फेरीबोट दुर्घटनेचा काँग्रेसकडून निषेध
बेती येथील नदी परिवहन खात्याच्या अधिकाऱ्यांना घेराव,जनतेच्या जीवाशी खेळल्यास आंदोलन : अमित पाटकर
पणजी : चोडण फेरीधक्क्यावर बुडालेल्या ‘बेती’ नामक फेरीबोट दुर्घटनेचा काँग्रेस पक्षाने निषेध नोंदवत नदी परिवहन खात्याचे संचालक विक्रमसिंह भोसले यांना बेती येथे जाऊन घेराव घातला. तसेच त्यांना जाब विचारण्यात आला. त्यावर चौकशी चालू आहे, एवढेच उत्तर भोसले यांनी दिले. गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष अमित पाटकर यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे अनेक कार्यकर्ते पणजी फेरीधक्क्यावर जमले आणि तेथून ते फेरीबोटीमधून पलीकडे बेती येथे गेले. नदी परिवहन खात्याचे कार्यालय बेती येथे असल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांनी आपला मोर्चा बेती फेरी धक्क्यावरून तिकडे वळवला.
फेरीबोट बुडाल्याने त्यातून नियमितपणे प्रवास करणारे गोमंतकीय प्रवासी चिंताग्रस्त झाले असून सर्व फेरीबोटीची तातडीने सुरक्षा तपासणी करावी, अशी मागणी पाटकर यांनी केली आहे. सदर फेरीबोट बुडाल्याचे प्रकरण सरकारने व खात्याने गंभीरपणे घेतले नसल्याचा आरोप पाटकर यांनी त्यावेळी बोलताना केला. प्रवासी वाहने घेऊन जाताना फेरीबोट बुडाली तर त्यात आवश्यक ती सुरक्षा यंत्रणा, अग्निशामक सेवा अशा सोयी नाहीत, तेव्हा प्रवाशांनी काय करावे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. हे प्रकरण म्हणजे अपघात नसून खात्याचा, अधिकारी कर्मचारीवर्गाचा निष्काळजीपणा आहे. चौकशी करून संबंधित अधिकारी, कर्मचारी यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी पाटकर यांनी केली. जनतेच्या जीवाशी सरकारने खेळू नये नाहीतर आंदोलन करण्याचा इशारा पाटकर यांनी दिला.