‘गोवा फॉरवर्डसोबत काँग्रेसची आघाडी आधीपासूनच’; विजय सरदेसाईंसाठी पक्षाची दारे खुली : एम. के. शेख
पणजी : गोवा फॉरवर्ड पार्टी (GFP) आणि काँग्रेस यांच्यातील आघाडीबाबत सुरू असलेल्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एम. के. शेख यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. गोवा फॉरवर्डसोबत काँग्रेसची आघाडी आधीपासूनच असल्याचे सांगत, विजय सरदेसाई यांच्यासाठी काँग्रेसची ‘केवळ दारेच नव्हे, तर खिडक्याही’ खुल्या आहेत, असे शेख यांनी म्हटले आहे.
आगामी गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड यांच्यातील राजकीय समीकरणांबाबत चर्चा सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने विजय सरदेसाई यांची भेट घेऊन आघाडीबाबत चर्चा केली होती. मात्र, या बैठकीत ठोस निर्णय झाला नसल्याचे वृत्त आहे.
शेख यांनी सांगितले की, काँग्रेस विजय सरदेसाई यांच्या पुढील भूमिकेची प्रतीक्षा करीत आहे. पक्षाकडून गोवा फॉरवर्डला पुन्हा आघाडीसाठी निमंत्रण देण्यात आले असून, सरदेसाई यांनी पुढाकार घेतल्यास पुढील चर्चा करण्याची काँग्रेसची तयारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, गोवा फॉरवर्डकडून ‘गोवा फर्स्ट’च्या माध्यमातून समान विचारसरणीच्या पक्षांना एकत्र आणण्याची भूमिका मांडण्यात आली आहे. त्यामुळे काँग्रेस-गोवा फॉरवर्ड आघाडीबरोबरच अन्य विरोधी पक्षांमधील संभाव्य राजकीय समीकरणांबाबतही चर्चा सुरू आहे.
आम आदमी पक्षाचा (AAP) संभाव्य सहभाग याबाबत विचारले असता, कोणताही प्रस्ताव आल्यास तो काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसमोर ठेवून त्यावर निर्णय घेतला जाईल, असे शेख यांनी स्पष्ट केले. काँग्रेसने यापूर्वीही समविचारी पक्षांसोबत आघाडीच्या शक्यतेवर चर्चा केली आहे.
यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस, गोवा फॉरवर्ड आणि ‘गोवा फर्स्ट’च्या माध्यमातून आकार घेत असलेल्या राजकीय समीकरणांकडे लक्ष लागले आहे.