांच्यामुळे महाविकास आघाडीच्या धावत्या गाडीला ब्रेक लागण्याची स्थिती आहे.
दादा शिंदेंना नकोत, भाजपचे काय?
महायुतीमध्ये हीच अवस्था अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची आहे. दादांच्या पक्षाच्या कुरघोड्या मान्य नसणारा वर्ग केवळ शिंदेसेनेत आहे असे नव्हे तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला त्यांचे अजिबातच पटत नाही. त्यात दादांचा पक्ष संघापासून फटकून असल्याचे दाखवतो तेव्हा चिडीत भर पडते. इतकी वर्षे ज्यांच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात आम्ही आवाज उठवला, जनतेत तो संताप पेरला आणि त्याच्या जीवावर मतांची पिके काढली, त्याला लागलेले गोड सत्तेचे कणीस अजितदादाच खुडून नेत आहेत. भाजपा, संघाचे कार्यकर्ते निमूटपणे त्यांनी चालवलेली लूट बघण्यावाचून काही करू शकत नाहीत हा या वर्गात मोठा अस्वस्थतेचा भाग आहे. फडणवीसांच्या जवळ आलेले जुने काँग्रेसचे नेते, त्यांचे अनुयायी त्यामुळे दूर जाऊ लागले आहेत. हर्षवर्धन पाटील आणि समरजित घाटगे ही त्यातील काही बडी उदाहरणे. शिंदे सेना अजितदादांचा पक्ष महायुतीतून बाहेर पडावा यासाठी टोकाचे बोलत आहे. पण, तरीही दादांच्या पक्षाची कुरघोडी शिंदे सेनेचा ताप वाढवत आहे. या विसंवादी वातावरणाने आधीच अडचणीत असलेल्या महायुतीला सुद्धा मोठा फटका बसण्याची चिन्हे आहेत. एका बाजूला मुख्यमंत्री आणि फडणवीस आपल्या सरकारने केलेल्या कामाचा प्रचार, प्रसार करतानाच चार कोटी 60 लाख महिलांच्या मतांवर नजर ठेवून आहेत. मात्र दादांच्या प्रचार यंत्रणेने तिथेही शिंदे, फडणवीस यांना बाजूला काढण्याचा प्रयत्न करून पाहिला आहे. जागावाटप निश्चित करायच्या बैठकीला हे नेते बसत असतील आणि त्यांनी आपण किती जागा लढायच्या हे ठरवले असले तरी प्रत्यक्षात तिथे काय होईल याची चुणूक दिसायला लागली आहे. ही स्थिती सुधारेल का? कदाचित निवडणूक जाहीर होईपर्यंत तरी यातून काही मार्ग दिसेल असे वाटत नाही.
शिवराज काटकर