काँग्रेस ः बिछडे सभी बारी बारी
उदयपूरमधील चिंतन शिबीराचे सूप वाजले आणि काँग्रेसचा ‘फील गुड’ दोन दिवसदेखील टिकला नाही. गुजरातमधील विधानसभा निवडणूका जवळ आल्या असताना हार्दिक पटेल यांनी पक्षाला राम राम ठोकून राहुल गांधींसमोर एक आव्हान उभे केले आहे. गेल्या विधानसभा निवडणूकात काँग्रेसचा एक हुकमी एक्का झालेला हार्दिक आज-उद्या पक्षाबाहेर जाणार हे मात्र गेले काही महिने दिसत होते.
चिंतन शिबीर सुरु होण्यापूर्वी पंजाबमधील सुनील जाखर या तालेवार नेत्याने काँग्रेसबाहेर पडून पक्षाचा अपशकुन केला. आता जाखर हे भाजपमध्ये दाखल झाल्याने मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे चांगलेच फावले आहे. भाजपच्या गळाला पंजाबमध्ये एक मोठा हिंदू नेता लागला आहे. जर हिंदुत्वाचे राजकारण पंजाबमध्ये रेटण्याचे भाजपने ठरवले तर जाखर हे त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असू शकतात.
हार्दिकनी अजून भाजपमध्ये प्रवेश घेतला नसला तरी काँग्रेस सोडत असताना त्यांनी जे ‘स्क्रिप्ट’ वाचले त्यावरून त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हे नेते वाटू लागले आहेत हे स्पष्ट होत आहे. ते जर अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षात गेले तरी भाजपला हवेच आहे. गुजरातमध्ये काँग्रेसचे जेव्हढे नुकसान होईल तेव्हढा भाजपचा फायदा हे मोदींचे स्पष्ट गणित आहे. गुजरातमध्ये केजरीवाल यांचा पक्ष हा भाजपची बी टीम आहे हे आरोप फारसे चुकीचे नाहीत.
गुजरातमधील काँग्रेस मोदींनी एव्हढी पोखरून टाकलेली आहे कि कोण नि÷ावंत आणि कोण फितूर हे समजण्यास फार अवघड. त्यामुळे ‘मला काँग्रेसमध्ये काम करून दिले नाही’ ही हार्दिक यांची तक्रार चुकीची नसावी. कारण त्यांना काम करता येणार नाही याची चोख व्यवस्था भाजपने केली होती. पाच वर्षांपूर्वी राज्यात झालेल्या पाटीदार आंदोलनाचा नेता काँग्रेसबाहेर काढणे हे भाजपच्या हिकमती राजकारणाचे यश आहे हेदेखील तितकेच खरे.
भरपूर पडझड झालेली काँग्रेस एव्हढय़ा लवकर गुजरात अथवा केंद्रात सत्तेत येऊ शकत नाही असा स्पष्ट निष्कर्ष हार्दिक यांनी काढलेला दिसत आहे. हार्दिक केवळ 28 वर्षाचे आहेत आणि त्यांना सत्ता हवी आहे. संघर्ष फार झाला. काँग्रेस सोडताना राहुल गांधींचे नाव न घेता त्यांच्या ‘चिकन सँडविच’ ची जी गोष्ट हार्दिक यांनी काढली आहे ती भाजपच्या भक्तमंडळींकरिता काँग्रेसला ट्रोल करण्यासाठी भरपूर आहे.
याचा अर्थ स्पष्ट आहे. हार्दिक यांना गुजरातचा ‘हिमंत बिस्व शर्मा’ बनायचे आहे. दशकभरापूर्वी शर्मा हे आसाममधील तत्कालीन काँग्रेस मुख्यमंत्री कै तरुण गोगोई यांचे उजवे हात होते. सरकार तेच चालवायचे. पण राहुलनी त्यांना मुख्यमंत्री न बनवल्याने त्यांनी सरळ भाजपचा रस्ता पकडला आणि मोदी-शहा यांच्या गळय़ातील ताईत बनून ते आता मुख्यमंत्री बनलेले आहेत. शर्मा हे ज्या पद्धतीने राहुल यांच्यावर व्यक्तिगत हल्ला करतात तसे भाजपमध्ये हयात घालवलेले बरेच नेते करत नाहीत.
