For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

काँग्रेसने तोडली द्रमुकशी युती

06:22 AM May 07, 2026 IST | Tarun Bharat Portal
काँग्रेसने तोडली द्रमुकशी युती
Advertisement

टीव्हीकेला सरकारस्थापनेसाठी पाठिंबा, हा काँग्रेसचा निर्णय असल्याची द्रमुकची प्रतिक्रिया

Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

तामिळनाडूमध्ये द्रविड मुन्नेत्र कळघम हा पक्ष विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर आता काँग्रेसने या पक्षाशी असणारे 55 वर्षांचे संबंध तोडण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसने थलपती विजय यांच्या टीव्हीके या पक्षाला सत्तास्थापनेसाठी साहाय्य करण्याचा आणि नव्या सरकारमध्येही सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. टीव्हीके या पक्षाला 107 जागा असून त्याला बहुमतासाठी आणखी 11 जागांची आवश्यकता आहे. काँग्रेसचे या निवडणुकीत 5 आमदार आले आहेत.

Advertisement

टीव्हीके या पक्षाला काँग्रेसचा पाठिंबा केवळ या सरकार स्थापनेसाठी असणार नाही, तर भविष्यकाळातील स्थानिक स्वराज्य संस्था, लोकसभा आणि राज्यसभेच्या निवडणुकांसाठीही असेल. ही नवी युती व्यापक बनविण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. युती करण्यासाठी काँग्रेसने एक अट ठेवली आहे. ती म्हणजे, धर्मवादी शक्तींना या युतीत स्थान दिले जाता कामा नये, असे काँग्रेसने स्पष्ट केले आहे.

अधिकृत वक्तव्य

टीव्हीके या पक्षाशी युती करण्यासंदर्भात काँग्रेसकडून बुधवारी अधिकृत वक्तव्य प्रसिद्ध करण्यात आले आहे. तामिळनाडू काँग्रेस पक्षाची विधीमंडळ शाखा टीव्हीके या पक्षाला तामिळनाडूत सरकार स्थापनेसाठी पूर्ण पाठिंबा देत आहे. आमची युती परस्पर सन्मान, परस्पर विश्वास, सत्तेत सहभाग आणि भविष्यकाळातील निवडणुकांसाठी आहे, असे निर्धारीत करण्यात आले आहे. टीव्हीके या पक्षाने कोणत्याही धर्मवादी शक्तींना, ज्या भारताच्या संविधानावर विश्वास ठेवत नाहीत, त्यांना या युतीत स्थान देऊ नये, ही अट घालण्यात आली आहे, असे या वक्तव्यात स्पष्ट करण्यात आले असून ते दिल्लीतून प्रसिद्ध करण्यात आले आहे.

युतीपरिवर्तन हा राजकारणाचा भाग

राजकारणात कोणतीही युती किंवा आघाडी स्थायी नसते. परिस्थितीनुसार निर्णय घ्यावे लागतात. द्रमुकनेही काँग्रेसला 2014 च्या लोकसभा निवडणुकीत युतीतून बाहेर केले होते. तसेच भारतीय जनता पक्षाशीही द्रमुकने 1999 ते 2003 या कालखंडात युती केली होती, असे प्रतिपादन काँग्रेसच्या खासदार ज्योतीमणी यांनी  केले. काँग्रेसच्या धोरणाचे त्यांनी समर्थन केले असून सध्याची राजकीय आवश्यकता हीच असल्याचे स्पष्ट केले. ही युती तामिळनाडूच्या हितांचे संरक्षण करण्यासाठी आणि या राज्याच्या विकासासाठी होत असल्याचीही टिप्पणी त्यांनी केली आहे.

हा काँग्रेसचा स्वत:चा निर्णय

द्रमुकशी संबंध तोडण्याचा निर्णय काँग्रेसचा स्वत:चा असून त्याआधी द्रमुकशी कोणतीही चर्चा झालेली नाही. या विधानसभा निवडणुकीत आमची काँग्रेसशी युती होती. आता त्या पक्षाने स्वत:हून युती तोडल्याची घोषणा केली असेल, तर तो त्या पक्षाचा प्रश्न आहे. आम्ही त्यावर कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करणार नाही, असे प्रतिपादन द्रमुक नेत्या आणि खासदार कझीमोनी यांनी केले. आता द्रमुक आणि काँग्रेस यांच्यात काडीमोड झाल्यानंतर द्रमुक कोणती भूमिका भविष्यात घेणार, याकडे राजकीय वर्तुळात उत्सुकतेने पाहिले जात आहे. या विधानसभा निवडणुकीनंतर तामिळनाडूत मोठ्या प्रमाणात राजकीय समीकरणे परिवर्तीत होणार असून, द्रविडी संकल्पनेचे पुढे काय होणार, हा प्रश्नही महत्वाचा ठरणे शक्य आहे.

टीव्हीके सर्वात मोठा पक्ष

तमिलगा व्हिट्टेरी कळघम (टीव्हीके) हा पक्ष विधानसभा निवणुकीत सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. या पक्षाला 234 पैकी 107 जागा मिळाल्या आहेत. तो पक्ष सत्तास्थापनेच्या जवळ असून त्याला बहुमतासाठी 11 जागा कमी आहेत, काँग्रेसकडे 5 जागा आहेत. टीव्हीकेला आणखी सहा जागांची आवश्यकता असून त्या मिळविण्यासाठी पक्षाकडून छोट्या पक्षांना आमंत्रित केले जात आहे.

राजकारणात परिवर्तन होणार

ड काँग्रेसने द्रमुकशी असणारी कित्येक दशकांची युती तोडल्याने खळबळ

ड हा काँग्रेसचा स्वत:चा निर्णय आहे, अशी द्रमुकची प्राथमिक प्रतिक्रिया

ड तामिळनाडूचे आणि तेथील जनतेचे हित साधण्यासाठी युती : काँग्रेस

Advertisement
Tags :

.