काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा आसाममध्ये दाखल! आसामच्या मुख्यमंत्र्यांना घाबरत नाही : राहुल गांधी
मुख्यमंत्री शर्मा यांची अल्पसंख्याकबहुल भागांमध्ये सोमवारी न जाण्याची सूचना
वृत्तसंस्था/ विश्वनाथ
काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा आठव्या दिवशी रविवारी अरुणाचल प्रदेशातून पुन्हा आसाममध्ये दाखल झाली आहे. विश्वनाथ जिल्ह्यात राहुल गांधी यांनी लोकांना संबोधित करताना पुन्हा एकदा आसामचे मुख्यमंत्री हेमंत विश्व शर्मा यांना देशातील सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री ठरविले आहे. आसाम सरकार लोकांना यात्रेत सामील होण्यापासून रोखत आहे. परंतु ही राहुल गांधीची नव्हे तर लोकांची यात्रा आहे हे सरकारला माहित नसावे. राहुल गांधी तसेच येथील लोक मुख्यमंत्री शर्मा यांना घाबरत नाहीत, असे काँग्रेस खासदाराने म्हटले आहे.
मुख्यमंत्री शर्मा यांनी राहुल गांधींना सोमवारी (अयोध्येतील रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी) नागांव जिल्ह्यातील श्री शंकरदेव यांचे जन्मस्थळ बोरदोवा सत्रा येथे न जाण्याचे आवाहन केले होते. शंकरदेव एक आसामी सामाजिक-धार्मिक सुधारक होते. ते कवि, नाटककार आणि 15-16 व्या शतकापासून आसामच्या सांस्कृतिक आणि धार्मिक इतिहासात एक विशाल व्यक्तिमत्त्व आहेत. परंतु त्यांची भगवान रामाशी तुलना चुकीची असल्याचे मुख्यमंत्री शर्मा यांनी म्हटले आहे.
22 जानेवारी रोजी अल्पसंख्याक बहुल भाग मोरीगाव, जागीरोड आणि नीली येथे जाऊ नये असे माझे राहुल गांधींना आवाहन आहे, कारण तेथे कायदा-सुव्यवस्था बिघडण्याचा धोका आहे. राज्य सरकारने खबरदारीदाखल या भागांमध्ये कमांडो तैनात केले असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.
लोकांचे मुद्दे ऐकणे आणि त्यासाठी लढाई लढणे हेच या यात्रेचे लक्ष्य आहे. आमच्या कार्यकर्त्यांना धमकाविले जाते हे मी जाणून आहे. परंतु आपण आमच्या विचारसरणीसाठी लढत आहोत. सर्व लोकांनी आमच्यावर प्रचंड प्रेम केले असल्याचे राहुल गांधी म्हणाले.
आसामच्या युवा आणि शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. येथील युवा लाखो रुपये खर्च करून शाळा-महाविद्यालयांमध्ये जात आहेत, परंतु त्यांना आसाममध्ये रोजगारच मिळत नाही. शेतकऱ्यांच्या पिकांना योग्य भाव मिळत नाही. तर छोट्या दुकानदारांना नोटाबंदी आणि जीएसटीने उद्ध्वस्त केले आहे. देशाचे पूर्ण सरकार निवडक उद्योजकांसाठी चालविले जातेय. याच्याच विरोधात आम्ही ‘भारत जोडो न्याय यात्रा’ काढली असल्याचे राहुल यांनी नमूद केले आहे.
भाजप आणि संघ देशात द्वेष आणि हिंसा फैलावत आहे. त्यांचे लक्ष्य जनतेकडील पैसा हिसकावून घेत देशाच्या दोन-तीन मोठ्या उद्योगपतींना देण्याचे आहे. याचमुळे आम्ही मागील वर्षी कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत ‘भारत जोडो’ यात्रा सुरू केली होती. ‘भारत जोडो यात्रे’त आम्ही लाखो लोकांना भेटलो, आता पुन्हा एकदा लोकांचा आवाज ऐकण्यासाठी आम्ही यात्रा सुरू केली असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.