...तर काँग्रेसचे निम्याहून जागावर डिपॉझिट जप्त होईल- प्रकाश आंबेडकर
आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये जर काँग्रेस एकट्यानेच लढली तर महाराष्ट्रातील ५० टक्के जागांवर त्यांचे डिपॉझिट जप्त होईल असा खुलासा वंचित बहूजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. त्यांनी आपल्या वक्तव्यावरून महाविकास आघाडीला युतीसंदर्भात एकप्रकारे इशाराच दिला आहे. तसेच मुसलमानांनी काँग्रेससोबत जाऊ नये या त्यांच्या जाहीर वक्तव्याने महाविकास आघाडीमधील तणावामध्ये अजून भर पडली आहे.
वंचित बहूजन आघाडीचा महाविकास आघाडीमध्ये समावेश! मुंबईतील मविआच्या बैठकीमध्ये महत्वपुर्ण निर्णय
वंचित बहूजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी मुस्लीम कार्यकर्त्यांच्या मेऴाव्याला संबोधित करताना त्यांनी काँग्रेसवर जोरदार टिका केली.
या जाहीर सभेत बोलताना मित्रपक्षांच्या पाठिंब्याशिवाय काँग्रेसला निवडणूक जिंकणे कठीण जाणार असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, "काँग्रेस यापुढे एकट्याने देशाचे नेतृत्व करू शकत नाही, काँग्रेसच्या हट्टीपणामुळे भारताचा गट कसा विघटित झाला हे आपण पाहत आलोय. काँग्रेसने महाराष्ट्रात सुद्धा असंच केलं तर त्याचा महाविकास आघाडीवर विपरित परिणाम होईल.” असेही ते म्हणाले.
मुस्लीम समाजाला आवाहन करताना त्यांनी धक्कादायक विधान केलं आहे. ते म्हणाले, “काँग्रेसच्या अशा वागण्याने मुस्लिम मतदारांनी आता काँग्रेस सोबत जाऊ नये. आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यातील 48 पैकी अर्ध्या जागांवर काँग्रेस एकटी लढली तर अर्ध्याहून अधिक ठिकाणी त्यांचं डिपॉझिट जप्त होईल. राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांची महाविकास आघाडी आहे मात्र यांच्यात जागा वाटपा वरून अद्याप एकमत होताना दिसत नाही." असे त्यांनी म्हटले आहे.