For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कर्नाटकात काँग्रेसचा गर्वभंग

06:30 AM Oct 30, 2026 IST | Tarun Bharat Portal
कर्नाटकात काँग्रेसचा गर्वभंग
Advertisement

मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार हे निवडणुका जिंकण्यासाठी नवनवीन क्लृप्त्या लढवत असतात. राजकारणातले चाणक्य म्हणून ओळखले जाणारे  डी. के. शिवकुमार यांनी मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर पहिल्याच निवडणुकीला सामोरे गेले. नेहमीप्रमाणे आपल्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी ते काहीतरी चमत्कार करतील, अशी अपेक्षा होती. ती फोल ठरली. खास करून सुशिक्षित मतदारांनी भाजपची कास धरल्याचे या निकालावरून स्पष्ट झाले आहे.

Advertisement

कर्नाटकातील विधान परिषदेच्या निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेसला धक्का बसला आहे. पदवीधर व शिक्षक मतदारसंघांच्या चारपैकी चारही जागांवर भाजप-निजद युतीने विजय मिळविला आहे. मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष  बी. के. हरिप्रसाद या दोन्ही नेत्यांनी सत्ता स्वीकारल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक आहे. सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन डी. के. शिवकुमार यांच्याकडे सत्ता सोपवल्यानंतरची पहिलीच निवडणूक आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत मतदान यंत्रांचा नव्हे तर मतपत्रिकांचा वापर झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कर्नाटकातील भाजप-निजद विजयाचा उल्लेख केला आहे. मतपत्रिकांचा वापर झाला तरी भाजप व मित्र पक्षांचे उमेदवारच विजयी झाल्याचा उल्लेख करीत मतदान यंत्राला विरोध करणाऱ्यांना त्यांनी हा टोला हाणला आहे.

एक-दोन महिन्यांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांच्या अध्यक्षपदाची मुदत संपत आहे. हायकमांड कोणता निर्णय घेणार? विजयेंद्र यांच्याकडेच अध्यक्षपद राहणार? की कर्नाटकात नेतृत्वबदल होणार? असे प्रश्न उपस्थित केले जात असतानाच विधान परिषद निवडणूक निकालाने त्यांनाही संजीवनी मिळाली आहे. खरेतर मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार हे निवडणुका जिंकण्यासाठी नवनवीन क्लृप्त्या लढवत असतात. राजकारणातले चाणक्य म्हणून ओळखले जाणारे  डी. के. शिवकुमार यांनी मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर पहिल्याच निवडणुकीला सामोरे गेले. नेहमीप्रमाणे आपल्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी ते काहीतरी चमत्कार करतील, अशी अपेक्षा होती. ती फोल ठरली. खास करून सुशिक्षित मतदारांनी भाजपची कास धरल्याचे या निकालावरून स्पष्ट झाले आहे.

Advertisement

गृहमंत्री प्रियांक खर्गे व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बी. के. हरिप्रसाद यांनी सतत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला लक्ष्य बनवले आहे. संघाची नोंदणी कधी झाली? कोणी केली? कोणत्या कायद्यानुसार केली? त्यांना निधी कोठून येतो? ते नेमके करतात काय? अशी विचारणा करीत पथसंचलनासाठी पोलीस दलाकडून परवानगी घ्यावी लागणार, असे गृहमंत्र्यांनी जाहीर केले. गृहमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर संपूर्ण राज्यात पथसंचलन झाले. दसऱ्यापासून आतापर्यंत पथसंचलन सुरू आहेत. काँग्रेस नेत्यांची ही टीका पदवीधरांना रूचली नाही, असे वाटते. याबरोबरच काँग्रेसमधील अनागोंदीचा फटकाही त्यांच्या उमेदवारांना बसला आहे. मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाल्यानंतर सिद्धरामय्या शांत होते. स्टिंग ऑपरेशनच्या चर्चेत त्यांचे नाव ओढले गेल्याने ते अस्वस्थ आहेत. स्टिंग ऑपरेशनमागे कोण आहेत? आपल्याला अडकविण्याची खेळी कोणी खेळली? याचा तपासही व्यवस्थित होत नाही. याची खदखद सिद्धरामय्या यांच्या मनात आहे. हायकमांडकडे तक्रार करण्याच्या मन:स्थितीत ते आहेत.

