गोव्याच्या अस्मितेसाठी पुन्हा काँग्रेस-गोवा फॉरवर्ड एकत्र
चोडणकर अन् सरदेसाई यांच्या भेटीने राजकीय वर्तुळात खळबळ
त.भा. प्रतिनिधी
पणजी : गोव्याच्या व्यापक राजकीय आणि सामाजिक हिताचे रक्षण करण्यासाठी काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड पक्षाची युती आगामी काळात अधिक बळकट आणि सक्रिय करण्याचा निर्धार दोन्ही पक्षांच्या प्रमुखांनी व्यक्त केला आहे. गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे नवनियुक्त अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी काल गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष आणि आमदार विजय सरदेसाई यांची सदिच्छा भेट घेतली. दोन्ही नेत्यांमधील ही बैठक अत्यंत सकारात्मक आणि आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीयदृष्ट्या फलदायी ठरल्याचे सांगण्यात येत आहे.
या उच्चस्तरीय बैठकीत सध्या राज्यातील मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारच्या कारभारामुळे गोव्यासमोर निर्माण झालेल्या विविध गंभीर प्रश्नांवर दोन्ही नेत्यांमध्ये सविस्तर आणि सखोल चर्चा झाली.
गोव्याला वाचवण्यासाठी सर्व प्रमुख विरोधी पक्षांनी (काँग्रेस, गोवा फॉरवर्ड आणि आप) एका व्यासपीठावर येण्याचे स्वागत करण्यात आले आहे. गोव्यातील वाढती बेरोजगारी, कोळसा प्रदूषण आणि पर्यावरण विषयक मुद्द्यांवर सरकारला धारेवर धरण्यासाठी दोन्ही पक्ष संयुक्त रणनीती आखणार आहेत. दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते संयुक्तपणे जनतेच्या दारात जाऊन भाजप सरकारच्या अपयशाचा पाढा वाचतील. भाजपच्या विरोधात गोव्यात एक मोठी आणि भक्कम राजकीय आघाडी उभारण्याच्या दिशेने ही बैठक म्हणजे अत्यंत महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
गोव्याची अस्मिता धोक्यात
“भाजपच्या हुकूमशाही आणि जनविरोधी धोरणांमुळे आज गोव्याची अस्मिता धोक्यात आली आहे. गोव्याची भूमी आणि इथल्या जनतेचे हित सुरक्षित ठेवणे हे काँग्रेसचे सर्वोच्च प्राधान्य आहे. ज्यांना कोणाला गोव्यातून भाजपचा पराभव करायचा आहे, त्या सर्व समविचारी शक्तींनी एकत्र येणे ही काळाची गरज आहे. आम्ही गोवा फॉरवर्ड पक्षासोबतची आमची युती तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत नेऊन अधिक मजबूत करू. सध्या जागावाटपावर कोणतीही चर्चा झालेली नाही, परंतु गोमंतकीयांच्या हितासाठी आमचा संयुक्त लढा अधिक तीव्र होईल.”
- गिरीश चोडणकर, (गोवा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष)
.. डॉ. प्रमोद सावंत सरकारची धोरणे गोव्याची विनाश करणारी
“डॉ. प्रमोद सावंत सरकारची धोरणे गोव्याचा विनाश करणारी आहेत. बेरोजगारी, भ्रष्टाचाराने थैमान घातले असून स्थानिक जनतेचा आवाज दाबला जात आहे. गोव्याचे अस्तित्व टिकवण्यासाठी मजबूत विरोधी पक्षांची एकजूट अनिवार्य आहे. काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्यासोबत झालेली आजची चर्चा अतिशय सकारात्मक झाली असून, राज्यातील भाजप सरकारच्या मनमानी कारभाराविरोधात आम्ही एकत्रितपणे रस्त्यावर उतरून जनआंदोलन उभे करू. गोव्याची संस्कृती आणि अस्मिता वाचवण्यासाठी आमचा हा निर्धार कायम राहील.”
- विजय सरदेसाई, (गोवा फॉरवर्ड पक्षाध्यक्ष)