For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गणेबैल टोल नाक्यावर काँग्रेसचा रास्ता रोको

11:22 AM May 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
गणेबैल टोल नाक्यावर काँग्रेसचा रास्ता रोको
Advertisement

10 जूनपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा उग्र आंदोलन : टोलमुक्त प्रवासास मुभा दिलेल्या वाहनांवर कारवाई व्हावी

Advertisement

खानापूर : बेळगाव-गोवा राष्ट्रीय महामार्गावर गणेबैल येथील टोल नाक्यावरील मनमानी कारभाराला कंटाळून तसेच लोकप्रतिनिधी आणि काही पदाधिकाऱ्यांच्या वाहनांना टोलमुक्त प्रवास करण्यास मुभा दिल्याचे समजताच काँग्रेस कार्यकर्त्यांनी मंगळवारी सकाळी 11.30 वाजता रास्ता रोको करुन आंदोलन केले. यावेळी जवळपास दोन तास महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. अखेरीस खानापूर पोलीस निरीक्षक रामचंद्र नाईक यांनी मध्यस्थी केली. ज्या वाहनांना टोलमुक्त प्रवास करण्यास मुभा दिली होती, त्यांच्यावर गुन्हा दाखल करणे तसेच आजपासून गणेबैल, खानापूर परिसरातील गावातील वाहनांना पूर्णपणे टोलमुक्त प्रवास करण्यास मुभा देणे, शेतकऱ्यांची नुकसानभरपाईबाबत तातडीने निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले आहे. जर मागण्याबाबत योग्य तो निर्णय न घेल्यास 10 जूनंनतर पुन्हा उग्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी काँग्रेस पक्षाच्यावतीने देण्यात आला आहे.

शेतकऱ्यांना अद्याप नुकसानभरपाई नाही

Advertisement

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने बेळगाव-गोवा, पणजी हा महामार्ग नव्याने निर्माण करण्यात आला असून यासाठी खानापूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहण करण्यात आल्या होत्या. 2011 सालापासून जमीन गेलेल्या शेतकऱ्यांची नुकसानभरपाई देण्यात आलेली नाही. रस्ता अद्याप पूर्ण होण्याअगोदरच टोल वसूली सुरु करण्यात आली आहे. या विरोधात शेतकऱ्यांनी जून 2023 साली आंदोलनाचा पावित्रा घेतला होता. जुलै महिन्यात टोल वसुली सुरु करण्यात आल्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन करुन टोल वसुली बंद पाडली होती. त्यावेळी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी 23 जुलै 2023 साली खानापूर येथे शेतकऱ्यांची बैठक घेऊन कोणत्याही परिस्थितीत आठ दिवसांत दावे निकालात काढून शेतकऱ्यांची नुकसानभरपाई देण्यात येईल, असा निर्णय घेतला होता. आणि टोल वसुलीस हिरवा कंदील दाखवण्यात आला होता. मात्र अद्याप शेतकऱ्यांच्या कोणत्याच मागण्या मान्य झाल्या नाहीत, तसेच शेतकऱ्यांची नुकसानभरपाई देण्यात आलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना अजून आपल्या नुकसानभरपाईसाठी महामार्ग प्राधिकरणाचे आणि जिल्हाधिकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत.

काही वाहनांना मोकळीक

तालुक्यातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या वाहनांना आमदार विठ्ठल हलगेकर , अशोका बिल्डकॉनचे अधिकारी तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या नावे काही पदाधिकाऱ्यांच्या वाहनांना मोकळीक देण्यात आली आहे. काही वाहने महाराष्ट्र आणि गोवा येथील आहेत. तर काही वाहने ही वीट आणि वाळू वाहतूक करणारी असल्याचेही काँग्रेस कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आले आहे. याबाबतची माहितीही काँग्रेस कार्यकर्त्याना मिळाली असून त्यांनी या आधारेच पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. याबाबत रस्ते महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकारी अंजिक्य नवले यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, प्राधिकरणाकडून असा कोणताही आदेश देण्यात आलेला नाही. याबाबत सखोल चौकशी करावी लागेल, त्यानंतरच सत्य परिस्थिती समोर येईल, आम्ही चौकशी केल्यानंतरच याबाबत निर्णय घेऊ, असे ते तरुण भारतशी बोलताना म्हणाले.

आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या नावाखाली 12 वाहनांना सवलत

आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या नावाखाली 12 वाहनांना टोलपासून सवलत देण्यात आली आहे. भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या वाहनांना टोलपासून सवलत देण्यात आल्याची माहिती समोर आल्याने काँग्रेसकडून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.याबाबत आमदार आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी खुलासा करणे गरजेचे आहे.

हेस्कॉमच्या नावाखाली 13 वाहनांना सवलत

हेस्कॉमच्या नावाखाली जवळपास 13 वाहनांना टोल करवसूलीपासून सवलत देण्यात यावी, अशी सूचना हेस्कॉमकडून करण्यात आली होती. मात्र हेस्कॉमच्या हेडखाली 13 वाहनांना सवलत देण्यात आली आहे. मात्र हेस्कॉमने के. ए. 22-डी-9958, के. ए. 22-सी-2815, के. ए. 22-डी-1138, के. ए. 22-सी-4914 या चार वाहनांची यादी टोल नाक्याच्या अधिकाऱ्यांना दिली आहे.  तसेच पोलीस खात्याच्या नावाखाली 7 वाहनांना टोल करवसुलीपासून मोकळीक देण्यात आली आहे. याबाबत काँग्रेस कार्यकर्त्यांनी पोलीस खात्याशी संपर्क साधून संबंधित वाहनांची शहानिशा केली. त्यावेळी खानापूर पोलिसानी याबाबत या वाहनांशी आपला काहीही संबंध नसल्याचे सांगितले आहे. तसेच पोलिसांना कोणत्याही मोफत परवान्याची गरज नसल्याचेही पोलिसानी सांगितले.

आंदोलनाला शेकडो कार्यकर्त्यांचा पाठिंबा

तालुक्यातील भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांच्या वाहनाना टोलमुक्ती देण्यात आली आहे. याची माहिती काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मिळताच काँग्रेस कार्यकर्ते अॅड. आय. आर. घाडी, यशवंत बिरजे, विनायक मुतगेकर, प्रसाद पाटील, नारायण सावंत, गु•gसाब टेकडी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यानी टोल नाक्यावरील अधिकाऱ्यांना जाब विचारल्यावर अरेरावीची भाषा करत त्यांनाच उलट उत्तरे दिली. यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यानी याच ठिकाणी ठिय्या आंदोलन करत रास्ता रोको केला. थोड्याच वेळात ही माहिती खानापूरसह आसपासच्या परिसरात समजताच शेकडो कार्यकर्त्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला. नुकसानभरपाई संदर्भात शेतकऱ्यांना ठोस आश्वासन देण्यात यावे, टोलनाका परिसरातील पाच कि. मी. परिघातील नागरिकांना टोलमुक्ती देण्यात यावी, तसेच ज्या वाहनांना गेल्या वर्षभरापासून टोलपासून टोलमुक्त प्रवास दिला गेला, त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी करत काँग्रेस कार्यकर्त्यानी रास्तारोको केला. जवळजवळ दोन तास दोन्हीकडील वाहतूक ठप्प झाल्याने महामार्गावर शेकडो वाहनांची गर्दी झाली होती. मात्र जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी तसेच राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी या आंदोलनाकडे जाणीवपूर्वक पाठ फिरविली. त्यामुळे आंदोलन आणखीनच उग्र करण्यात आले हेते. शेवटी खानापूर पोलीस स्थानकाचे निरीक्षक रामचंद्र नाईक यांनी जिल्हाधिकारी आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरुन चर्चा करुन मार्ग काढला. त्यामुळे पुन्हा वाहतूक सुरळीत झाली.

