Solapur Politics | विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराचाच अर्ज बाद
10:55 AM Jun 03, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
Advertisement
विधान परिषद निवडणुकीत नाट्यमय घडामोडी
Advertisement
सोलापूर : सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत मंगळवारी नाट्यमय घडामोडी घडल्या. काँग्रेसचे उमेदवार आदित्य फत्तेपूरकर यांच्या उमेदवारी अर्जावरील सूचकानेच आपली सही बनावट असल्याचे प्रतिज्ञापत्र सादर केले. त्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा अर्ज बाद ठरविण्यात आला.
उमेदवारी अर्जांची छाननी सुरू असताना सूचक नागेश भोसले यांनी संबंधित स्वाक्षरी आपली नसल्याचे प्रतिज्ञापत्र जिल्हाधिकारी कार्यालयात सादर केले. यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मोठी खळबळ उडाली. काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले तसेच दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
Advertisement
दरम्यान महाविकास आघाडीला निवडणूक लागल्यापासून हा दुसरा धक्का बसला आहे. भाजप उमेदवाराचा अर्ज दाखल करताना महाविकास आघाडीतील दोन आमदार भाजपसोबत होते तर आता काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्जच बाद झाल्याने महाविकास आघाडीला दुसरा धक्का बसला आहे.
या घडामोडींची माहिती मिळताच खासदार प्रणिती शिंदे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेत भाजपवर गंभीर आरोप केले. नागेश भोसले यांना दबावाखाली आणून प्रतिज्ञापत्र देण्यास भाग पाडल्याचा तसेच त्यांचे अपहरण करून दबाव टाकल्याचा आरोप त्यांनी केला. यासंदर्भातील ध्वनिमुद्रित पुरावे आपल्याकडे असल्याचा दावाही त्यांनी केला.
दूसरीकडे नागेश भोसले यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत, 'मी काँग्रेस पक्षाचा सदस्य नसून तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून निवडून आलो आहे. माझ्या नावाने करण्यात आलेली स्वाक्षरी बनावट आहे. मी कोणत्याही दबावाला किंवा आमिषाला बळी पडलेलो नाही,' असे स्पष्ट केले. याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, भाजपचे उमेदवार राजेंद्र राऊत, आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि आमदार देवेंद्र कोठे हे दिवसभर जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित होते. काँग्रेसच्या आरोपांना उत्तर देताना भाजप नेत्यांनी सर्व आरोप निराधार असल्याचे म्हटले. निवडणूक प्रक्रियेत कोणी हस्तक्षेप केला असल्यास त्याची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी आमदार देवेंद्र कोठे यांनी केली.
काँग्रेस उमेदवाराचा अर्ज बाद झाल्यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. अंतिम उमेदवार यादीत महाविकास आघाडीचे केशव दौलतराव बनगर आणि भाजपचे राजेंद्र विठ्ठल राऊत यांच्यासह पाच अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे.
महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) व काँग्रेसच्या पाठिंब्यावर केशव बनगर निवडणूक लढवत आहेत, तर भाजपने राजेंद्र राऊत यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे. त्यामुळे या दोन्ही प्रमुख उमेदवारांमध्ये थेट लढत होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
याशिवाय अक्कलकोटचे नागेश हरिभाऊ बाबराव, जीवन उत्तमराव जानकर, धनंजय महादेव डिकळे, महेश देविदास साठे आणि रमेश नागनाथ बारस्कर यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात आपले आव्हान कायम ठेवले आहे.
अपक्ष उमेदवारांमुळे मतांचे विभाजन होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. स्थानिक राजकीय समीकरणे, गटबाजी आणि पक्षीय ताकद यांचा निकालावर मोठा प्रभाव पडणार आहे.