अॅड. अमित पालेकर यांना काँग्रेसचे पुन्हा निमंत्रण
पणजी/ विशेष प्रतिनिधी
काँग्रेसकडून गेली काही वर्षे आलेली ऑफर पक्ष प्रेमासाठी धुडकाऊन लावणाऱ्या अमित पालेकर यांना अखेर ‘आप’च्या श्रेष्ठीनी अध्यक्षपदावरून खाली उतरविले, तरीदेखील पक्षावरचे त्यांचे प्रेम कमी झालेले नाही. काँग्रेस पक्षामधून पालेकर यांना पुन्हा एकदा प्रवेशासाठी आमंत्रित केले आहे.
आपचे नेते अरविंद केजरीवाल यांच्याच आदेशावरून पक्षाच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने जिल्हा पंचायत निवडणूक झाल्यानंतर व निकाल येण्यास काही अवधी राहिला असता प्रदेश अध्यक्ष पदावरून खाली उतरण्यास सांगितले. अखेरीस पक्षश्रेष्ठींनी त्यांना अध्यक्षपदावरून खाली उतरविले.
काँग्रेसशी युतीचा प्रस्ताव
यासंदर्भात अॅड. अमित पालेकर यांच्याशी संवाद साधला असता आप पक्षश्रेष्ठींच्या वागण्याने ते फार दुखावल्याचे जाणवले. या अगोदर पालेकर यांनी गोव्यात इतर विरोधी पक्षांबरोबर युती करूया असा प्रस्ताव आपच्या नवी दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांना दिला होता, मात्र काँग्रेस पक्षाशी फारकत घेतलेल्या अरविंद केजरीवाल व इतर पदाधिकाऱ्यांनी या प्रस्तावाला फारशी किंमत दिली नाही.
मुख्यमंत्रीपदाचे होते उमेदवार
मागील विधानसभा निवडणुकीच्या काही महिने अगोदर पालेकर हे आप पक्षात सामील झाले होते. त्यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून आपने जाहीर केले होते. सांताक्रुजमध्ये ते निवडणुकीला उभे होते. त्यांचा पराभव झाला, मात्र पक्षाचे काम त्यांनी चालू ठेवले होते. अन्य पक्षांच्या अनेक कार्यकर्त्यांना त्यांनी आपमध्ये आणले होते.
झेडपी निवडणुकीची केली तयारी
अलीकडे नवी दिल्लीतील निवडणुकीमध्ये आपचा सपशेल पराभव झाल्यानंतर काही पदाधिकाऱ्यांनी गोव्यामध्ये आपची साथ सोडली, मात्र पालेकर यांनी पक्षाची साथ सोडली नव्हती. पक्षाने आदेश दिल्यानंतर त्यांनी जिल्हा पंचायतीच्या निवडणुकीसाठी 42 मतदारसंघांमध्ये उमेदवार निवडले. पक्ष कार्यरत ठेवण्यासाठी पालेकर यांनी बरेच प्रयत्न केले.
यंदाच्या जिल्हा पंचायत निवडणुकीमध्ये आपचा केवळ एकमेव सदस्य विजयी झाला. सर्व उमेदवार हरल्यामुळे पक्षश्रेष्ठींनी पालेकर यांना अध्यक्षपदावरून हटविले.
पक्ष सोडलेला नाही
पालेकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की आपण केवळ अध्यक्षपदावरून उतरलेलो आहे, पक्ष सोडलेला नाही. आपण काही दिवस शांत राहणेच पसंत करीन असे ते म्हणाले आणि पक्षाच्या निर्णयावर जादा भाष्य करण्यास त्यांनी नकार दिला.
‘आप’ला लवकरच पडणार खिंडार
प्राप्त माहितीनुसार काँग्रेस पक्षाने अमित पालेकर यांना पक्षात प्रवेश करण्याचे खुले निमंत्रण दिले आहे. पालेकर यांच्या संपर्कात असलेल्या आपच्या अनेक कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी सामूदायिक राजीनामे देऊन काँग्रेस पक्षात प्रवेश करण्यावर विचार चालविला आहे. पालेकर यांच्यावर काँग्रेस पक्षात प्रवेश करण्यासाठी दबाव वाढला आहे. त्यामुळे अवघ्या काही दिवसात गोव्यात ‘आप’ला खिंडार पडण्याची शक्यता आहे.