गरिबी, विकास, शोषण आदींची काँग्रेसला काळजी
आमदार आर. व्ही. देशपांडे यांचे प्रतिपादन : यल्लापूर तालुक्यातील गुळ्ळापूर-वज्रळ्ळी येथे काँग्रेस पक्षाची प्रचारसभा
कारवार : जात, धर्माचा वेडेपणा काँग्रेस पक्षाला नाही. जात, धर्मऐवजी गरिबी, विकास, शोषण आदींची काळजी काँग्रेसला अधिक वाटते, असे प्रतिपादन राज्य प्रशासन सुधारणा आयोगाचे अध्यक्ष आणि हल्याळचे आमदार आर. व्ही. देशपांडे यांनी केले. ते यल्लापूर तालुक्यातील गुळ्ळापूर आणि वज्रळ्ळी व्याप्तीतील काँग्रेस पक्षाच्या प्रचारसभेत बोलत होते. ते पुढे म्हणाले, भाजपवाल्यांनी कारवार जिल्ह्यासाठी काय केले आहे? जिल्हावासीय अडचणीत आले असताना भाजपवाल्यांनी काय मदत केली आहे? माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महापुराच्या वेळी जिल्ह्याचा दौरा केला. तथापि, पुढे त्यांनी काय केले? असे प्रश्न उपस्थित करून देशपांडे पुढे म्हणाले, काँग्रेसवाल्यांना जात, धर्म आधारित राजकारण करण्याचा नाद नाही. जिल्ह्यात जनता प्रेमाने, विश्वास, शांततामय वातावरणात नांदायची असेल तर येथे काँग्रेसच पाहिजे. 7 मे रोजी होणाऱ्या मतदानाला फार महत्त्व प्राप्त झाले आहे. मतदारसंघात बदल घडवून आणण्यासाठी सर्वजण इच्छूक आहेत. केवळ इच्छा असून चालत नाही, त्यासाठी 7 मे रोजी काँग्रेसचे बटण दाबले पाहिजे. सिद्धी समाजाचा समावेश एसटीमध्ये काँग्रेसने केल्याचे सांगितले. याप्रसंगी बोलताना काँग्रेसच्या उमेदवार डॉ. निंबाळकर म्हणाल्या, जिल्ह्यातील अति मागासलेल्या सिद्धी समाजाचा समावेश एसटीमध्ये काँग्रेसच्या मार्गारेट अल्वा यांनी केला. त्यामुळे उपेक्षित सिद्धी समाजाला फार मोठा लाभ झाला आहे. अडचणीत आलेल्या प्रत्येकाला काँग्रेसने नेहमीच साथ दिली आहे. नव्या उमेदीने आणि ताकदीने जनतेची सेवा करण्यासाठी मतदारांनी मतदानाद्वारे काँग्रेसला साथ दिली पाहिजे, असे आवाहन पुढे निंबाळकर यांनी केले.
लोकसभेत आवाज उठविण्यासाठी निंबाळकर यांना निवडून द्या
याप्रसंगी बोलताना कारवार जिल्हा पालकमंत्री मंकाळू वैद्य म्हणाले, काँग्रेसच्या उमेदवार डॉ. अंजली निंबाळकर खानापूर मतदारसंघातून निवडून आल्या असताना त्यांनी विधानसभेत खानापूर तालुक्यातील समस्यांबद्दल आवाज उठविला होता. निंबाळकर यांना निवडून आणले तर त्या लोकसभेत मतदारसंघाच्या समस्येबद्दल आवाज उठविण्यासाठी समर्थ आहेत. यल्लापूरचे आमदार शिवराम हेब्बार यांचे पुत्र आणि अलीकडेच काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या विवेक हेब्बार यांनी येत्या काही दिवसात संघटितपणे काम करून निंबाळकर यांना निवडून आणण्याचे आवाहन केले.