Political Updates: काँग्रेसचे 10 नगरसेवक शिंदे गटात प्रवेश करणार?, राजकीय वर्तुळात खळबळ
शहरातील काँग्रेस पक्षात पुन्हा एकदा फाटाफुटीची चर्चा जोर धरू लागली आहे
By : संतोष पाटील
कोल्हापूर :
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या तब्बल 27 नगरसेवकांनी राजेश लाटकर यांच्या उमेदवारीविरोधात बंडाचे निशाण फडकवले होते. या निवडणुकीत काँग्रेस बॅकफुटवर गेल्यानंतर जिह्यातील राजकारण 360 अंशांत फिरले आहे. आता काँग्रेसचे 10 नगरसेवक शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चेने एकच खळबळ उडाली आहे. महापालिकेच्या राजकीय वर्तुळात संशयाचे धुके दाट झाले असून ही खरंच फुट आहे, की पेल्यातील वादळ, हे येत्या पंधरा दिवसांत स्पष्ट होईल.
शहरातील काँग्रेस पक्षात पुन्हा एकदा फाटाफुटीची चर्चा जोर धरू लागली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षातील 10 नगरसेवक शिंदे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, स्थानिक निवडणुकांमध्ये अधिक संधी आणि राजकीय लाभाच्या अपेक्षेने हे माजी नगरसेवक पक्षांतराचा विचार करत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
काँग्रेसमधील अंतर्गत कलह नवीन नाही. यापूर्वीही पक्षातील गटबाजी आणि नेत्यांमधील मतभेद अनेकदा समोर आले आहेत. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या दोन मोठ्या दिग्गज नगरसेवकांनी निवडणुकीची तयारी केली होती. मात्र राजेश लाटकर यांना नेत्यांनी पसंदी दिल्याने एकाच वेळी 27 नगरसेवकांनी लेखी पत्र देऊन त्यांच्या उमेदवारीला विरोध केला. काँग्रेस नेतृत्वाला उमेदवार बदलण्याची नामुष्की पत्करावी लागली. त्यांनतर निवडणुकीत काँग्रेसची घडी विस्कटली ती विस्कटलीच.
कोल्हापूर शहर उत्तर आणि दक्षिणेसह करवीरमध्ये काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला. जिह्यात महायुतीची सरशी झाली. शिवसेना फुटली, राष्ट्रवादी दुभंगली. आपल्यातील सहकारी सत्तेची फळे चाखत असताना आपण पक्षनिष्ठा का जोपासायची? येत्या निवडणुकीत होणारा प्रचंड खर्च आणि टोकाचा विरोध यामुळे अनेक माजी नगरसेवकांमध्ये अस्वस्थता आहे. त्यास मागील सभागृहात पदासाठी दिलेली आश्वासनं, टक्केवारीचे असमान वाटप, विधानसभा निवडणुकीतील उमेदवारी असे अनेक पैलू असल्याची चर्चा आहे.
शिवसेनेते जाणाऱ्या संभाव्य माजी नगरसेवकांमध्ये एक कारभारी अन् दक्षिण आणि उत्तर विधानसभा मतदारसंघातील चार-चार नगरसेवक असल्याचे समजते. पुढील महिन्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोल्हापूर दौऱ्यात हे नगसेवक पक्षांतर करणार असल्याचे ठामपणे सांगितले जात आहे. दरम्यान, अजून पुलाखून बरेच पाणी जाणार असून काँग्रेस गोटातूनही यासंदर्भात जोरदार हालचाली होतील, त्यानंतर बंडाचे निशाण फडकणार की खाली जाणार, हे स्पष्ट होईल. स्थानिक निवडणुकांवर परिणाम?कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ येत असताना काँग्रेसमधील ही फाटाफूट पक्षासाठी डोकेदुखी ठरू शकते.
निवडणुकीनंतर काँग्रेसची ताकद कमी होत असल्याचे चित्र रंगवले जात आहे. यातच जिह्याच्या राजकारणात शिंदे शिवसेना आणि भाजप आपली पकड मजबूत करण्याच्या प्रयत्नात आहेत. जर आठ नगरसेवक खरंच शिंदे शिवसेनेत गेले, तर काँग्रेसला मोठा धक्का बसू शकतो. पक्षातील अंतर्गत गटबाजी आणि असंतोषामुळे निवडणुकीच्या रणनीतीवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.पक्षनिष्ठा की राजकीय लाभ? कोल्हापूरच्या राजकारणात पक्षांतर हा नवा विषय नाही. गेल्या काही वर्षांत अनेक नेते आणि नगरसेवकांनी राजकीय लाभासाठी पक्ष बदलले आहेत.
काँग्रेसमधील सध्याची अस्थिरता आणि गटबाजी यामुळे काही नगरसेवक शिंदेसेनेकडे आकर्षित होत असल्याचे बोलले जात आहे. मात्र, यामुळे काँग्रेसच्या पारंपरिक मतदारांमध्ये नाराजी पसरू शकते. स्थानिक निवडणुकीत मतदार पक्षनिष्ठेला महत्त्व देतात की राजकीय समीकरणांना, यावर बरेच काही अवलंबून आहे. यपार्श्वभूमीवर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कोणता पक्ष बाजी मारणार आणि काँग्रेस आपली ताकद टिकवणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
काँग्रेस आघाडी भक्कम
"काँग्रेसची शहरातील आघाडी भक्कम आहे. काही नगरसेवक पक्षातून जाणार, ही चर्चा नवी नाही. ही फक्त चर्चाच आहे. आम्ही सर्व पदाधिकारी आणि नगरसेवक आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली एकदिलाने काम करत असून यापुढेही आमची एकी अभेद्य असेल."
- सचिन चव्हाण,शहर अध्यक्ष राष्ट्रीय काँग्रेस
आता कुणाच्या दारात आंदोलन करणार
"स्थायी समितीच्या 2018 च्या निवडणुकीत माझ्यावर विरोधी भाजप आघाडीला मतदान केल्याच्या संशयावरुन ठपका ठेवला. त्यानंतर काँग्रेस विशेषत: राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी माझ्या घरावर मोर्चा काढला, बोंब ठोकली. कालांतराने मोर्चा काढणारेच भाजपचे सहयोगी झाले, त्यावेळी आता कुणाच्या दारात बोंब मारणार, आंदोलन करणार अशी माझी प्रतिक्रिया होती. नगरसेवक उघडपणे पक्ष प्रवेश करत असतील तर आमच्यावर त्यावेळी निव्वळ संशयातून कारवाई केल्याचे दु:ख आहे."
- अफजल पिरजादे, माजी नगरसेवक
फक्त चर्चा..!
"काँग्रेसमधील नाराज नगरसेवकांनी माझ्याशी चर्चा केली आहे. त्यांच्या नाराजीची मुद्दे ऐकून नेत्यांसोबत बैठक घेऊ या, असा सल्ला दिला आहे. आठ नगरसेवकांची मानसिकता पक्ष सोडून जाण्याची असल्याचे जाणवले. मात्र माझा विश्वास आहे, त्यांची समजूत काढली आहे. ते काँग्रेस सोडून जातील, असे वाटत नाही."
- डॉ. संदीप नेजदार,माजी स्थायी समिती सभापती