For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जागावाटपावरून काँग्रेस-द्रमुक यांच्यात रस्सीखेच

06:51 AM Mar 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
जागावाटपावरून काँग्रेस द्रमुक यांच्यात रस्सीखेच
Advertisement

काँग्रेस नेतृत्वाने चिदंबरम यांना चर्चेसाठी पाठविले : स्टॅलिन यांची घेतली भेट

Advertisement

वृत्तसंस्था/ चेन्नई

तामिळनाडूतील आगामी निवडणुकीवरून राजकीय घडामोडींना वेग घेतला आहे. राज्यात सत्तारुढ द्रमुक आणि काँग्रेस यांच्यात आघाडी असून त्यांच्यात जागावाटपाच्या मुद्द्यावरून मोठी रस्सीखेच सुरू आहे. जागावाटपावर सहमती होत नसल्याने काँग्रेस नेतृत्वाने आता वरिष्ठ नेते पी. चिदंबरम यांना हा तिढा सोडविण्याची जबाबदारी सोपविली आहे.

Advertisement

चिदंबरम यांनी मंगळवारी मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत तामिळनाडू काँग्रेस प्रमुख सेल्वापेरुन्थगई होते. ही बैठक चेन्नईत मुख्यमंत्र्यांच्या कॅम्प कार्यालयात झाली आहे. द्रमुक अध्यक्ष स्टॅलिन यांच्यासोबत काँग्रेस नेत्यांची ही बैठक सुमारे तासभर चालली. यादरम्यान दोन्ही पक्षांशी संबंधित अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली आहे.

जागावाटपावरून पेच

दोन्ही पक्ष आघाडी कायम ठेवू इच्छितात, परंतु जागावाटपावरून त्यांच्यात असहमती आहे. प्रारंभी काँग्रेसने राज्यात 39 जागांची मागणी केली होती. तर द्रमुकने काँग्रेसला राज्यसभेची एक जागा देण्याचा प्रस्ताव दिला होता. काँग्रेसला एकूण किती जागा सोडण्यात याव्यात यावरच चर्चा रखडली आहे. आता याप्रकरणी लवकरच अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. काँग्रेस विधानसभा निवडणुकीसाठी 28 जागा आणि राज्यसभेच्या दोन जागांच्या फॉर्म्युल्याला सहमती देण्याची शक्यता आहे.

लवकरच तोडगा काढू : द्रमुक

काँग्रेससोबत आघाडी कायम रहावी अशी द्रमुकची इच्छा आहे. चर्चा सुरू असून आमचे नेते एक चांगला निर्णय घेतील. आमचे नेते हा मुद्दा सौहार्दपूर्ण पद्धतीने सोडवू इच्छितात असे वक्तव्य द्रमुक प्रवक्ते टी.के.एस. एलंगोवन यांनी पत्रकारांशी बोलताना केले. द्रमुकने यापूर्वी काँग्रेसकरता 25 जागा सोडण्याची तयारी दर्शविली होती. हा प्रस्ताव काँग्रेसने मान्य केला नव्हता.

Advertisement
Tags :

.