For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

काँग्रेस भ्रष्ट, हिंदूविरोधी : नड्डा

12:03 PM Mar 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
काँग्रेस भ्रष्ट  हिंदूविरोधी   नड्डा
Advertisement

भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप : चिकोडीत बूथपातळीवरील पदाधिकाऱ्यांचे संमेलन

Advertisement

चिकोडी : काँग्रेस पक्ष भ्रष्ट, घराणेशाही, मतांसाठी तुष्टीकरण आणि हिंदू, युवक, महिला, शेतकरी विरोधी भूमिका घेणारा आहे. तसेच पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणा देणारे, दहशतवाद्यांशी संबंध बाळगणाऱ्यांचे समर्थन करणारा पक्ष आहे. काँग्रेसने आपण कोणाचे नेतृत्व करीत आहोत, हे स्पष्ट करण्याची गरज आहे. भारत जोडो यात्रा काढणाऱ्या पक्षाकडून देशविरोधी कृत्ये घडत असून त्यावर  काँग्रेसकडून पांघरुण घालण्यात येत आहे. त्यामुळे एकप्रकारे काँग्रेस स्फोट, दहशतवादाला पाठिंबा देत असल्याचा आरोप भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केला. चिकोडी येथे किवड मैदानावर आयोजित चिकोडी लोकसभा मतदारसंघातील बूथ पातळीवरील अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांच्या संमेलनात ते बोलत होते. व्यासपीठावर जे. पी. नड्डा, राज्य भाजप अध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र, खासदार आण्णासाहेब जोल्ले, आमदार शशिकला जोल्ले यांचे 12.17 वाजता आगमन झाले. रोपाला पाणी घालून संमेलनाचा नड्डा यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.

जे. पी. नड्डा पुढे म्हणाले, सन 1951-52 सालापासून तत्कालीन जनसंघापासून आजतागायत भाजपची ध्येय, धोरणे एकच आहेत. कलम 370 हटविणे, राम मंदिर निर्मितीसह एकात्मता, मानवता विचारधारेतून सर्वांचा विकास साधला जात आहे. भाजप ही आज जगातील मोठी राजकीय पार्टी असून या पक्षाला आदर्श व देशप्रेमाच्या विचारांची बैठक आहे. ज्या काँग्रेसने 70 पैकी 60 वर्षे देशावर सत्ता गाजविली, तरीही काँग्रेसने अन्यायाला सामोरे जाणाऱ्या मुस्लीम महिलांची तीन तलाकच्या जोखंडातून मुक्तता केली नाही. तिहेरी तलाकची प्रथा संपुष्टात आणण्यासाठी भाजपलाच सत्तेत यावे लागले. 2014 पूर्वी भारताची अवस्था आत्मविश्वास गमावलेल्या देशाची होती. त्यानंतर मोदींच्या नेतृत्वाखाली देशाने आश्वासकच नव्हे तर जागतिक पातळीवर स्पर्धात्मक वाटेवर वाटचाल सुरू केली. विश्वासावर विकासाकडे झेप घेणारा देश म्हणून आज भारत जगात ओळखला जात असल्याचे सांगितले.

Advertisement

ते पुढे म्हणाले, बदल घडवून आणायचा व कर्तृत्वावर पुढे जायचे हा भाजपाचा घोषमंत्र आहे. त्या दिशेने सर्वच पातळीवर देशाचा विकास घडत आहे. रोज 14 किलोमीटर रेल्वेमार्ग निर्मिती, 29 किलोमीटर महामार्गाची निर्मिती, रोज 7 हजार कुटुंबांना नळजोडणी असा विकास सुरूच आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतून कर्नाटकातील 4 कोटी लाभार्थींना, देशातील 80 कोटीपैकी 25 कोटी जनतेला दारिद्र्या रेषेबाहेर काढण्यात आले. राज्यातील 53 लाख शेतकऱ्यांना किसान सन्मान योजनेचा लाभ, आयुष्मान भारत योजनेशी राज्यातील 62 लाख जणांना जोडण्यात आले आहे. राज्यातील काँग्रेस सरकार केंद्रातील भाजप सरकार आर्थिक मदत करीत नसल्याचा आरोप करीत आहे. पण 2014 ते 2023 या काळात केंद्रातील भाजप सरकारने कर्नाटक राज्य सरकारला 275 टक्के वाढीव निधी दिला आहे. भाजपच्या बूथ पातळीवरील कार्यकर्त्यांनी आपापल्या वॉर्डातील प्रत्येक घर, लाभार्थी, मतदार यांच्यापर्यंत पोहचून भाजपच्या विकासकामांची माहिती द्यावी, असे आवाहन केले. यावेळी राज्य प्रदेश भाजपाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र, राज्याचे लोकसभा निवडणूक प्रभारी राधामोहन अग्रवाल, खासदार आण्णासाहेब जोल्ले, आमदार शशिकला जोल्ले, आमदार दुर्योधन ऐहोळे, आमदार निखिल कत्ती, आमदार हनुमंत निराणी, माजी विधान परिषद सदस्य महांतेश कवटगीमठ, माजी खासदार रमेश कत्ती, अमित कोरे, माजी आमदार महेश कुमठळ्ळी, रमेश देशपांडे, मल्लिकार्जुन कोरे, माजी नगराध्यक्ष प्रवीण कांबळे, जिल्हा भाजप अध्यक्ष सतीष आप्पाजीगोळ आदी उपस्थित होते.

काँग्रेस सरकार हिंदू विरोधी

काँग्रेसने सातत्याने राम मंदिराला विरोध केला, राम हे पात्र काल्पनिक असल्याचा प्रतिवाद केला. राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठाना कार्यक्रमावर काँग्रेसने बहिष्कार टाकला. राज्यातील हिंदू मंदिरांवर 10 टक्के कर बसविला, दुसरीकडे अल्पसंख्याकांसाठी 10 हजार कोटीची तरतूद करण्याची राज्यातील काँग्रेस सरकारने घोषणा केली. राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार विजयी झाल्यानंतर विधानसभेतच पाकिस्तानचा जयघोष करण्यात आला. त्यावर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या सर्वांनी मौन का पाळले याचे उत्तर त्यांना जनतेला द्यावेच लागेल. अशा पाक समर्थकांच्या घोषणा घेणारे राज्यसभेत काँग्रेसचे नेतृत्व करणार का? देशविरोधकांना पाठिशी घालणाऱ्या काँग्रेसला राज्यातील जनता कदापि माफ करणार नाही. राज्यात भाजप सत्तेवर असताना शांत असलेले वातावरण आता बिघडले असून काँग्रेस सरकार कारवाई करण्यात नरमाईची भूमिका घेत असल्याचे सर्वजण जाणतात. देश जोडो यात्रा करणारे अशा लोकांसोबत मिळून देश जोडणार काय याचे उत्तर द्यावे, असे आव्हानही नड्डा यांनी दिले.

Advertisement
Tags :

.