बांगलादेशी हिंदूंच्या सुरक्षेवरुन काँग्रेसला चिंता
भारत सरकारने आवश्यक पावले उचलावीत : पवन खेडांची मागणी
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
काँग्रेसने बुधवारी बांगलादेशातील धार्मिक अल्पसंख्याकांसमोर निर्माण झालेले ‘असुरक्षिततेचे वातावरण’ आणि हिंदू नेते चिन्मय कृष्ण दास यांच्या अटकेबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे. बांगलादेश सरकारवर आवश्यक पावले उचलणे तसेच देशातील अल्पसंख्याकांचे जीवन आणि संपत्तीची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी भारत सरकार दबाव टाकेल, अशी अपेक्षा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस करत असल्याचे पक्षाचे नेते पवन खेडा यांनी म्हटले आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस बांगलादेशात धार्मिक अल्पसंख्याकांसमोर उद्भवलेल्या असुरक्षिततेच्या वातावरणावर तीव्र चिंता व्यक्त करत आहे. इस्कॉनच्या पदाधिकाऱ्याला झालेली अटक ही याचे नवे उदाहरण असल्याचे पवन खेडा यांनी म्हटले आहे.
बांगलादेशातील सुरक्षा दल आणि दास यांच्या अनुयायांदरम्यान झालेल्या झटापटीत मंगळवारी एका वकीलाचा मृत्यू झाला होता. तर चिन्मय दास यांना बांगलादेशातील चितगाव शहरातील न्यायालयाने जामीन देण्यास नकार देत तुरुंगात रवानगी केली होती. बांगलादेश सम्मिलिता सनातनी जागरण जोतेचे प्रवक्ते दास यांना सोमवारी ढाका येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक केली होती. हिंदू नेत्याला झालेली अटक आणि जामीन मंजूर न झाल्याप्रकरणी भारत सरकारने तीव्र चिंता व्यक्त केली होती. तसेच बांगलादेशला हिंदू तसेच अन्य सर्व अल्पसंख्याकांची सुरक्षा सुनिश्चित करण्याचे आवाहन केले होते. यावर बांगलादेशने भारतीय विदेश मंत्रालयाने केलेले वक्तव्य हे निराधार असून दोन्ही देशांच्या मैत्रीच्या विपरित झाल्याची टिप्पणी केली आहे. आम्ही आमच्या न्यायपालिकेच्या कार्यात हस्तक्षेप करत नसल्याचा दावा बांगलादेशच्या अंतरिम सरकारने केला होता.
चिन्मय दास तुरुंगात
बांगलादेशातील न्यायालयाने चिन्मय यांना जामीन देण्यास नकार दिला आहे. चिन्मय यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली सोमवारी अटक करण्यात आली होती. चिन्मय यांना न्यायालयाने जामीन नाकारल्यावर परिसरात उपस्थित त्यांच्या अनुयायांनी जय श्रीराम अशा घोषणा दिल्या होत्या. तर चिन्मय यांनी स्वत:च्या समर्थकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.