काँग्रेसचे गोवा प्रदेश निरीक्षक माणिकराव ठाकरे आज गोव्यात
पणजी : काँग्रेस पक्षाचे गोवा प्रभारी व निरीक्षक माणिकराव ठाकरे आज बुधवार दि. 6 मार्च रोजी गोव्यात येत असून लोकसभा उमेदवारी आणि निवडणूक तयारी याबाबत ते राज्यातील काँग्रेस नेत्यांशी चर्चा करणार आहेत. काँग्रेसचे आमदार, खासदार आणि प्रमुख नेते, संभाव्य उमेदवार यांच्याशी ते चर्चा करणार असून त्याचा अहवाल काँग्रेस केंद्रीय समितीला सादर करणार असल्याचे सांगण्यात आले. मागील विधानसभा निवडणुकीत म्हणजे 2022 मध्ये जे काँग्रेसचे उमेदवार होते त्यांच्याशी चर्चा करुन लोकसभा उमेदवारांसंदर्भात त्यांची मते आजमावणार आहेत. या सप्ताहाच्या अखेर दिल्लीत काँग्रेसच्या केंद्रीय समितीची बैठक होणार असून त्यात गोव्यासह देशातील उमेदवारांची नावे निश्चित होण्याची व जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. काँग्रेस व आपची गोव्यात युती झाली असून आपच्या नेत्यांशी देखील ते बोलणी करतील, असा अंदाज आहे. दक्षिण गोव्यात भाजप महिला उमेदवार देणार असल्याने काँग्रेस नेते थोडे सुखावले असून खरोखरच महिला उमेदवार भाजपने दिला तर ती जागा आपसुकच काँग्रेसला मिळणार असा त्यांचा दावा आहे. उत्तर गोव्यासाठी रमाकांत खलप हे काँग्रेस उमेदवारीचे दावेदार असून दक्षिण गोव्यासाठी विद्यमान खासदार फ्रान्सिस सार्दिन हे दावेदार आहेत. त्यांनाच लोकसभेची उमेदवारी मिळणार असे संकेत मिळत आहेत. राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ठाकरे येत असून त्याचाही अहवाल ते देणार असल्याचे सांगण्यात आले.