काँग्रेस मित्रपक्षाकडून केंद्राची प्रशंसा
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
काँग्रेसचा मित्रपक्ष असणाऱ्या आणि जम्मू-काश्मीरमध्ये सत्ताधीश असणाऱ्या नॅशनल कॉन्फरन्स या पक्षाने पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारची प्रशंसा केली आहे. तसेच काँग्रेसला कानपिचक्या दिल्या आहेत. विरोधी पक्षांची आघाडी फुटत आहे. अनेक पक्ष या आघाडीतून बाहेर पडण्याच्या विचारात आहेत.. त्यामुळे या आघाडीचे नेतृत्व करणाऱ्या काँग्रेसने लवकर जागे व्हावे आणि आघाडीतल्या पक्षांची बैठक बोलावून त्यांना एकत्र बसवावे, असे आवाहन या राज्याचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी केले आहे. अब्दुल्ला यांनी केंद्र सरकारने शनिवारी संसदेत सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पाचीही स्तुती केली. या अर्थसंकल्पात मध्यमवर्ग आणि शेतकरी यांच्यासाठी अनेक योग्य तरतुदी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या वर्गांचा लाभ होईल. या अर्थसंकल्पाचे क्रियान्वयन योग्य प्रकारे केल्यास समाजाचा निश्चित लाभ होईल आणि देशाच्या अर्थव्यवस्थेच्या प्रगतीचा वेग वाढेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.