जिल्हा व तालुका पंचायतीच्या निवडणुका घेण्यासाठी हालचाली सुरू आहेत. मतदारांनी भाजप व निजदला विधान परिषदेत कौल दिला आहे. त्यामुळे डी. के. शिवकुमार सरकारविरुद्धचीच ही भावना आहे, अशी व्याख्या केली जात असली तरी विधान परिषद निवडणूक निकालावरून सार्वत्रिक निवडणुकीचा अंदाज बांधणे कठीण जाते. ही गोष्ट खरी असली तरी काँग्रेस नेते निवडणूक प्रचारात कमी पडले, याचाही फटका पक्षाच्या उमेदवारांना बसला. केवळ दक्षिणेपुरते मर्यादित असलेले निजद या पक्षाची अवस्था बिकट होती. भाजपबरोबरच्या युतीमुळे त्यांना चारपैकी एका जागेवर विजय मिळाला. त्यामुळे निजदला उभारी आली आहे.

2028 च्या विधानसभा निवडणुकीत जर संयुक्तपणे सामोरे गेले तर सत्ता स्थापन करण्यापासून भाजप-निजद युतीला कोणीही रोखू शकणार नाही, अशी भावना दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये बळावली आहे. गेल्या एक महिन्यापासून स्टिंग ऑपरेशन व त्यामध्ये अडकलेल्या राजकीय पक्षांच्या नेत्यांविषयी कर्नाटकात चर्चा सुरू आहे. इतर पक्षांपेक्षाही काँग्रेस नेत्यांचीच नावे ठळक चर्चेत आहेत. स्टिंग ऑपरेशन करणारे आणि जाळ्यात अडकणारे दोघेही एकाच पक्षाचे आहेत. याचाही परिणाम पदवीधर व शिक्षक मतदारांवर झाल्याचे दिसून येते. विधान परिषद निवडणूक निकालामुळे भाजप-निजद युतीच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. काँग्रेसचा मात्र गर्वभंगच झाला आहे.

मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी सरकारवर आपली पकड अधिक मजबूत करण्याबरोबरच जनमानसात पक्षाची छबी सुधारण्यासाठीही प्रयत्न चालविले आहेत. सोमवारी 26 ऑक्टोबर रोजी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्री बेळगावात आले होते. कारखानदार व शेतकरी यांची मध्यरात्रीपर्यंत बैठक घेऊन ऊस दर ठरविण्यावरून निर्माण झालेला तिढा सोडविण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा काढून त्यांना न्याय देण्यासाठी आपण मागे हटणार नाही, हेच मुख्यमंत्र्यांनी या बैठकीतून दाखवून दिले आहे. शेतकऱ्यांच्या प्रती आपली बांधिलकीही मुख्यमंत्र्यांनी दाखवून दिली आहे. राज्य सरकारने 1 हजार रुपये प्रतिटन प्रोत्साहन निधी देण्याची मागणी शेतकरी नेत्यांनी केली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिलेले उत्तर थक्क करणारे आहे. ‘खिशात पैसे असतील तरच तुम्हाला देता येतील, राज्याची आर्थिक स्थिती गंभीर आहे. अशा परिस्थितीत सरकारच्या खजिन्यावर आणखी भार टाकता येणार नाही.’ असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. सत्ता मिळविण्यासाठी काँग्रेसने जारी केलेल्या पाच गॅरंटी योजनांमुळे सरकारची आर्थिक परिस्थिती चांगली नाही. हेच यावरून दिसून येते. सध्या भीषण दुष्काळाचे सावट आहे. नद्या, जलाशयांचे पाणी आटत चालले आहे. भूजल पातळीने तळ गाठला आहे. अशातच सरकारने बेळगावमध्ये हिवाळी अधिवेशनाचा घाट घातला आहे. दुष्काळाच्या छायेमध्ये अधिवेशन घेणे कितपत रास्त ठरणार आहे, याचा सरकारला विचार करावा लागणार आहे.

रमेश हिरेमठ

Advertisement
Tags :

.