काँग्रेसचे प्रचारधोरण आणि भिस्त
गेल्या शुक्रवारच्या सदरात भारतीय जनता पक्षाची प्रचारशैली आणि यंत्रणा यांच्यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. या सदरात विरोधकांची आघाडी आणि काँग्रेस प्रचारशैली आणि प्रचारयंत्रणेच्या संदर्भात माहिती देण्याचा हा प्रयत्न...
हालचालींना प्रारंभ
भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडी यांना सत्तेवरुन खेचण्यासाठी विरोधकांनी गेल्या दहा महिन्यांपासून प्रयत्न चालविलेला आहे. भारतीय जनता पक्षाविरोधात एकत्र आल्यावाचून पर्याय नाही, हे लक्षात आल्यानंतर विरोधकांनी आघाडी स्थापन करुन एकत्र येण्याची पावले टाकली. याकामी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी पुढाकार घेतला होता. बेंगळूर येथे पहिली संयुक्त बैठक आणि जाहीरसभाही झाली. या सभेत 22 पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित असल्याचे सांगण्यात आले. तथापि, ही आघाडी खऱ्या अर्थाने आकाराला आलीच नाही. तिच्यातून अनेक पक्ष आणि नेते बाहेर पडले आहेत. तरीही लोकसभा निवडणूक जवळ आल्यानंतर या आघाडीने हालचाल सुरु केली आहे.
काँग्रेसवर गांधी कुटुंबाचे वर्चस्व
? काँग्रेस हा विरोधी आघाडीतला राष्ट्रव्यापी पाया असणारा एकमेव पक्ष आहे. त्याची प्रचारशैली आणि कार्यपद्धती त्याच्या प्रदीर्घ परंपरेनुसारच आहे. या पद्धतीत कालमानानुसार फारसे परिवर्तन झालेले दिसत नाही. हा पक्ष ‘उतरंड पद्धती’ने कार्य करताना दिसतो. सर्वात वरच्या स्थानी पक्षश्रेष्ठी, त्यानंतर राज्यस्तरीय अध्यक्ष, त्यानंतर जिल्हास्तरीय अध्यक्ष, नंतर स्थानिक नेते आणि कार्यकर्ते अशी ही उतरंड प्रथमपासूनच आहे. ती आजही तशीच असल्याचे दिसून येते.
? ज्येष्ठ आणि अनुभवी नेते मल्लिकार्जुन खर्गे हे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. तथापि, बहुतेक सारे महत्वाचे निर्णय राहुल गांधी घेतात असे बोलले जाते. सोनिया गांधी आता प्रकृतीमानानुसार फारशा सक्रीय नाहीत. तरीही त्या बैठकांना उपस्थित असतात आणि निर्णय प्रक्रियेत त्यांचाही सहभाग असतो असे दिसते. आजही पक्षाची प्रमुख सूत्रे गांधी कुटुंबातील तीन व्यक्तींकडेच आहेत, असे जाणवते. उमेदवारांची निवड याच तिघांकडून केली जाते, अशी चर्चा आहे.
स्थिती कशी आहे...
? गेल्या 10 वर्षांमध्ये काँग्रेसला उतरती कळा लागल्याचे स्पष्ट आहे. सलग दोन लोकसभा निवडणुकांमधील दारुण पराभव, अनेक विधानसभा निवडणुकांमध्येही अपयश असे धक्के बसल्याने पक्षरचना आणि कार्य यांच्यात काहीशी उदासिनता आलेली आहे, असे तज्ञांचे मत आहे. राहुल गांधींनी कन्याकुमारी ते काश्मीर अशी पहिली पदयात्रा आणि मणीपूर ते मुंबई अशी दुसरी यात्रा काढून पक्षात उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
स्थानिक नेत्यांचा मोठा आधार
? कर्नाटक आणि तेलंगणात काँग्रेसने विधानसभा निवडणुका नुकत्याच जिंकल्याने काही प्रमाणात पक्ष उल्हासित झालेला आहे. या दोन्ही राज्यांमध्ये काँग्रेसचे स्थानिक नेतृत्व भक्कम असल्याने हा विजय मिळाला हे स्पष्टच आहे. अशाच प्रकारे अन्य राज्यांमध्येही पक्षाचा स्थानिक पाया घट्ट आहे. ही या पक्षाची जमेची बाजू निश्चितपणे म्हणता येते. मात्र, प्रश्नचिन्ह राष्ट्रीय नेतृत्वाच्या क्षमतेवर आहे.
प्रचारशैलीची अनिश्चिती
? या पक्षाचे प्रचारकार्य नेमके कसे चालते, यासंबंधी बरीच उलटसुलट चर्चा आहे. काही राज्यांमध्ये या पक्षाकडे कार्यकर्त्यांचे बळ असल्याचे दिसते. तर काही राज्यांमध्ये कार्यकर्त्यांची वानवाही आढळते. कार्यकर्त्यांशी प्रामुख्याने संपर्क स्थानिक नेत्यांचाच असतो. तसेच प्रत्येक राज्यात हे नेते त्यांच्या पद्धतीने प्रचार करतात, असे दिसून येते. प्रचारकार्यात देशव्यापी एकजिनसीपणा असतो की नाही, यासंबंधी बरीच मतमतांतरे आहेत. सध्या जाहीर सभांवरच भर दिला जात आहे.
मित्रपक्षांशी समन्वय
? काँग्रेस विरोधी पक्षांच्या आघाडीचा भाग आहे. त्यामुळे पक्षाला आघाडीतील इतर पक्षांशी संपर्क ठेवावा लागतो. हे कार्य पक्षाध्यक्ष आणि राहुल गांधी करतात असे सांगितले जाते. राष्ट्रीय नेत्यांच्या जाहीर सभांचे आयोजन स्थानिक नेत्यांकडून केले जाते. सध्या काँग्रेसचे उमेदवार प्रचारासाठी मोठे कष्ट घेत आहेत. तथापि, राष्ट्रीय नेत्यांनी अद्याप प्रचाराचा धडाका लावल्याचे दिसून येत नाही. तसेच आघाडीतील इतर पक्षांसमवेत संयुक्त सभाही फारशा झालेल्या नाहीत. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्येच अशा काही सभा झालेल्या दिसून येतात.
मुख्य ध्येय काय
? काँग्रेसचे मुख्य ध्येय सध्या आपल्या जागांमध्ये शक्य तितकी वाढ करणे हे आहे, अशी चर्चा आहे. ज्या मतदारसंघांमध्ये या पक्षाची भारतीय जनता पक्षाशी थेट लढत आहे, तेथे भारतीय जनता पक्षाच्या शक्य तितक्या जागा आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न करणे, अशी रणनीती या पक्षाने आखल्याचे बोलले जाते. दक्षिणेतील राज्यांवर पक्षाचा प्रमुख भर आहे. तेथे जागा वाढण्याची शक्यता अधिक आहे. उत्तरेत ज्या जागा कमी मतांनी गेलेल्या आहेत, तेथे संघर्ष अधिक प्रभावीपणे करण्याचे धोरण आहे, असे काँगेससंबंधी माहिती असलेल्यांचे मत आहे.