पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून उमेदवारांची घोषणा
बागलकोटमधून उमेश मेटी तर दावणगेरे दक्षिणमधून समर्थ मल्लिकार्जुन यांना तिकीट
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्यातील दोन विधानसभा मतदारसंघांतील पोटनिवडणुकांसाठी काँग्रेस पक्षाने रविवारी उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. बागलकोट विधानसभा मतदारसंघातून एच. वाय. मेटी यांचे धाकटे पुत्र उमेश मेटी आणि दावणगेरे दक्षिण मतदारसंघातून शामनूर शिवशंकरप्पा यांचे नातू आणि मंत्री एस. एस. मल्लिकार्जुन यांचे पुत्र समर्थ मल्लिकार्जुन यांना उमेदवारी देण्यात आली आहे. एआयसीसीचे महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी दोन्ही मतदारसंघातील उमेदवारांच्या नावांची घोषणा केली.
खूप विचारविनिमय आणि सर्व बाबींचा विचार करून काँग्रेस पक्षाने सदर उमेदवारी जाहीर केली आहे. दावणगेरे दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे तिकीट शामनूर कुटुंबाला तर बागलकोट विधानसभा मतदारसंघाचे तिकीट एच. वाय. मेटी यांच्या कुटुंबाला देण्यात आले आहे. या दोन्ही मतदारसंघातील पोटनिवडणुकांमध्ये अनुकंपाचा उपयोग करण्याचा पुढाकार काँग्रेसने घेतला आहे.
सामान्यपणे पोटनिवडणुकीत त्या मतदारसंघात निधन झालेल्या आमदारांच्या कुटुंबांनाच तिकीट देण्याची प्रथा काँग्रेस पक्षाची आहे. या पोटनिवडणुकीतही तेच कायम ठेवले आहे. दावणगेरे दक्षिण विधानसभा मतदारसंघात अल्पसंख्याकांना तिकीट देण्याचा दबाव असतानाही राज्य काँग्रेस प्रभारी रणदीप सिंग सुरजेवाला यांनी शनिवारी सर्वांशी चर्चा करून अल्पसंख्याकांची समजूत काढली. तसेच समर्थ शामनूर यांचे नाव निश्चित केले. त्याचप्रमाणे बागलकोट मतदारसंघातून उमेश मेटी यांचे नाव निश्चित करून हायकमांडकडे पाठवण्यात आले होते. रविवारी के. सी. वेणुगोपाल यांनी एआयसीसी अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या मान्यतेने दोन्ही मतदारसंघांसाठी उमेदवार निवडीची घोषणा केली आहे.
बागलकोटमध्येही मेटी यांच्या कुटुंबातच तिकिटासाठी स्पर्धा होती. मेटी यांची मुलगी महादेवी मेटी तिकिटासाठी इच्छुक होत्या. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी डी. एच. वाय. मेटी यांच्या दोन्ही मुले आणि मुलीला बोलावून बैठक घेतली. आम्ही ज्याला तिकीट देऊ त्याच्यासाठी काम करण्याची सूचना केली होती. मेटी यांची मुलगी महादेवी मेटी यांनी मल्लिकार्जुन मेटी यांच्याऐवजी आपला दुसरा भाऊ उमेश मेटी यांना तिकीट द्यावे. अन्यथा आपण निवडणूक लढविणार असल्याचे म्हटले होते.
आता काँग्रेस हायकमांडने उमेश मेटी यांना तिकीट जाहीर केल्याने सर्व संभ्रम दूर झाला असून महादेवी मेटी यांची इच्छाही पूर्ण झाली आहे. दोन्ही मतदारसंघांतील तिकीट वाटपावरून निर्माण झालेला गोंधळ आता दूर झाल्याने काँग्रेस पक्ष पुढील लढतीसाठी सज्ज झाला आहे. काँग्रेस पक्षाने पोटनिवडणुकांसाठी आपले उमेदवार जाहीर केल्यामुळे दावणगेरे दक्षिण मतदारसंघात काँग्रेसचे समर्थ मल्लिकार्जुन आणि भाजपचे श्रीनिवासदास करियप्पा यांच्यात तर बागलकोटमध्ये उमेश मेटी आणि भाजपचे विरण्णा चरंतीमठ यांच्यात लढत होणार आहे.
आज शक्तिप्रदर्शनाने उमेदवारी अर्ज होणार
सोमवारी पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस आणि भाजपच्या उमेदवारांनी पक्षाच्या ‘बी’ फॉर्मद्वारे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. दावणगेरे आणि बागलकोट या दोन्ही मतदारसंघांमध्ये दोन्ही पक्षांचे शक्तिप्रदर्शन होणार आहे. काँग्रेसचे समर्थ मल्लिकार्जुन यांनी गेल्या शुक्रवारी ‘बी’ फॉर्मशिवाय दावणगेरे दक्षिण विधानसभा मतदारसंघातून आपले नामनिर्देशन दाखल केले होते. त्याचप्रमाणे भाजपचे श्रीनिवास दास करियप्पा यांनीही शुक्रवारी आपली उमेदवारी दाखल केली होती.