काँग्रेसचे टोलविरोधात मोठ्या आंदोलनाची घोषणा! पुणे- बेंगलोर महामार्गावर ३ तारखेला चक्का जाम
पश्चिम महाराष्ट्र काँग्रेसने आज आंदोलनाची मोठी घोषणा करताना पुणे- बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाची दुरावस्थेसंदर्भात आंदोलन उभा करणार असल्याचे जाहीर केले. राष्ट्रिय महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहतुकीला लागणारा वेळ तसेच मनमानी टोलवसुली यामुळे सामान्य नागरीकाला नाहक त्रास होत असून सरकारे यावर ठोस निर्णय घेण्यासाठी काँग्रेसकडून हे आंदोलन छेडण्यात येत असल्याचे आमदार सतेज पाटील यांनी जाहीर केले आहे.
पुणे- बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर गेल्या काही महिन्यांपासून ट्रॅफिक जाम होत असल्याने अनेक प्रवाशांना, नागरीकांना तसेच माल वाहतूक दारांना मोठ्या अडचणींना सामोरे जावं लागतं आहे. या राष्ट्रिय महामार्गावर पडलेल्या खड्यांमुळे अनेक अपघातही झाले आहेत. त्यामुळे रस्त्यावरील मोठ्या प्रमाणावर असणारे खड्डे तसेच रस्त्याची दुरावस्था पहाता या मार्गावरील टोल माफ व्हावा, तसेच टोलमध्ये सवलत मिळावी अशी मागणी केली जावी असा ठराव काँग्रेस पक्ष कार्यकर्त्यांच्या ऑनलाईन झालेल्या मेळाव्यात करण्यात आला.
कोल्हापूरसह पेठ, कराड, सातारा, खेड शिवापूर येथील टोलनाक्यावर शनिवारी ३ तारखेला होणारा असून त्यासाठी काँग्रेसच्या हजारो कार्यकर्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केलं आहे.
या आंदोलनामध्ये काँग्रेस नेते सतेज पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार विश्वजीत कदम, काँग्रेस नेते संग्राम थोपटे यांच्यासह पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेसचे अनेक नेते सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
त्यानुसार, कोल्हापूरत किणी टोल नाका येथे सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील कार्यकर्ते थांबून आंदोलन करणार आहेत.
सातारा जिल्ह्यातील तासवडे टोल नाका येथे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली सांगली आणि कराड मधील काँग्रेस कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. तसेच आवाडी टोल नाक्यावरती सातारा जिल्ह्यातील काँग्रेसचे कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.
पुण्यातील खेड शिवापूर या टोलनाक्यावर काँग्रेस नेते संग्राम थोपटे यांच्यासह पुणे ग्रामीण जिल्ह्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.