काँग्रेस - गोवा फॉरवर्ड संबंध ताणले
विरोधी पक्षांच्या बैठकीस विजयची दांडी दोन्ही नेत्यांचे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप
पणजी/ विशेष प्रतिनिधी
काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड यांच्या दरम्यान युती होणे अद्याप शिल्लक आहे, मात्र या दोन्ही पक्षाच्या नेत्यांदरम्यान संबंध बरेच ताणलेले आहेत. आगामी विधानसभा अधिवेशना संदर्भात विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी बोलविलेल्या बैठकीस विजय सरदेसाई यांनी दांडी मारली. त्यानंतर आपल्याला या बैठकीस बोलविण्यात आले नाही, असा आरोप विजय सरदेसाई यांनी केला तर युरी आलेमाव यांनी सरदेसाई यांना पाठवलेला संदेशच पत्रकारांना दाखविला.
एका बाजूला काँग्रेस व गोवा फॉरवर्ड यांच्या दरम्यान युती व्हावी, असे दोन्ही पक्षाच्या नेत्यांना वाटते खरे परंतु आपसात मात्र धूसफूस चालूच आहे. गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये आलेमाव आणि विजय सरदेसाई यांच्या दरम्यान अंतर्गत वाद चालूच आहे. अनेकवेळा तो विधानसभेच्या कामकाजाच्या दरम्यान देखील दिसून आला. यापूर्वी विजय सरदेसाई यांनी युरी आलेमाव यांच्यावर जोरदार टीका देखील केली होती. प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदी गिरीश चोडणकर यांची नियुक्ती झाल्यानंतर पासून या दोन्ही नेत्यांमध्ये आपसातील वाद मिटतील, असे वाटत होते मात्र ते मिटण्याऐवजी वाढतच आहेत.
सोमवारी आगामी विधानसभा अधिवेशन संदर्भात महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी विरोधी पक्षाच्या सर्व आमदारांना बैठकीस बोलाविले होते. या बैठकीत विधानसभा अधिवेशनाचा कालावधी वाढविण्यात यावा, अशी जोरदार मागणी सभापतींकडे करण्याचे ठरविले आहे. या महत्त्वाच्या बैठकीस गोवा फॉरवर्डचे नेते विजय सरदेसाई हे उपस्थित नव्हते. तिथूनच वादाची ठिणगी पेटली.
विजय सरदेसाई यांचे हे म्हणणे पत्रकारांनी सदर बैठकीनंतर युरी आलेमाव यांना सांगितले, आणि त्यांची प्रतिक्रिया विचारली असता आलेमाव म्हणाले की आपण सर्वांना संदेश पाठविले होते.
विरोधी पक्षनेत्याने आम्हाला बैठकीला बोलवायला हवे होते
पत्रकारांनी विजय सरदेसाई यांना विचारले असता ते म्हणाले, ही बैठक आहे हे आपल्याला माहीतच नाही. आम्ही आहोत एकूण सातजण. विरोधी पक्षनेत्याचे काम होते की त्यांनी आम्हा सर्वांना या बैठकीसाठी बोलवायचे. ही बैठक कोणी ठरवली, मला माहीत नाही परंतु सर्वांना विचारात आणि विश्वासात घेऊन बैठक घेणे आवश्यक होते. आपल्याला निमंत्रण मिळाले नाही, त्यामुळे आपण या बैठकीबाबत अनभिज्ञ होतो, असे विजय सरदेसाई यांनी स्पष्ट केले.
विजय सरदेसाई
सरदेसाई बैठकीला का उपस्थित राहिले नाही, हे कळले नाही
विरोधीपक्षनेते युरी आलेमाव म्हणाले की आपण विजय सरदेसाई यांना बैठकीचे निमंत्रण आपण त्यांच्या स्वत:च्या भ्रमणध्वनीवर संदेशाद्वारे दिले होते. तरीही ते बैठकीला का उपस्थित राहिले नाही, ते आपणास कळले नाही. गैरहजेरीचे कोणतेह कारण त्यांना कळविले नव्हते, असेही युरी आलेमाव म्हणाले.
युरी आलेमाव
बोलविले असते तर गेलो असतो
युरी आलेमाव यांनी जो संदेश विजय सरदेसाई यांना पाठविला होता तो त्यांनी पत्रकारांना दाखविला. विजय सरदेसाई यांनी सांगितले की माझ्या नावे भलत्याच कोणाचा नंबर युरी आलेमाव यांनी सेव केला असेल तर मला माहीत नाही, परंतु त्यांनी जर सांगितले असते तर मी जरूर त्या बैठकीला गेलो असतो.
भाजपला आव्हान देण्यास एकटाचा पुरेसा
आपण एकटाच आमदार भाजपच्या राजवटीला आव्हान देण्यास पुरेसा आहे आणि आपण गेली साडेचार वर्षे भाजपला आव्हान देत आहे. त्यामुळे आपल्याला फारशी कोणाची गरज नाही. आपल्या पक्षाची युती थेट राहुल गांधी यांच्याकडे आहे, युरी आलेमाव यांच्याशी युती केलेली नाही. ते पहिल्यांदाच आमदार झालेले आहेत. त्यामुळे त्यांचे म्हणणे फारसे कोणी गांभीर्याने घेत नाही, असा टोला विजय सर्देसाई यांनी लगावला.
दरम्यान या प्रकरणामुळे काँग्रेस व गोवा फॉरवर्ड यांच्या दरम्यान युती होण्याअगोदरच ताण-तणाव वाढत गेलेला आहे. यावर प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर कोणती भूमिका घेतात हे पहावे लागेल. युरी आलेमाव यांनी आपला देखील बैठकीला बोलाविले होते.