आश्वासनानंतर आंदोलन मागे

यावेळी खानापूर परिसरातील पाच कि. मी. परिसरातील वाहनाना टोल आकारण्यात येणार नसल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले आहे. तसेच शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईबाबत येत्या दि. 10 जूनपर्यंत नुकसानभरपाई संदर्भात प्रयत्न करण्यात येणार आहेत. तसेच गेल्या वर्षभरात शासनाची दिशाभूल करुन ज्या वाहनांना टोल करापासून मुक्ती दिली होती. त्यांच्यावर फौजदारी गुन्हा करण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले, त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यानी हे आंदोलन दि. 10 जूनपर्यंत स्थगित केले आहे.

नुकसानभरपाई मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना नाहक त्रास : सुरेश जाधव

यावेळी सुरेश जाधव म्हणाले, गेल्या वर्षापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी खानापूर येथे बैठक घेऊन एक महिन्यात शेतकऱ्यांची नुकसानभरपाई देणार असल्याचे जाहीर करुन टोल आकारणीस हिरवा कंदील दिला होता. मात्र शेतकऱ्यांना अद्याप नुकसानभरपाई मिळालेली नाही. तसेच राष्ट्रीय महामार्गाकडून आवश्यक असलेली कागदपत्रे पुरवण्यात येत नाहीत. त्यामुळे पुढील नुकसानभरपाई मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना नाहक त्रास सोसावा लागत आहे.

मोबदला मिळालेला नाही : प्रसाद पाटील

प्रसाद पाटील म्हणाले, बेळगाव-गोवा महामार्गात जमीन गेलेल्या शेतकऱ्यांना आजही योग्य मोबदला मिळालेला नाही. टोल नाक्यावर कायमच गुंडगिरी आणि अरेरावी केली जाते. गणेबैल परिसरातील नागरिकांची शेती टोल नाक्याच्या दोन्ही बाजूला आहे. त्यांनादेखील टोल नाक्याच्या अधिकाऱ्यांकडून वेठीस धरले जाते. आणि टोल वसूल केला जातो. तसेच रुग्णांना घेऊन जाताना देखील अनेकवेळा वाहने अडवून हुज्जत घातली जाते. टोल आकारणीच चुकीची असल्याने रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत टोल आकारणी थांबवावी.

सामान्य शेतकरी देशोधडीला : अॅड. आय. आर. घाडी

अॅड. आय. आर. घाडी म्हणाले, शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देताना महामार्ग प्राधिकरणाकडून कोट्यावधीचा गैरव्यवहार झालेला आहे. अधिकाऱ्यांनी अनेक शेतकऱ्यांना हाताशी पकडून कोट्यावधीची माया जमवलेली आहे. यात सामान्य शेतकरी देशोधडीला लागलेला आहे. आजही खऱ्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाईपासून वंचित रहावे लागले आहे. मात्र अधिकारी गब्बर झाले आहेत. याचीही चौकशी होणे गरजेचे आहे. भाजप पदाधिकाऱ्यांनी आपल्या पोळ्या भाजून घेतल्या आहेत. यासाठी भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे, असे ते म्हणाले.

मागण्या मान्य करा अन्यथा 10 जूनला आंदोलन : यशवंत बिरजे

यशवंत बिरजे म्हणाले, शेतकऱ्यांची नुकसानभरपाई खानापूर टोल नाका परिसरातील पाच कि. मी. वरील सर्व नागरिकांना टोलपासून पूर्णपणे मुक्तता देण्यात यावी. भाजपच्या पदाधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करुन त्यांच्याकडून नुकसानभरपाई आकारण्यात यावी, या मागण्या मान्य केल्यास 10 जून रोजी उग्र आंदोलन करण्यात येईल, असे ते म्हणाले.

Advertisement
Tags :

.