हार्दिक यांचे भाजपमध्ये कितपत भले होईल ते येत्या काळात दिसेल पण ज्याप्रकारे गेली वीस वर्षे मोदी यांनी तेथील राजकारणावर आपली पकड ठेवलेली आहे त्याने कोणाही नेत्याला मोठे होऊ दिलेले नाही. अमित शहा हे आता केंद्रात गृहमंत्री असले तरी गुजरातमध्ये असताना ते मोदींच्या हाताखाली गृहराज्यमंत्रीच राहिले हेही वास्तव आहे. तीन वर्षांपूर्वी काँग्रेस सोडून भाजपात गेलेले युवा ओबीसी नेते अल्पेश ठाकोर हे देखील गेल्या विधानसभा निवडणुकीत हार्दिक, दलित नेते जिग्नेश मेवानी यांच्याबरोबर एक चेहेरा होते. त्यांच्या मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने त्यांचा धुव्वा उडवला आणि त्यानंतर राजकीयदृष्टय़ा अल्पेश हे दिसेनासेच झाले आहेत.
गुजरातमध्ये 25 वर्षे सत्तेत असलेल्या भाजपाला राज्यातील वजनदार अशा पटेल समाजाला चुचकारायचे आहे. राज्य भाजपमधील सर्वात जे÷ असा एक नेता आणि माजी उपमुख्यमंत्री नितीनभाई पटेल यांना गेल्यावषी मुख्यमंत्रीपदाकरता डावलल्याने पटेल/पाटीदार समाज नाराज आहे हे उघड गुपित आहे. त्यावर एक तोडगा म्हणून हार्दिक या पाटीदार समाजातील युवानेत्याला भाजपमध्ये आणण्यात येणार आहे. पंतप्रधानांच्या खासमखास असलेल्या गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांना भावी राष्ट्रपती बनवण्याचा विचार सुरु आहे अशा बातम्या पेरल्या जात आहेत. त्यात कितपत तथ्य आहे ते महिन्याभरात कळेल.
हार्दिक यांचा पाटीदार समाज गुजरातच्या जवळजवळ सात कोटी लोकसंख्येपैकी 14 टक्के आहे तर त्याचे मतदार 20 टक्के आहेत असे मानले जाते. त्यामुळे या समाजाला आपलेसे केले तर निवडणुकीचे सारे गणित आपसूक सुटेल आणि भाजपला आपली ‘हिंदुत्वाची प्रयोगशाळा’ अबाधित राखता येईल.
तात्पर्य काय तर गेल्या विधानसभा निवडणुकीत राहुल यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने गुजरातमध्ये दिलेली चिवट झुंज सत्ताधाऱयांच्या स्मरणात आहे. काँग्रेसचे खच्चीकरण करण्यासा6ठी साम दाम दंड भेद असे प्रकार वापरण्यात येत आहेत हा पक्षाचा आरोप पूर्णपणे बिनबुडाचा आहे असे मानता येत नाही. अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला गुजरातमध्ये सक्रिय करण्यात भाजपचाच हात मानला जातो. गुजरातमधील राजकारण भाजप आणि काँग्रेस यात विभागले असल्याने कोणी तिसरा पक्ष आला तर काँग्रेसची मते खाईल असे हे सरळ गणित आहे असे सांगितले जात आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीच्यावेळी भाजपच्या हिंदुत्वाची धार बोथट करण्यासाठी राहुल यांना शिवभक्त आणि ‘जान्हवेधारी ब्राह्मण’ असे प्रोजेक्ट करण्यात आले होते तर हार्दिक यांना पाटीदार समाजाचा झुंजार नेता, अल्पेश ठाकोर हा मागासवर्गीयांचा नेता आणि जिग्नेश मेवानी हा दलित नेता हे त्रिकुट त्यांना साथ देत होते, ही रणनीती कामाला आली होती.
आता अल्पेश यांना निकामी करण्यात आले आहे तर हार्दिक काँग्रेसबाहेर पडलेले आहेत. जिग्नेश फारसे कामाचे नाहीत कारण गुजरातच्या दलितांना फारसा आवाजच नाही. त्यामुळे भाजपची बल्ले-बल्ले होणार असे मानले तर त्यात फारसे वावगे नाही. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव होत असताना मोदींनी पुढील 25 वर्षे भाजपला सत्तेत ठेवण्याचा जणू संकल्पच सोडला आहे.
याचा अर्थ काँग्रेस-मुक्त भारताचा ध्यास त्यांनी अजिबात सोडलेला नाही. ज्या प्रशांत किशोर यांच्याशी काँग्रेसचे नुकतेच फाटले त्यांनी गुजरात आणि हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचे पानिपत अटळ आहे असे भाकीत केलेले आहे. चहुबाजूने आभाळच फाटले तर काँग्रेसकरता रात्र वैऱयाची आहे. राहुल गांधी अशा परिस्थितीत कसा सामना करतात त्यावर पुढे राजकारण काय वळण घेणार ते ठरणार आहे.
सुनील गाताडे